Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • काव्यास्वाद

गझलबद्दल : सदरा कफल्लकाचा : सुधीर मुळीक

वैभव वसंत कुळकर्णी जुलै 23, 2026 1 minute read
0
748614665_37848697591384052_3715783977392742960_n

गझल / गझलेबद्दल लिहायला मला मन-मेंदू आणि वेळ पूर्णपणे गुंतवून ठेवावे लागण्याचे पर्सनल आयुष्यात झालेले तोटे पाहता ते करण्याचं डेअरिंग हल्ली होत नाही आणि मी आजकाल ते शक्यतोवर टाळतोच . पण काही दिवसापूर्वी मराठी गझल आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट घडली. बहुप्रतीक्षित आणि मस्ट नीडेड असा ‘सदरा कफल्लकाचा’ हा सुधीर मुळीक ह्यांचा पहिला संग्रह प्रकाशित झाला. मी तो मिळवला आणि त्यावर लिहिलं पाहिजे असं आतून वाटलं.


माझी सुधीरजींशी आणि त्यांच्या गझलेशी ओळख थोडी उशिरा झाली. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीची काही वर्षे मायबोली आणि सुरेश भट डॉट इन बाहेरचं मराठी गझलेचं जग मला माहित नव्हतं. डॉक्टर कैलास गायकवाड सरांनी मला फेसबुक, ब्लॉग स्पॉट इत्यादीवरचे माझे समवयस्क समकालीन गझलकार तसंच गझलरंगबद्दल सांगितलं. अर्थात त्यातून काही मंडळी माझ्या पिढीची, लोकप्रिय आणि प्रस्थापित/ मातब्बर ह्या नात्याने मला माहित झाली. सुधीर मुळीक हे त्यापैकीच एक अग्रगण्य आणि सुपरस्टार नाव! किंबहुना मराठी गझलेचा एक अभिषक्त राजपुत्रच!!
सुधीरजींची गझल सर्वप्रथम मी “गझलकार सीमोल्लंघन”च्या ऑनलाईन अंकात वाचली त्याचवेळी त्यांच्या गझलेप्रति काहीतरी माझेपणा एक आपुलकी वाटली . का ते तेंव्हा समजत नव्हतं पण इतक्या वर्षानंतर आता मी हे शब्दात सांगू शकतो आहे की त्यांची भाषाशैली, शब्दकळा आणि ओळ व्यक्त होताना येणारा आवेग, त्यातील आर्त उत्कटता ह्या गोष्टी मला माझ्या मनातल्या गझल पद्धतीशी नाळ जोडणाऱ्या वाटल्या आणि मग माझी त्या गझलांशी चांगलीच गट्टी जमली.


व्यक्ती म्हणूनही सुधीरजींशी ओळख होऊन आता बरीच वर्षे झाली पण एकत्र येण्याचे, भेटीगाठींचे, गप्पांचे फारसे प्रसंग आले नाहीत, म्हणून मैत्रीत फारशी घनिष्ठता निर्माण होऊ शकली नसली तरी तसेकाही मतभेद किंवा वादही झाले नाहीत. म्हणून असेल, त्यांच्याकडं आणि त्यांच्या गझलेकडं पाहताना जशी एक आत्मीयता मनात दाटत असते तशीच एक त्रयस्थता-तटस्थतासुद्धा मी जपून ठेवू शकलो असेन असं मला वाटतं. त्या बेसिसवरच मी ‘सदरा कफल्लकाचा’ आणि त्यातील गझलांबद्दल आज काहीतरी लिहू धजावतो आहे.


