१.
स्वागत २०२६ .
नवीन वर्षाचे स्वागत सुरपाखरू समूहातील माझ्या पहिल्या लेखाने करत आहे—हीच माझ्यासाठी आनंदाची आणि नकळत एका जबाबदारीची सुरुवात आहे. प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण अनेक प्रण ,निश्चय करतो—काही आरोग्यासाठी, काही नात्यांसाठी, तर काही स्वतःच्या अंतर्मनाच्या विकासासाठी. पण “तेरड्याचा रंग तीन दिवस “ या म्हणीप्रमाणे थोड्याच काळांत या निश्चयाचा आपल्याला विसर पडतो . पण ह्या वेळी मी निश्चय तडीस नेणारच हे ठरवून या सुरपाखरू मध्ये सलग ३० दिवस दररोज एक लेख लिहिण्याचा संकल्प मनाशी पक्का केला आहे.
मला साहित्यिक लेखन करणे तसेच कविता लिहून आपल्या भावनांना शब्दांत व्यक्त करणे आवडते . तरीही, रोज लिहिणे ही गोष्ट केवळ सवय नसून ती एक साधना आहे, हे मला प्रकर्षाने जाणवते. या ३० दिवसांच्या लेखनप्रवासातून माझ्या लेखनाला शिस्त लागेल, विचारांना स्पष्ट दिशा मिळेल आणि शब्दांशी असलेले नाते अधिक प्रगल्भ होईल. रोज लिहिताना विषय शोधण्याची सवय लागेल, आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याची दृष्टी अधिक संवेदनशील बनेल असा विश्वास मला वाटतो .
सुरपाखरू सारख्या वाचकस्नेही, सकारात्मक आणि साहित्यप्रेमी समूहात लेखन करताना वाचकांचा प्रतिसाद, प्रतिक्रिया आणि संवाद यांमुळे आत्मविश्वास वाढेल. टीका-प्रशंसेच्या आरशात स्वतःच्या लेखनाचे नवे पैलू समजतील. कधी कविता, कधी ललित लेख, कधी चिंतनपर लेखन—अशा विविध प्रकारांतून माझ्या लेखनाची व्याप्ती नक्कीच विस्तारेल.
हा उपक्रम केवळ लेखनाचा नाही, तर आत्मसंवादाचा, आत्मशोधाचा आणि आत्मविकासाचा आहे. नवीन वर्षात स्वतःला दिलेली ही प्रतिज्ञा—३० दिवस, ३० लेख—माझ्या साहित्यिक प्रवासाला नवी उंची देईल, याची मला खात्री आहे. सुरपाखरू सोबत हा प्रवास सुरू करताना मनात उत्साह आहे, कृतज्ञता आहे आणि शब्दांवर अधिक प्रेम करण्याची नवी उमेद आहे.
या निमित्ताने नव वर्षाचे स्वागत करणारी माझी एक कविता इथे देऊन मग मी माझ्या ह्या लेखाची सांगता करत आहे .
बघता बघता वर्ष हे सरले
सुखदुःखाचे गीत बहरले
तप्त काहिली कधी जाहली
कधी मनी चांदणे बरसले
सहनशीलता कधी व्यापिली व्याकुळलेल्या मना
हर्षाने मी कधी नाहले,झाल्या उल्हसित भावना
नवी मी घडले ,कधी धडपडले
झटकूनी दुःख हसूनी उठले
या वळणावरी आयुष्याच्या
नवे गीत मी गाऊ लागले
तुमच्या माझ्या भावनांची आज उजळणी करू
आपण सर्व मिळूनी आता ,
नववर्षाची आस धरू
देवापुढती पवित्र निरांजन आशेचे लावू,
आशिष त्याचा सदैव असू दे ,
असे मागणे मागू .
झाले गेले गंगेस मिळाले
नको शोक तू मना करू
नव वर्षाच्या स्मित सुमनांची
सुगंधी ओंजळ हृदयी भरू
बघता बघता हे वर्ष सरले
सुखदुःखाचे गीत बहरले .
सुषमा ठाकूर
भोपाळ.
1/1/26