तो काळ काही वेगळाच होता. २००३ चे क्रिकेट विश्वचषकाचे पहिले दोन सामने तर आम्ही शाळेतून लवकर येऊन बघितले होते. आपला संघ खूप चांगला खेळेल या उद्देशाने भारत नेदरलँड सामना बघायला लागलो तर आपण ऑस्ट्रेलिया समोर तर नाही खेळत आहोत ना अशी आपल्या संघाची अवस्था लिंबूटिंबू नेदरलँड समोर झालेली होती. तिथून जी क्रिकेट ची आवड निर्माण झाली ती धोनी साहेबांच्या निवृत्तीपर्यंत कायम होती.
भारत अंतिम सामन्यात पोहचल्यानंतर जीतेगा भाई जीतेगा इंडिया जीतेगा च्या घोषणा सर्वत्र सुरू होत्या. समोर डोंगरावढे लक्ष्य बघितल्यानंतर मात्र आता प्रत्येक षटकात एक सिक्स किंवा एक फोर नाही मारला तर हरलो वर लोकांची चर्चा आली.
हरायला आले तरी शेवट पर्यंत सामना बघायचा हे ठरलेले. मग दुसऱ्यादिवशी सामन्याची चर्चा मित्रांमधे करणे, थोडावेळ खेळणे, कुणी लवकर आउट होत नसेल तर, मित्रांतीलच क्रिकेटचा जरा जास्त ज्ञानी असलेला म्हणणार..
अरे जरा यॉर्कर टाक बे त्याला.
मग तेव्हा यॉर्कर म्हणजे काय ते समजलं.
लेकाचे यॉर्कर टाकण्यापेक्षा पाय सुजविण्याचे जास्त काम करायचे गावचे पोट्टे.
रोजच क्रिकेट खेळायचे असेही नाही. तसे आमचे ठरलेले खेळ म्हणजे,
विष अमृत, नदी की पहाड, लपाछपी, पकडा पकडी इत्यादी.
लपाछपी ची तर मजाच वेगळी असायची.
एखादा मित्र अंगणातील एका भल्यामोठ्या उंच स्टूलवर, जो स्टूल १० फुटापर्यंत उंच होता त्यावर जाऊन बसायचा. म्हणजे लपून बसायचा. त्या स्टूलजवळून जाऊनही ज्याच्यावर राज्य आहे त्याला कुणीतरी स्टूलवर बसला आहे हे दिसायचे नाही.
लपलेला हळूच त्या स्टूलवरून उतरून शोधणाऱ्या व्यक्तीला पकडून पुन्हा त्याच्यावर राज्य आणायचे.
मंडळी तेव्हा स्मार्टफोन नावाचा प्रकार नव्हता म्हणून ही मजा करता आली. तेव्हा मैदानी खेळ स्वतःहून खेळल्या जात. आता मोबाईलच्या गेममधे लागलेल्या मुलांना सांगावे लागते,
जरा उठ की जागेवरून, हालचाल कर जरा स्वतःची.
त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, १२ पर्यंत शाळा आणि १ पासून तर ८ पर्यंत ट्युशन. मग खेळणार कधी.
काळ बदललाय, स्मार्टफोन आला, त्यात विविध प्रकारचे गेम्स आले, मोठमोठे गेमिंग झोन्स सुद्धा आलेत, आता तर ए. आय. पण आले. पुढे आणखीही खूप काही होणार आहे. काळ बदलता राहणार आहे त्यानुसार माणूसही तेवढा बदलणार आहे. आणि त्याने बदलायलाही हवे.
हे सगळ काही होत असताना कुठेतरी अती तर होत नाही ना? हा प्रश्न पण तेवढा स्वतःला विचारता आला पाहिजे.
बदलाला विरोध नाही आणि बदलणाऱ्याला सुद्धा नाही.
पण आपण काय गमावतोय याचाही विचार व्हायला पाहिजे.