जातो जवळ फुलांच्या तो गुदमरून येतो
तितकाच गंध घ्यावा जितका दुरून येतो
____________


मराठी गझलेतील “निवडुंग” अशी सुधीर ह्यांची ख्याती आहे. ते त्यांचं ऑफिशियल तखल्लुस ( टोपणनाव ) नसल्याची माझी माहिती आहे. पण पुस्तकात त्यांनी मनोगताखाली हेच नाव स्वीकारलं आहे. निवडुंग हा विषय असलेले काही शेरही संग्रहात आहेत. त्यांना अशी ओळख केव्हा आणि का मिळाली ह्यामागची गोष्ट मला माहित नाही. पण मला ओव्हरऑल असं जाणवलं की इतरांसाठी अतिशय विषम विपरीत असणाऱ्या परिस्थितीत निवडुंग मात्र उगवतो-तगतो तशीच सुधीर यांची गझलही फुललेली -बहरलेली आहे. शिवाय सुधीरजींच्या शेरात एक भावोत्कट असा आंतरिक ओलावा जसा असतो तशी एक टोचदेखील असते. आणखी शोधाशोध केली तर आढळून आलं की निवडुंग ही प्रतिमा दुःख, एकाकीपण (विरह ) , संघर्ष (प्रतिकूल परिस्थितीतही तग धरण्याची वृत्ती) , सहनशीलता दाखवते. सुधीरजींच्या गझलेला हे सगळं लागू पडतं. संग्रहातील मनोगतावरूनही हे पटतं म्हणून ही त्यांची उपाधी चपखल वाटते.


संग्रहात निवडलेल्या गझलांमध्ये प्रेम विरह आणि मानवी मनोव्यापार ह्या विषयांचे शेर सर्वाधिक प्रमाणात आहेत दर्शनिक किंवा आत्मबोधाचे शेरही बरेच आहेत तुलनेनं सामाजिक आशयविषयांचे शेर कमी आहेत. एकुणात या गझलेचा जॉनर पारंपारिक पद्धतीचा आहे. भावनेच्या उत्कटतेवर आरुढ होऊन किंवा भावनेच्या मुळाशी जात मनातला अपरिहार्य आर्त आशय पूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न तशी शैली शेरांमध्ये जोपासली आहे . व्यक्त होण्याच्या आवेगाच्या अव्वलपणा सच्चेपणा आणि जिवंतपणामुळे भाव / आशय रसिकांच्या मनात विनाअडथळा आणि आपसूक पोहोचतात आणि रसिकांना शेर सहज आवडतातही. सुधीरजींच्या गझलेची ही खासियत आहे. सुधीर मुळीक ह्यांचे असे अनेक सिग्नेचर शेर जे रसिकांना, माझ्या पिढीतील अनेक मित्रांना तोंडपाठ आहेत ते संग्रहातील पानोपानी आहेत.


आधुनिक शैलीच्या मराठी गझलप्रवाहात आढळणारी विचारप्रवणता किंवा वैचारिक गुंतागुंत, त्यामुळे येणारी थोडीशी दुर्बोधता किंवा कष्टबोधता सहसा सुधीरजींच्या शेरात नसते, मात्र प्रतिमायोजन, शेराची बांधणी आणि मांडणी यामध्ये जी एक काव्यमयता, विचारपूर्वकता त्यातून येणारी काहीठिकाणची संदीग्धता आढळते ती इतर पठडीबद्ध शैलीहून जरा हटके आणि म्हणून त्यांची स्वतःचीही, स्वतंत्र शैलीची ठरते. ह्या मुद्द्यावर थोडीशी सखोल चर्चा उपस्थित करणं मला आवश्यक वाटतं म्हणून थोडं सविस्तर बोलतो..


