Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

भारतीय मातृत्व – बंगाली ते मराठी मार्गे हिंदी

सायली कराडे जुलै 16, 2026 1 minute read
0
201376.jpg

पुन्हा एकदा पुणे – हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस. त्याच उशीराने येणाऱ्या गाडीची वाट बघत असतांना लक्षात यायला लागलं की आजुबाजुला, मागे-पुढे मराठीइतकीच बंगाली चुळबुळसुद्धा जाणवू लागली आहे. कोणी तरूण जोडपं, कोणी सहकुटूंब सहपरिवार. भारतीय असल्याचा मला होणारा एक फायदा म्हणजे दुसरी भारतीय भाषा बोलता येत नसली तरी मोडकीतोडकी समजून घेता येते. त्यामुळे आजुबाजूला व्यक्त होणारा ट्रेनबद्दलचा बंगाली वैताग माझ्या मराठी मनाला सहज कळू लागला होता.
अशातच माझ्या बाजूच्या रिकाम्या जागी एक मध्यमवयीन बंगाली जोडपं येऊन बसलं. सोबत एक तरूण मुलगा देखील होता. प्रथमदर्शनी त्यांचा मुलगा असावा असं वाटलं पण नंतर कळलं की तो त्यांचा घरगडी होता. समोर रचून ठेवलेलं सामान अन् पाणी आणि ज्यूसच्या अवाढव्य बाटल्या बघूनच लक्षात आलं की प्रवास लांबचा आहे. तसं काकूंकडून कळलं की त्यांना कोलकात्याला जायचंय.
थोडं स्थिरस्थावर होत नाही तोच आपल्या बंगाली हिंदीमध्ये काकूंचा पहिला प्रश्न आला “कुठे जायचंय तुम्हाला” (मी लहान असूनही आदरार्थी बहुवचन बरं का!) (भारतीय सभ्यता) “बडनेरा” इति मी. पुढे मला त्यांना बडनेरा समजावून सांगायला पुढची दहा मिनिटं लागली. नातेवाईकांची घरं असल्याने त्यांना नागपूर तेवढं ठाऊक होतं. अखेर काकूंचे यजमान – काका माझ्या मदतीला आले. ते सैन्यदलात कार्यरत असल्याने त्यांना पुलगाव व ओघानेच बडनेरा देखील ठाऊक होतं. नंतर मात्र मला काकूंच्या सोबतीला एकटीला ठेवून काका “येतोच” म्हणून आपल्या गड्याला घेऊन जे गेले ते गेलेच. तसंही ट्रेनला उशीरच होता त्यामुळे घाई नव्हतीच. आता मात्र खरी पंचाईत येणार होती. साहित्य, संस्कृती आणि स्वातंत्र्यलढा या तीनही बाबतीत समृद्धतेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज्यातल्या आम्ही दोघींनी संवाद साधायला शेवटी राष्ट्रभाषा हिंदीचा आधार घेतला. त्यात मेख अशी की काकू ७वी व ८वी आणि मी ८वी ते १०वी द्वितीय भाषा म्हणून हिंदीऐवजी संस्कृत शिकलेलो. त्यामुळे आम्हा दोघींचीही हिंदी अगदीच “सुमार” किंवा थोडं सकारात्मक बोलायचं तर “प्राथमिक” दर्जाचीच होती. अर्थात त्यामुळे फार काही अडलं नाही म्हणा. भारतीयांचं अन् त्यातही स्त्रियांचं बोलणं कुठल्या भाषेवाचून अडण्याचा संभव फारच कमी. मात्र पुढचा काही काळ मला स्त्रियांसाठी पुल्लिंगी क्रियापदं अन् पुरूषांसाठी स्त्रीलिंगी क्रियापदं ऐकण्याची सवय करावी लागली एवढंच.
तर सगळ्या प्रवाशांप्रमाणेच काकूसुद्धा चांगल्याच वैतागल्या होत्या. त्यांच्या मुलाच्या सिम्बॉयसिस महाविद्यालयात प्रवेशानिमित्त काकू पुण्याला आल्या होत्या. मात्र पालकांसाठी ठेवलेल्या कार्यक्रमातून अर्ध्यातूनच उठून यावं लागलं होतं त्यांना. अन् स्टेशनवर येऊन त्यांना कळलं की गाडीला उशीर होणार आहे. त्यात काकांनी रेल्वेखात्याकडून मिळालेला मेसेज न वाचल्याने उगाच कार्यक्रम सोडून यावं लागलं याने त्यांच्या वैतागात आणखीनच भर घातली. पुण्यातल्या नातेवाईकांना भेटता न आल्याची खंत ती आणखी वेगळीच.
काकू मुळच्या कलकत्त्याच्या. त्यांचं BA Honours पर्यंत शिक्षण झालेलं होतं. परंतु त्यांच्या काळानुसार वयाच्या अन् मोठ्या बहिणींच्या तुलनेत त्यांचं लवकरच लग्न झालं. त्यांच्या सासरी त्या मोठ्या सुनबाई आहेत. त्यातच काकांची फिरती नोकरी, मुलाकडे लक्ष या सगळ्यातून काकूंना नोकरी करता आली नाही. काकूंनी मात्र त्याची खंत न बाळगता आपलं शिक्षण, जिद्द सर्व काही मुलासाठी उपयोगात आणलं. आज काकूंनी जवळपास अर्धा भारत पालथा घातला आहे. त्या ज्या राज्यांमध्ये राहिल्या तिथले रिती – रिवाज, परंपरा त्यांनी लक्षात ठेवल्या आहेत. सर्वसामान्य भारतीय स्त्रीप्रमाणेच काकू सुद्धा अनेक उपवास – व्रतं करतात. त्या जसं कलकत्त्याच्या चंडीचा उपवास करतात तसंच पुरीच्या जगन्नाथाचा देखील. उत्तरप्रदेशातल्या गोरखपूरच्या उपवास- व्रतपद्धतीबद्दल देखील त्यांना माहिती आहे.
