थोडासा गबाळा पेहराव पण डोळ्यांत विलक्षण बुध्दितमत्तेची चुणूक असलेल्या २६ वर्षीय युवकाने तीन शोधनिबंध 'ॲनालेन दि फिझिक' (Annalen der Physik) या प्रतिष्ठित नियतकालिकाकडे पाठवले होते ; सोबतच्या चिठ्ठीत त्याने नमूद केले होते की, “जागा असल्यास” ते प्रकाशित करावेत.
ते तिन्ही निबंध एकाच अंकात प्रकाशित झाले आणि त्यांनी ज्ञात जगाचे स्वरूपच बदलून टाकले. त्यातील पहिला निबंध मॅक्स प्लँक यांच्या 'क्वांटम सिद्धांता'ची सुधारित आवृत्ती होता. दुसऱ्या निबंधाने रेणूंच्या (molecules) हालचालींशी निगडित असलेल्या 'ब्राउनियन मोशन'शी (Brownian motion) ची उकल केली, जिचे स्पष्टीकरण तोपर्यंत कोणालाच देता आले नव्हते.
तिसऱ्या निबंधाबद्दल त्याने एका मित्राला लिहिलेल्या पत्रात अगदी सहजपणे म्हटले होते की, तो “अवकाश आणि काळाच्या सिद्धांतात थोडा बदल घडवून आणेल असे मला वाटतेय.” आणि तो होता न्यूटोनियन विश्वाला हादरे देणारा सापेक्षता सिद्धांत .
त्याचा मुख्य निष्कर्ष हाच होता: सर्व काही सापेक्ष आहे.
वेग, वस्तुमान, अवकाश आणि काळ या सर्व गोष्टी सापेक्ष (relative) आहेत. प्रकाशाला वस्तुमान नसते. अवकाशाला वक्रता असते. आणि काही ग्रॅम द्रव्यामध्ये (matter) एखाद्या शहराला नेस्तनाबूत करण्याइतकी प्रचंड स्फोटक शक्ती सामावलेली असते.
हे सर्व आपल्याला ज्याच्यामुळे समजले त्याचे नाव: अल्बर्ट आईन्स्टाईन.
ते तेव्हाच निवृत्त झाले असते तरीही २० व्या शतकातील विज्ञानामहर्षी म्हणून त्यांची ओळख कायम राहिली असती.
पण ते आपले काम करत राहीले आणि १९१५ मध्ये त्यांनी आपला जगप्रसिद्ध असा सापेक्षतेचा व्यापक सिद्धांत मांडला.
१९३५ मध्ये ते प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये राहायला आले. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्यांच्या अभ्यासिकेत कोण-कोणत्या गोष्टींची गरज आहे, तेव्हा ते म्हणाले: “एक डेस्क, काही कागदाची बाडे (pads), पेन्सिली… आणि हो, एक भली मोठी कचरापेटी — कारण माझ्या चुकाच खूप असतात.” त्यांनी पगार एवढा कमी मागितला होता की स्वतःचीच फजिती टाळण्यासाठी प्रिन्स्टनच्या प्रशासनाला त्यांचा पगार वाढवावा लागला होता.
ते व्हायोलिन वाजवत, मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करत आणि त्यांना स्वतःचा पत्ता लक्षात ठेवण्यात खरोखरच अडचण येत असे. गृहपाठातील (homework) मदतीसाठी पत्र लिहिणाऱ्या एका १५ वर्षांच्या मुलीला आईन्स्टाईन काकांनी आकृत्यांनी भरलेल्या एका पानासोबत उत्तर पाठवले: “गणितातील तुझ्या अडचणींबद्दल काळजी करू नकोस; मी तुला खात्री देतो की माझ्या अडचणी त्याहून कितीतरी अधिक किचकट आहेत.”
सर्व काही सापेक्ष असते.
१९३९ मध्ये,आईन्स्टाईनने अमेरिकेचे प्रेसिडेंट फ्रँकलिन डेलानो रूझवेल्ट यांना एका पत्राद्वारे सावध केले की जर्मनी अणुयुगाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय, अमेरिकेने त्यांच्याआधी तिथे पोहोचणे गरजेचे आहे. आणि १९४५ पर्यंत अमेरिकेने ते साध्यही केले. आईन्स्टाईनचे सिद्धांत आणि 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' यांच्या परिणामातून हिरोशिमा आणि नागासाकी येथे आधुनिक काळातील सर्वात भयानक विनाश घडवून आणला गेला.
आपल्या विचारांमुळे आणि संशोधनामुळे काय घडले, याची आईन्स्टाईनला बोचरी जाणीव होती. शांतताप्रिय, मुलांवर प्रेम करणारे आईन्स्टाईन हेच जाणता-अजाणता त्या साक्षात मृत्यू असलेल्या अणुबॉम्बचे जनक ठरले होते. युद्धानंतर, जपानचे भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा त्यांना भेटायला आले असता, आईन्स्टाईनने अत्यंत भावूक होऊन त्यांची माफी मागितली.
आईन्स्टाईन धार्मिक नसले तरी ते 'आस्तिक' होते. ते म्हणत “मला फक्त देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत; बाकीच्या गोष्टी म्हणजे फालतू तपशील आहेत.”
आईन्स्टाईन हे नाव आता असामान्य बुद्धिमत्तेचे मानकच ठरले आहे असे म्हटल्यास ते गैर ठरणार नाही; कारण आपण जेव्हा Genius हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्याला त्यांचाच चेहरा आठवतो.