______________


शेरात आशय आणि मांडणीबाबत एक पारदर्शकता किंवा स्फटिकस्पष्टता असावी. निवडलेला प्रत्येक शब्द चपखल किंबहुना शेरातील इतर प्रत्येक शब्दाशी एकजीव झालेला असावा. शेराचा प्रत्यय किंवा प्रचिती कवीला आली तशीच रसिकांना यावी यासाठी दिलेला तर्क बिनचूक ठरावा ..ह्या काही पद्धती सामान्यतः कोणताही सराईत गझलकार अवलंबतो. पण त्या ऐवजी काहीवेळा अर्धपारदर्शकता (ओपेसिटी) आणि एखादा योग्य पण अनपेक्षितपणे धक्का देणारा शब्द, शेरातील आशय विषय किंवा त्या मागचे संदर्भ/ तर्क यांच्यात थोडीशी संदिग्धता बाळगत कधीकधी शेर साकारले जातात. यामागं एक विचारपूर्वकता किंवा चिंतनाचा ठामपणा असेल तर त्यातील गझलतत्त्व सांभाळूनच तो शेर गझलेतर कवितेच्या अधिक जवळ जाऊ शकेल अशा पद्धतीचा बनतो. सुधीरजींच्या अनेक शेरांबाबत आसाच प्रत्यय येतो.कधीकधी कवी आपलं म्हणणं जसंच्या तसं सगळ्यांसमोर आणू इच्छित/ शकत नसतो तसं करण्यात त्याला काहीतरी बाधा वाटू शकते. काही जखमा सगळ्यांपुढं अगदीच खोलून, उघड्या करून दाखवण्यासाठी नसतातही…त्याहीवेळी शेर असेच साकारले जातात. ह्यात एक विचारपूर्वकता किंवा सतर्कता किंवा कवितिक हुशारी बाळगली जाते असं म्हणता येईल. अर्थात असं काही करताना कवी अनुभवी जाणकार आणि गझलेप्रती पुरेसा गंभीर असावा लागतो सुधीरजींच्या या शैलीवैशिष्ट्यात या बाबी आढळतात हे मला आवर्जून नोंदवावं वाटतं.


अर्थाशिवाय मागे उरतील तर्क सारे
मी ठेवणार नाही संदर्भ लागणारा


असं काही करण्यामागं आपल्या कवितेतील भावनात्मकता आणि व्यक्त होण्याचा आवेग अधिकाधिक अबाधित राखणं हा देखील एक टेक्निकल मुद्दा असू शकतो कारण अनेकदा अति-विचारप्रवणता किंवा अति-विचारपूर्वकतेतून येणारी शब्दयोजना ऑर जास्तीची परिष्करणं शेरामध्ये मूळ नैसर्गिक आवेगाच्या आर्त-उत्कटतेमुळं येणाऱ्या जिवंतपणाला मारक ठरतात असा माझा अनुभव आहे. सुधीरजींच्या शैलीत हा असा वेगळेपणा किंवा स्वतःचेपणा त्यांनी सांभाळला असण्यामागं मला हेही एक कारण शक्य वाटतं.


एवढेही श्वास रोखुन तू मला पाहू नको
त्यातही काढेल दुनिया अर्थ वाऱ्यासारखे


हा शेर मला करायचा असता तर मी >>अन्यथा काढेल दुनिया अर्थ वेड्यासारखे <<< असं मोजकं आणि नेटकं सांगून मी विषय आवरला असता. किंवा कवीनं वाऱ्यासारखे असं म्हणून अनपेक्षित शब्दाचा धक्का ठेवला असावा अशी माझ्यापुरती समजूत काढली असती. अर्थात ठराविक पद्धतीची बांधणी किंवा तशी विचारपूर्वकता माझ्या शैलीचा भाग असल्या- नसल्यामुळं माझ्याकरवी सुधीरजींच्या वरील शेरात वाऱ्यासारखे या शब्दाजागी उणीव किंवा त्रुटी मानली गेली असती, पण आता गेली बरीच वर्ष गझल लिहिण्या-वाचण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळं मी वारा हाच शब्द का योजला असेल याबद्दल विचार केला तेव्हा मला समजलं की श्वास रोखणे असा शब्द प्रयोग वरच्या ओळीत आहे तर वारा हा वाहता असतो. अफवा देखील वाऱ्यासारख्याच पसरतात आणि म्हणून श्वास आणि वारा ह्यात असा जो सहसंबंध प्रस्थापित करत आशयाला हे वळण देण्यामागं ठाम चिंतन, एक सतर्कता, विचारपूर्वकता आहे!.. म्हणून ही शैलीबद्धता आहे! उणीव नव्हे!!


