लहानपणी ओळख झालेला आणि आता सहसा दुर्मिळ झालेला हा प्रकार ….
अतिशय बुद्धी चातुर्य, भाषालालित्य अन शब्दप्रभुत्वाचं अमोघ दर्शन घडवून आणणारा….
सहसा एखाद्या राजाच्या दरबारात एक ओळ दिली जाई. उदाहरणार्थ ….. “सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे” म्हणजे विधवेच्या कपाळी कुंकवाचा टिळा. त्या काळी अत्यंत आश्यर्य चकित करणारी अशी एखादी घटना असे किंवा अगदी निरर्थक चरण दिला जाई, उदा. “ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:” आणि शीघ्र कवींना आव्हान दिले जाई.
आणि उपस्थित कवींना आव्हान असे की ह्याला धरून कमीत कमी चार चरणांचा एक बंध लिहावा. ह्यात दिलेली ओळ यावी पण कुठेही अर्थाचा अनर्थ नसावा. सर्व श्लीलाश्लीलतेचे, सामाजिक नीतिनियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. तयार बन्ध हा आनंदायी व चमत्कृतीपूर्ण असावा. शक्यतोवर सहजस्फूर्त परंतू निरर्थक नसावा.
आता उदाहरणादाखल सांगायचं झाला तर “सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे”…. ह्यासाठी कवी लिहितात.
किं भूषणं सुन्दर सुन्दरीणाम ।
किं दूषणं पान्थ जनस्य नित्यम ॥
कस्मिन विधात्रा लिखितम जनानाम ।
सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे ॥
अर्थ : सुंदर स्त्रियांचे भूषण काय असते? वाटसरूंना तक्रार, अडथळा काय? विधाता लोकांचे भविष्य कोठे लिहितो? कुंकवाचा टिळा विधवेच्या कपाळी.
काय सुंदर रचना आहे बघा… पहिले तीन चरण प्रश्न आणि शेवटाला चरण उत्तर…. सुंदर स्त्रियांचे भूषण काय असते? सिंदूर. वाटसरूंना तक्रार, अडथळा काय? विधवेचे दर्शन.(आधी अशुभसूचक मानले जात असे.) विधाता लोकांचे भविष्य कोठे लिहितो? कपाळावर.
ह्याचेच मराठीकरण करून कवी म्हणतो,
नमीत होती विधवा शिवाला
मसूर डाळी लगे कपाळा
ते पाहुनी विस्मय फार वाटे
सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे
दुसरं बघायचं तर…. “ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:”
राजा भोजाने एकदा पाहिले की सेविकेच्या हातातून पाण्याची घागर पडली आणि त्यातून आवाज झाला. त्या आवाजावरून त्याला एक कल्पना सुचली.
त्याने दरबारात आव्हान दिले –
“ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:”
या ओळीवर श्लोक रचून दाखवा.
विद्वानांना अर्थ कळला नाही, पण कालिदासाने ओळखले की हा आवाज घागर पडल्याचा आहे. त्याने कल्पनाशक्ती वापरून रामायणातील प्रसंगावर श्लोक रचला –
रामाभिषेके जलमाहरंत्या। हस्ताच्युतो हेमघटो युवत्या:।।
सोपानमार्गेण करोति शब्दम्। ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:।।
रामाच्या अभिषेकासाठी एक युवती सोन्याची घागर घेऊन येत होती. तिच्या हातातून ती निसटली आणि जिन्यावर पडताना आवाज झाला – ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:.
अशी अनेक उदाहरणे आहेत. वानगीदाखल १ देतो.
गणपतिमुनिंला वंगदेशातील नवद्वीप येथे झालेल्या पंडितपरिषदेत कवित्वपरीक्षेत एक कठीण समस्या दिली गेली होती –
“स्तनवस्त्रं परित्यज्य वधू श्वशुरमिच्छति”
(सूचना: किं त्वनवद्यचरिता – म्हणजेच वधूचे चरित्र निर्दोष राहिले पाहिजे).
गणपतिमुनिंची समस्यापूर्ति:
त्याने ही समस्या अशा रीतीने पूर्ण केली –
“हिडिम्बा भीमदयिता निदाघे घर्मपीडिता।
स्तनवस्त्रं परित्यज्य वधूः श्वशुरमिच्छति॥”
भावार्थ (सोप्या भाषेत):
उन्हाळ्याच्या उष्णतेने त्रस्त झालेली हिडिंबा (भीमाची पत्नी) आपले स्तनवस्त्र बाजूला ठेवते. ती श्वशुराची इच्छा करते, तिचे श्वशुर म्हणजे भीमाचे पालकपिता पवनदेव… वारा. गार वाऱ्यामुळे गर्मीपासून आराम होईल अशी तिची अपेक्षा आहे.