काका मुलाला रागवण्याच्या, मारण्याचा पक्षात नव्हते. त्यामुळे त्याच्या शिक्षणासाठी रागवण्याची, वेळ पडली तर झोडपण्याची जबाबदारी काकूंवरच येऊन पडली अन् त्यांनी ती इमानेइतबारे पारही पाडली.
काकूंचं संपूर्ण शिक्षण बंगालीत झालेलं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना हिंदी लहेजा अन् देवनागरी लिपीबद्दल अजिबात माहिती नव्हती. त्यातून त्यांचा मुलगा लहान असतांना त्यांनी त्याला बंगाली लहेजा व बंगाली लिपीतूनच हिंदी शिकवण्यास सुरुवात केली. मुलाने मात्र शाळेत शिकवल्या जाणाऱ्या हिंदीनुसार त्यांना चुकीचं ठरवलं. पण काकू कसल्या ऐकतात? त्यांनी भारतीय आईप्रमाणे मुलाला सुनावलं “तुला काय कळतंय? काहीही सांगतोस.” नंतर ओघाओघाने इतर पालकांकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून काकूंना कळलं की आपला मुलगा जे सांगत होता ते खरंच होतं. त्यानंतर मात्र काकूंनी जिद्दीने हिंदी लहेजा व लिपी शिकून घेतली व त्याचा उपयोग आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी केला.
इतक्या वर्षांत फक्त एकदाच काकूंनी मुलाचा तिसऱ्या वर्गाच्या परिक्षेचा अभ्यास घेण्याची जबाबदारी काकांवरती सोपविली. त्यात काकांचा न रागवण्याचा, न मारण्याचा स्वभाव. त्यांनी अर्धवट अभ्यास घेऊन नंतर मुलाला झोपवून दिले. मुलाने मात्र उठून काकूंना प्रामाणिकपणे घडलेला प्रकार सांगितला अन् मग मायलेकं दोघांनीही तिसऱ्या वर्गाचा अभ्यास रात्री दोन वाजेपर्यंत जागून पूर्ण केला. त्यानंतर काकूंनी कधीही काकांना मुलाचा अभ्यास घ्यायला सांगितलं नाही. काकूंनी दहावीपर्यंत मुलाचा अभ्यास स्वत: घरीच घेतला. त्याला शिकवणी लावून दिली नाही. त्याच्या दहावीतली इंग्रजीतली ट्रिग्नोमेट्री काकूंनी स्वत: बंगालीतून शिकलेल्या त्रिकोणामितीवरून शिकवली हे सांगतांना काकूंचा सार्थ अभिमान त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
काकूंच्या नात्यातल्या एका मुलाने घरी कोणीही नसतांना बाहेरून बोलवलेला बर्गर खाल्ला. त्यातून झालेल्या विषबाधेमुळे आज त्याला बटाट्यापासून ते माशांपर्यत सर्व पदार्थ बिना मसाल्याचे फक्त उकडून खावे लागतात. त्यामुळे काकूंना स्वत:च्या मुलाच्या खाण्यापिण्याची सतत चिंता असते. त्यांचं वस्तीगृहातलं जेवण कसं असेल? तो बाहेर काही खाईल का? घरी करून सोबत दिलेला खाऊ खाईल की नाही? एक ना अनेक चिंता काकूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत्या. काकूंचं पूर्ण विश्व त्यांच्या मुलाभोवती फिरत असल्याचं आणि त्यांच्या विश्वाचा केंद्रबिंदू – त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर असण्याने तयारी होणारी पोकळी त्यांना तिथेच जाणवू लागली होती. क्षणभरासाठी मला त्यांच्या जागी महाराष्ट्रातल्या माझ्या ओळखीच्या मातांचे चेहरे मला दिसायला लागले. त्यांच्याही चेहऱ्यावर मी तीच चिंता, तीच काळजी बघितलेली, अनुभवलेली आहे.
मुलगा लहान असतांना त्याच्या अभ्यासाची चिंता करणाऱ्या काकू आज त्याच्या खाण्यापिण्याच्या चिंतेत गढलेल्या आहेत. मातृत्वाच्या भाग्यासोबतच अखंड चिंतेचे गाठोडे देखील स्त्रीला आपलेसे करावे लागते हे चिरंतन सत्य मला काकूंच्या आत्मकथेतून कळले.
मध्यंतरी वाचनात आले होते की अमेरिकेमध्ये घेतल्या जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परिक्षांमध्ये भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात; कारण जेव्हा अमेरिकन आई तिचं व्यक्तिगत आयुष्य जगण्यासाठी संध्याकाळी घराबाहेर पडत असते तेव्हा तिच्याच पिढीची, तिच्याच वयाची भारतीय अमेरिकन आई आपल्या मुलांना अभ्यासाला घेऊन बसलेली असते.
शेवटी महाराष्ट्र असो, बंगाल असो वा सिलिकॉन व्हॅली; भारतीय मातृत्वाने लेकराच्या माथ्यावर धरलेली मायेची छाया कधीही आक्रसत नाही, हेच खरे.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: ||नोकरी की व्यवसाय||
Next: जडभरताची कथा
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.