लेखनसीमा म्हणून मी इथं एकच शेर उलगडून दाखवला पण त्यातून नवोदिताना किंवा वरील पद्धतीची गझलशैलीची गुणवैशिष्ट्यं जपू इच्छिणाऱ्या ज्या आजकालच्या अनेक गझलकवींना मी पाहतो आहे त्यांनी लक्षात घ्यायला हवं असं काहीतरी मी सांगू इच्छितो…


आपल्या गझल- शेरांमध्ये काहीतरी वेगळेपणा स्वतःचेपणा आणण्याच्या नादात पण तो कसा आणावा याबद्दल अनभिज्ञ असल्यानं त्यांच्याकडून जेव्हा अर्धपारदर्शक, संदीग्ध, अनपेक्षित धक्का देणारं शब्दयोजन येतं त्यात केवळ वृत्तपूर्ती किंवा चिंतन+ तर्क यांचा अभाव किंवा आशयविषयापासूनचं भरकटलेपण हेच दिसतं कारण शेरातील त्या जागेवर अधिक चपखल योग्य असे चिंतनपर पर्याय जाणकारांना सहज सापडतात! म्हणून तिला शैलीबद्धता किंवा वेगळेपण म्हणता येत नाही!..अशा नवोदित किंवा अशा गझलशैलीची इच्छा बाळगणाऱ्या पण अजाण कवीकडून फार फार तर गझलेतर कवितेत आढळणारी नादरम्यता, मंत्रमुग्धता किंवा हृदयंगमताच तेवढी शेरात साकारली जाऊ शकते पण गझलतत्त्वाचं मात्र विचलन (सौंदर्यतत्व राखताना सत्य ह्या तत्वापासून ) झालेलं असतं … सुधीरजींच्या शैलीमधून शिकण्याची बाब हीच आहे की या गझलशैलीत गझलेतर कवितेची काही वैशिष्ट्यं म्हणून हाताळल्या जाणाऱ्या सर्व बाबी सांभाळूनही त्यांच्याकडून गझलतत्वाचं विचलन होत नाही!! यासाठी आपल्या गझलेला एक वेगळेपणा स्वतःचेपणा आणू इच्छिणाऱ्यानी किंवा गझलेतर कवितेशी अधिक जुळवून घेणारी स्वतःची गझलशैली प्रस्थापित करू पाहणाऱ्यांनी सुधीर यांच्या गझलेचा बारकाईनं अभ्यास करायला हवा .


संग्रहात काही गझल / शेरामध्ये लयी हाताळण्यात थोडासा ओबडधोबडपणा किंवा झिगझ्यागपणा दिसतो. सुधीरजींच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या त्या गझलांमध्ये त्यांचा थोडासा नवखेपणाही दिसतो. शिवाय लयीमध्ये असणाऱ्या त्या त्रुटी ज्या छापील कागदावर जाणवतात पण सादरीकरणामधून मात्र त्या झाकून निभावून नेता येतात याबद्दलची सुधीर ह्यांची माहिती किंवा तसा स्वानुभव त्यांनीचं मनोगतच नमूद केला आहे. , अशावेळी जर कवी आपल्या जबाबदारी आणि कामाबद्दल सजग सतर्क असेल तेव्हा काही बाबतीत (सहसा तांत्रिक ) दोष त्याला लावू नये असं मला वाटतं म्हणून संग्रहतील काही गझलांच्या शेरांच्या त्रुटीपूर्ण लयहाताळणी बाबतचं हे केवळ एक निरीक्षण म्हणून मीही इथं नोंदवत आहे.. आक्षेप म्हणून नाहीच.
सुधीर ह्यांची गझलशैली, तंत्राची बांधणी मांडणी आणि मंत्राची हाताळणी (ट्रीटमेंट ) ह्याबाबत केवळ नवोदितांसाठीच नाही तर काही प्रस्थापितांसाठीही हे माझं एकूण सांगणं आहे. आजमितीला स्वतःच्या गझलेतील अनेक उणिवा त्रुटी चुका झाकून उलट त्यांना वेगळेपणा आणि शैलीदारपणा म्हणून मिरवत काही लोक, ज्यांची स्वतःची गझलेची दिशाच भरकटलेली आहे ते, अनेकांचे मार्गदर्शक बनून त्या नवोदितांची आणि पर्यायाने मराठी गझलेचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न ठरवून मुद्दाम करत आहेत असं माझं निरीक्षण आहे. त्या सो कॉल्ड मार्गदर्शक कम प्रस्थापितांनीही सुधीरजी आणि असे इतर गझलकार ज्यांनी स्वतःची स्वतंत्र स्वयंभू अशी उत्तम आणि वाखाण्याजोगी शैली मराठी गझलेत आणलेली आहे त्यांच्या गझलांचा जिज्ञासूपणे प्रामाणिकपणे अभ्यास करावा.


