तोशिकाजू कावागुची , हा जपान देशातील ओसाका शहरातील प्रसिद्ध लेखक, चित्रपट पटकथाकार आणि दिग्दर्शक आहे . त्यांचे लेखन सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात दोन व्यक्तीमधील परस्पर नातेसंबंधावर आधारित असून , ते त्यांनी छोट्या छोट्या दैनदिन घटनांच्या स्वरूपात व्यक्त केले आहे. त्यांची शैली इतकी साधी , सोज्वळ पण मोहक आहे की , हे पुस्तक एकदा हातात घेतले की , पूर्ण वाचन झाल्याशिवाय सोडवत नाही . वाचता वाचता आपण स्वतः केव्हा त्या कथेचा साक्षीदार ह्या नात्याने एक भाग बनतो , हे सुद्धा समजत नाही .
ह्या पुस्तकातील पात्रे अगदी तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीवन जगत असतात . त्यांच्या रोजच्याच आयुष्यातील घटना, रोजचेच प्रसंग, परस्पर नात्यातील पेच , त्यावर आधारित त्यांचे संवाद, त्यामधून रस्ता काढण्याची धडपड, आणि त्या धडपडीत येणारे यश वा अपयश, आणि त्या अपयशातून घेतलेला धडा , हे सर्व सांगण्यासाठी लेखकाने एक अभिनव प्रयोग केला आहे .
प्रथम आपण लेखकाने ह्या पुस्तकाची कहाणी कशी रंगवली आहे , हे आता जाणून घेऊ .
एका कैफ़े मध्ये एक खुर्ची असते, ज्या खुर्चीवर बसून , बसणारी व्यक्ती , बसलेल्या काळापुरतीच, आपल्याच भूतकाळात जाऊन , आपल्या जीवनातून आधी निघून गेलेल्या प्रिय व्यक्तीशी फक्त एकदाच, संवाद साधू शकते. पण कैफ़ेमधील त्याच खुर्चीवर एक स्त्री भूत नेहमीच बसलेली असते, ती जेव्हा टॉयलेटला जाऊन वापस येते, तेवढ्याच वेळात तुम्ही , त्या खुर्चीवर बसू शकता , तोपर्यंत तुम्हाला वाट पाहत बसावे लागते, त्याबाबत बळजबळ करता कामा नसते. खुर्ची मिळाल्यानंतर , तुम्हाला एक कॉफी तुमच्या कपात टाकून मिळणार , आणि त्या क्षणापासून ती दिलेली कॉफ़ी थंड होण्याच्या आधी , तुम्हाला भूतकाळातील आपल्या प्रिय व्यक्तीला भेटून , तेही एकदाच, आणि नंतर परत वर्तमानात वापस यायचे असते . ही सगळी नियमावली कैफ़ेतील कॉफ़ी देणारी वेटर तुम्हाला आधी सांगते आणि तुम्ही ती पाळता की नाही, यावर सुद्धा लक्ष देत असते .
आता आपण ह्या कथानकाची, आपल्या दैनंदिन वास्तविक आयुष्याशी तुलना करू या , तेव्हा कळते की, आपल्याला सुद्धा , अश्या क्लिष्ट गोष्टींना अनेक वेळा जीवनात सामोरे जावे लागते . बरेच वेळा आपण आपल्या जीवनात , आपल्याच अगदी प्रिय व्यक्तीला चुकीची वागणूक देतो , तेव्हा ती चूक आपल्या लक्षातही पण येते , पण स्वतः च्या इगोमुळे वा अन्य परिस्तिथीमुळे , आपण त्या चुकीची दुरुस्ती करणे टाळतो आणि नंतर ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर , आपल्यालाच जास्त वाईट वाटते, पश्चाताप होतो पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते , तेव्हा ती व्यक्ती परत एकदा आपल्याला भेटावी आणि आपण केलेल्या चुकीबद्दल आपण तिच्याशी काही सामोपचाराचे बोलणे करावे,अशी आपली प्रामाणिक इच्छा असते . पण तसे न झाल्यामुळे , त्याचे मानसिक दडपण घेत, आपल्याला तसेच मनोविद्यानिक दबावाखाली जगावे लागते . यात लेखकाने एक गर्भित सुचना सुद्धा दिली आहे, की , प्रत्यक्षात अशी खुर्ची कधीच नसते,ज्यावर बसून , आपण भूतकाळात केलेल्या आपल्या चुका दुरुस्त करू शकतो
ह्या पुस्तकात जीवनातील नाते संबंधातील हेच गहन तत्वज्ञान सरळ , साध्या , सोप्या आणि रंजक पद्धतीने मांडले आहे , हीच खरी , ह्या पुस्तकाची उपलब्धी आहे .