दिवसभरात जसा वेळ मिळेल तसा ते ज्यांना सोबत न्यायचे आहे त्यांच्यासोबत फोनवर बोलून घेतात. त्यांचे जावई आणि मुलगी यांना कधीही शक्य असते मात्र मुलगा आणि सून यांचे ऑफिस आणि मुलांच्या शाळा यामुळे त्यांचे येणे शक्य होणार नाही असे ते कळवितात. तेव्हा सुमनबाईंना मात्र याचे वाईट वाटते. त्या नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया देतात.
काय यांचं नेहमीचेच आहे अहो, कधी तब्येत बरोबर नाही, कधी सुट्या नाही. आपली प्राजक्ता आणि जावई बघा त्यांनी काहीही कारण सांगितले नाही.
सुमनबाई, राकेशला खरचं येणे शक्य नाही आणि मुलांना कुणाकडे ठेवतील ते. प्राजक्ता तरी मुलांना त्यांच्या काकूंकडे सोडुन येऊ शकते. राकेशला आणि सुनबाईंना नाही म्हणवल्या जात नव्हते. पण त्यांचा नाईलाज आहे. आता मला या गोष्टींवरून क्रिया प्रतिक्रिया नकोत असे म्हणून ते स्वतःच हा विषय थांबवितात.
लहान मुलगा विजय बाहेरगावी शिक्षणासाठी असल्याने त्याच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून त्याला न बोलविता त्याला फक्त तशी कल्पना द्यायची असे सांगायचे ठरते. त्यानुसार लक्ष्मणराव विजयच्या होस्टेलला फोन करून त्याच्याशी बोलून घेतात. तेव्हा विजयला खूप आनंद होतो. त्याच्या नेहमीच्या गमतीच्या स्वभावानुसार तो म्हणतो,
बाबा, संजय दादाला मुलगी पसंत न आल्यास माझ्याविषयी सांगाल त्या मुलीकडच्यांना.
एक काम करायचं का विज्या, संजय ऐवजी तुझा नंबर लावून देऊ. तू येऊन जा गावी. लक्ष्मणराव गमतीने विजयला म्हणतात..
हो चालेल ना, का नाही.
काय चालेल रे गाढवा.. तुला खूपच लग्नाची घाई झालेली दिसतेय.
बाबा, तुमचा आवाज आईसारखा का येतोय.
अरे आईच बोलते मी,
म्हणजे तू बाबांच्या आवाजात बोलत होतीस का?
तू ये इथे तुला सांगते, आईची गम्मत घेतो का रे..
सॉरी सुमनआई, जरा जास्त गम्मत घेतली की तुझी.. ठेऊ का फोन ..
अरे कसली घाई आहे तुला फोन ठेवण्याची.. तू ठीक आहेस ना, अभ्यास बरोबर कर रे राजा, असे म्हणून एकाएकी सुमनबाईंचे डोळे भरून येतात. त्यांना बोलणे सुचत नाही.
आई काय झालं…
अरे विज्या तुझी आई जरा भावुक झाली. तू जरा घरापासून खूप दूर असतो तर एवढ्या दिवसांनी बोलणे झाल्यावर साहजिक आहे ते.
आणखी काही दिवस मग मी येणारच आहे तिकडे, आणि सणावाराला चक्कर असतोच ना माझा..
हो रे.. पण आई ना ती, आई आईच असते शेवटी.
हो बाबा बरोबर आहे तुमचं
बरं मग बाबा माझं कॅन्सल, दादाचं लावून द्या आधी लग्न. त्याचे अनुभव बघून करायचं का नाही ते बघूया.
अरे विज्या त्याचे काय, तुझ्यासमोर माझे स्वतःचे आणि राकेश चे अनुभव आहेत ना.
हो हो बाबा बरोबर आहे.. पण म्हणतात ना बाबा..शादी का लड्डू खाये तो भी और ना खाये तो भी पछताना पड़ता ही हैं।
तू खूप अनुभवी असल्यासारखा बोलतोय रे विज्या, माझ्या शहरातल्या खबऱ्यांना लावावे लागतील तुझ्या मागे असे वाटतेय आता.
विजय हसायला लागतो आणि पुन्हा एकदा थोडावेळ आईसोबत बोलून फोन ठेवतो.
तर मग राकेशचे बाबा, गुरुवारचे करू या आपण जाण्याचे नियोजन. तसे प्राजूला पण सांगून देते पुन्हा एकदा फोन करून, म्हणजे उद्या दुपारपर्यंत जावई आणि प्राजु येतील. परवा दुपारपर्यंत आपल्याला समुद्रपुरकरांकडे जायचे आहे. तर त्या दृष्टीने तयारी करू या.
पण सुमनबाई तुझ्या डोक्यात आता काही त्या मुलीच्या रंगाविषयी किंतु परंतु नाही ना. लक्ष्मणराव सुमनबाईंकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
तिथे गेल्यावर बघू ना अहो,
ठीक आहे, पण जर संजयला मुलगी पसंत आली आणि सगळे व्यवस्थित जुळून आले तर मधात खोडा नको.
हो हो माझ्या पांडुरंगा, समजलं मला तुम्हाला काय म्हणायचे आहे ते.
एक काम करूया ना आपण, संजयचे लग्न त्या मुलीशी लावून गुरुवारीच मोहीम फत्ते करू या.
हो हो तू म्हणशील तसे सुमन.
धन्य आहे गुरुजी तुम्ही.. लक्ष्मणरावांसमोर हात जोडून सुमनबाई उभ्या राहतात.
सायंकाळी संजय घरी आल्यावर गुरुवारी आपण जायचे म्हणून त्याला लक्ष्मणराव सांगतात. त्या दृष्टीने राम्या पाटीलच्या मोठ्या गाडीने जायचे की बसने यासाठी ते संजयचा सल्ला घेतात.
बाबा आपण पाटलांच्या गाडीने जाऊया, जातांना लवकर पोहचायला हवे. ते बसचे थांबत थांबत जाणे आणि आपल्याला वेळ होणे ठीक नाही होणार.
हो रे बाळा संज्या, वेळ नको व्हायला, तुझी होणारी बायको वाट पाहत असेल तिकडे. सुमनबाईं गमतीने संजयला म्हणतात.
संजय त्यावर काही न म्हणता वडिलांशी बोलायला लागतो.
आपल्याला आता पाटील, कुळकर्णी यांना परवाच्या कार्यक्रमाविषयी सांगायला पाहिजे म्हणजे तसे पाटील पण तयार राहतील आणि कुळकर्णी काका सुद्धा मुलीकडच्यांना सांगून देईल.
अरे, मास्तरांना सांगितलंय मी.. आणि पाटलांना पण कल्पना दिली. फक्त तुझा सल्ला तेवढा घ्यायचा होता. तर त्याला पण फायनल करून टाकुया .
तर अशाप्रकारे संजयकरता मुलगी बघायला जाण्याचा कार्यक्रम आखला जात होता. लक्ष्मणरावांना यावेळेस संजयचे लग्न जुळेल याची खात्री वाटायला लागली होती.
क्रमशः