_______________


संग्रहातील गझला वाचून जिज्ञासू आणि जाणकारांना सुधीरजींच्या गझलशैलीची अशी अधिकची गुणवैशिष्ट्यं देखील शोधता येतीलच. मी मला जेवढी सांगता येतील, जी मुख्यत्वे करून अधोरेखित करावी वाटली तितकी सांगू शकलो आहे.


अता मात्र इथं मला थोडसं इमोशनल असं काही सांगायचं आहे. संग्रहाचं शीर्षक सदरा कफल्लकाचा असं आहे. तेही विचारपूर्वकच ठरवलं गेलं असेल, पण मला एक किस्सा आठवला! मी म्हणालोच की सुधीरजींशी बोलण्याचे भेटण्याचे प्रसंग तसे माझ्या वाट्याला फार आले नाहीत पण पूर्वी एकदा फोनवर बोलताना बराच वेळ आम्ही मराठी गझल – गझलक्षेत्र ह्यावर मनमोकळ्या गप्पा मारत असताना , सुधीर यांनी मला एक गोष्ट सांगितली.. लिटरली एक गोष्टच सांगितली!


ही एक खरी घटना आहे…एका राजाला गादीचा वारस नव्हता मग रयतेतून एका मुलाला दत्तक घ्यायचं ठरलं तेव्हा राज्यातील अनेक मुलं दत्तक जाण्यासाठी बोलावली गेली सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारला गेला की तुला मोठेपणी कोण व्हायचं आहे? प्रत्येक मुलानं आपापलं उत्तर सांगितलं. फक्त एक मुलगा म्हणाला की मला राजा व्हायचं आहे! मी राजा होण्यासाठीच इथं आलो आहे! हे अतिशय आत्मविश्वासपूर्ण आणि जबाबदारीची नेमकी जाणीव असणारं उत्तर ऐकून त्याच मुलाला दत्तक घेतलं गेलं तो मुलगा म्हणजेच बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड होय!..
ही गोष्ट सांगितल्यावर मला सुधीरजी म्हणाले होते की त्यांनासुद्धा गझलेच्या क्षेत्रामध्ये असंच राजा व्हायचं आहे म्हणूनच ते ह्या क्षेत्रात प्रयत्नरत आहेत. मला त्यांचा हा कॉन्फिडन्स ( जो रास्तच होता!!) आणि ध्येयाची सुनिश्चित आखणी असणारं म्हणणं खूप आवडलं होतं आणि पटलंही होतं . सुधीरजींचं व्यासपीठावरून गझल सादर करतानाचं राजबिंडं देखणं रूप आणि अप्रतिम अद्वितीय सादरीकरणातून रसिकांच्या हृदयसिंहासनावर कायमचं अधिराज्य गाजवणारे त्यांचे अनेक सिग्नेचर शेर पाहिले की त्यांच्या ह्या गझलश्रीमंतीचा वेगळा पुरावा देण्याची गरजच उरत नाही ! म्हणून संग्रहाचं नाव जरी काही असलं तरी माझ्यासाठी कायमच हा मराठी गझलेच्या अभिषिक्त राजपुत्राचाच गझलसंग्रह असेल.


अनेक वर्षांनंतर का होईना सुधीरजींनी संग्रह काढण्याचं मनावर घेतलं! माई पब्लिकेशन, पूजा भडांगे आणि ममता ताईंनी उत्तम निर्मितीमूल्य सांभाळत संग्रह प्रकाशित केला यासाठी तिघांचे खूप खूप आभार.


