Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

‘तंबोरा’ एक जिवलग…..२

गौरीबाई गोवेकर जुलै 9, 2026
0
gumohor-water
मागच्या लेखात तंबोर्‍याबद्दल माहिती लिहिली ती तंबोर्‍याची निमिती, जडणघडण आणि भाग या संबंधीची होती. आज जे लिहिणार आहे ते मला आलेल्या तंबोर्‍यासंबंधीच्या अनुभवाविषयी. लहानपणी तंबोरा हातात आला तो परंपरेनं. आई गायची म्हणून. मला खरं म्हणजे शिकायचं होतं. गाणं करायचं नव्हतं पण शिक्षणाचे वातावरण नव्हते. मला शिकवण्यासाठी फारशी उमेदही कुणी दाखवली नाही. कुणी म्हणजे आईनेच. तिचे आपले एकच ” तू गाणंच कर व्यवस्थित” तोच आपला पोटापाण्याचा व्यवसाय. स्वराला पक्की होतेच, गळ्यात गोडवाही होता. बुद्धी तेज चालायची. हे सगळं गाण्याच्या पथ्यावर गेलं आणि शिक्षण राहिलं. गंडा बांधला. रीतसर शिक्षण सुरू झाल ते भेंडीबाजार घराण्याचं. आई गाताना मागे तंबोर्‍यावर बसणं सहाजिकच होतं. एका बाजूला मी आणि दुसरीकडे अक्का. पण ती गात नव्हती. शिकतही नव्हती. तंबोरा वाजवता वाजवता आईबरोबर गायला लागले. खां साहेब तालमीला आले की सुरूवातीला तेच तंबोरा सुरात लावून देत. माझा सूर काळी पाचचा. उंच. आईचा नैसर्गीक चारचा होता. हळूहळू खां साहेबांनी तंबोरा लावायचा कसा हे शिकवलं. ज्या सुरात लावायचा तो आधी आपल्या डोक्यात हवा. गळ्यातून काढता यायला हवा. सर्वप्रथम मधल्या दोन तारा लावायच्या. त्यातली एकच आधी आपल्या स्वराला लावायची. ती लागली की मग दुसरी लावायची. एकदम दोन्ही तारा लावायला घ्यायच्या नाहीत अशी त्यांची ताकिद होती. गळ्यातून आपला स्वर काढावा मग तार त्या स्वराच्या वर आहे की खाली हे पहावे. तारेचा स्वर वर असेल तर त्या तारेची खुंटी किंचित सैल करायची. खाली असेल तर पिळायची. आधी नुसत्या खुंटीनेच स्वर लावता यायला हवा. मणी, दोरा हे सगळे नंतर. षड्जाच्या जोडीपैकी एक तार चांगली सुरात लागली की मग दुसरी तार त्या लागलेल्या तारेशी जुळवायची. दुसरी तार लावताना पहिल्या तारेच्या स्वरात काहीही बदल करायचा नाही. ” जर दोन्ही तारा एकावेळी लावत बसलीस तर जन्मात लागायचा नाही तंबोरा ” अशे खां साहेब म्हणायचे. ते खरंच आहे. वाजणार्‍या दोन स्वरांचा तुलनात्मक अभ्यास इथं महत्वाचा आहे. एका स्वरापेक्षा दुसरा स्वर खाली आहे की वर हे लगेच कळायला हवे. “बेटी सूर पहले भेजे मे होता है बाद मे गले मे” असे ते म्हणायचे. खुंट्यांच्या सहाय्याने जोड तारा लागल्या की लावायची ती पहिली तार. तिथं रागाप्रमाणे पंचम किंवा मध्यम किंवा धैवत लावायचा. या साठी बाजाच्या पेटीची मदत घेतलेली आजिबात चालत नसे. लागलेल्या षडजावरून खालचा पंचम लावता यायलाच हवा. षड्ज पंचमाचं नातं असतं गाण्यात. एक बोलायला लागला की दुसरा आपसूक बोलतो डोक्यात. तो तारेने जुळावायचा. हे जुळवताना श्रुतींचं भान ठेवायला लागतं पंचम एखाद दुसरी श्रुती वर खाली लागला तर लगेच कळायला हवे. पंचम लागला की षडजाची जोडी पुन्हा मण्यांद्वारे सारखी करायची. बारीक काम बोटाने मणी खालीवर सरकवताना स्वरात फरक पडता कामा नये. फक्त श्रुतींचा फरक करायचा. स्वराचा नव्हे. हे झाले की मग पुन्हा पंचमाच्या श्रुती लावायच्या नीट. अशा या तीन तारा लागल्या की खालच्या जव्हारीवर प्रत्येक तारेत घालतेले सूत खालीवर करून लागलेल्या स्वरांना गुंजन द्यायचे. असे तीन स्वर गुंजायला लागले की खर्जाकडे वळायचे. (खां साहेव खरज म्हणत) खर्ज म्हणजे खालच्या सप्तकातला षड्ज. मधल्या जोड तारेचाच स्वर फक्त खालच्या सप्तकातला. हा निट लागला की तारांच्या एकत्रीत छेडण्याने गंधार उमटतो आपोआप. तो गंधार पंचमात मिसळला की रिषभ मिळतो. तो रिषभ खर्जात मिसळला की धैवत मिळतो. धैवत आणि षडजाच्या मीलनातून मध्यम मिळतो. मध्यम आणि षडजातून निषाद. अशा प्रकारे सगळे सातही शुद्ध सुर मिळतात. खां साहेबांनी तालिम कधीच बाज्याच्या सुरांवर घेतली नाही. बाज्याचे काम मैफिलीत. एरवी तंबोराच. तंबोरा निट लागला की गाणार्‍याच्या चित्तवृत्ती आपोआप खुलतात. चित्त एकाग्र होते. गळा षडज लावायला उतावीळ होतो. तंबोर्‍याचे गुंजन वाढत वाढत स्वरांची वलयं मोठी मोठी होतात आणि गळा 'आकार' लावतो. शुध्द निरागस सूर. निराकार. तंबोर्‍याच्या सुरात जादू आहे. सुरात एकाबर हुकूम लावलेल्या दोन तंबोर्‍यापैकी एक छेडला की दुसरा आपोआप छेडला जातो. स्वर मात्र तंतोतंत जुळलेले हवेत दोघांचेही. हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. अनुभवले आहे. अतिषयोक्ति आजिबात नाही. लहान मूल बोलायचं वय उलटून गेलं तरी बोलत नसेल तर त्याच्या समोर सुरात लावलेला तंबोरा छेडावा. काही दिवसात बोलू लागतं. तंबोर्‍याच्या गुंजनाने घरात काही बाधा असेल तर ती जाते. बाधा म्हणजे तिथं काही  अतृप्त आत्म्यांचा वास असेल तर ते पळतात. आणखी एक मज्जा. पावसाळ्यात दही लागत नाही नीट. विरजण लाऊन दह्याचे भांडे तंबोर्‍याजवळ ठेऊन तो दहा पंधरा मिनिटे छेडावा छान दही लागते. एकदा एका मैफिलीत माझा तंबोरा काही केल्या लागेना. सगळे उपाय झाले. तारा कुरवाळल्या. दोरे खालीवर केले. खुंट्या पिरगाळल्या. आजिबात म्हणता आजिबात स्वर लागे नाही. नेहमी दोन श्रुती वर नाहितर दोन श्रुती खाली लागायचा. हैराण झाले. रडायची पाळी आली. या संबंधी पुढच्या लेखात सांगते. 



गौरीबाई गोवेकर.

लेखक

  • गौरीबाई गोवेकर
    गौरीबाई गोवेकर

Post navigation

Previous: ‘तंबोरा’ एक जिवलग….१
Next: गझल – एक हृदयस्पर्शी प्रवास भाग १
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.