सुधीरजींचे अनेक शेर चाहत्यांना, माझ्यासह माझ्या पिढीतील आणि अनेक नव्याजुन्या गझलसोबत्यांनाही पाठच आहेत म्हणून मी ते इथं फार दिले नाहीत. हे सगळे शेर कायमचे एका ठिकाणी आपल्या संग्रही असावेत ही बाब माझ्यासाठी तरी फार आनंदाची आहे. ज्या जिज्ञासू जाणकार आणि अभ्यासू गझलकारांना / रसिकांना हा संग्रह हवा असेल त्यांनी कृपया माई पब्लिकेशन यांच्याशी आवर्जून संपर्क साधावा ही विनंती.


________________


संग्रहात माझ्या आवडत्या गझला आणि माझ्या कायम स्मरणात राहिलेले अनेक शेर आहेत पण एका गझलेनं ह्या क्षणी माझं लक्ष खास वेधून घेतलं आहे. सुधीर मुळीक यांच्या गझलशैलीची बहुतांश वैशिष्ट्यं तिच्या प्रत्येक शेरात मला पाहता आली. मी तरी कधी त्यांच्या प्रत्यक्ष सादरीकरणातून ती ऐकल्याचं किंवा इतरत्र वाचल्याचंही मलातरी आठवत नाही पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सुधीरजींच्या गझलवाटचालीच्या एका अधिक प्रगल्भ सशक्त अधिक सकस सरस टप्प्यावर पोहोचलेली अशी ती गझल मला वाटली!!


संग्रहात 2020 पर्यंतच्या गझला त्यांनी निवडल्या आहेत असा उल्लेख मनोगतात आहे. त्यानंतरच्या म्हणजे अलीकडच्या काळातील काही गझला त्यांनी आवर्जून अप्रकाशित राखल्या असतील हेही शक्य आहे किंवा असं असेल की त्यांनी गझल लिहिणंच थोडं कमीच केलं असेल. माझी त्यांना अशी पर्सनल विनंती आहे की सुधीरजींनी आपलं गझललेखन सातत्यानं करत राहावं ते आधीपेक्षा उंचावत राहावं आणि मराठी गझलरसिकांपुढं ते आणत राहावं. एकंदरच मराठी गझलेच्या इथून पुढच्या वाटचालीला सुधीरजींच्या शैलीदार आणि नव्या गझलांची / शेरांची खरोखरच गरज आहे!!


ती गझल अशी.. (पृष्ठ क्र. 48)
आता खरा विदूषक कळणार मयसभेला
गेला, नशेत माझा सगळा रुबाब गेला ..
माझ्यातल्या तृषेला सुचल्यात आर्त ओळी
थांबून पाहिले मी जेव्हा कधी व्यथेला ..
संकल्पनेत माझ्या सगळे विकल्प होते
पण पंख लावले मी नुसतेच कल्पनेला ..
या वेदने अभावी स्मरणार काय दुसरे ?
सगळेच घाव आता बसलेत प्रार्थनेला ..
मी ठोकरून आलो कित्येक उंबरे..पण,
ओलांडता न आला आजन्म एक पेला ..
आता तुझ्या मिठीची आहे खरी परीक्षा
उठणार हाच दरवळ आता तुझ्या त्वचेला..
होणार राख माझी उरणार भस्म माझे
मी पेटणार नाही आता पुन्हा शिगेला..
________________


शेवटी मीही (वैवकु ) एक गझलकार असल्यामुळं संग्रह वाचल्यावर माझ्या मनात जी दोन ओळींची पहिली प्रतिक्रिया उमटली ती व्यक्त करतो आणि थांबतो


मी पाहिला गझलचा श्रीमंत राजयोगी
लेऊन राहिला जो ‘सदरा कफल्लकाचा’
धन्यवाद
~वैवकु
पंढरपूर
मोबा : 9028588841

लेखक

  • वैभव वसंत कुळकर्णी

    वैभव वसंत कुळकर्णी - वैवकु
    पंढरपूर
    मोबा : 9028588841

Post navigation

Previous: कोटकायन भाग – ०३
Next: ||व्यवसाय की नोकरी|| भाग आठ व्यवसायाची रूपरेषा आणि संकल्पना
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

Screenshot 2025-08-24 at 4.05.03 PM
  • काव्यास्वाद

प्रिती जामगडे यांच्या कविता

पूजा भडांगे ऑगस्ट 24, 2025 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.