माझे शालेय शिक्षण १९७०-७६ ह्या कालखंडातील ,नागपूरच्या तेव्हाच्या प्रसिद्ध हडस शाळेतील,जेथे सर्वश्री पी .पी .जोशी, मस्कर, एकताटे, लाडकर ,सहस्रबुद्धे असे एकावर एक ताण असलेले आमचे शिक्षक होते.एकतर आमचे हे सर्व शिक्षक शिकवण्या विरोधी होते, शिवाय ते शाळेतच आमच्याकडून इतके करवून घ्यायचे, की आम्हालाच बाकी मित्रांच्या शिकवण्या घेण्यासाठी आमंत्रण असे .एव्हाना दहावी पर्यंत शिकवणी लावणे , अशी पद्धतीच नसायची .नंतरची दोन वर्षे मी धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात होतो,जेथे माझे मोठे भाऊ स्वतः वाणिज्य शाखेत शिकवायचे , त्यामुळे मला शिकवण्यासाठी तेथील शिक्षकाकडेच जायची मोफत सोय आणि सक्ती होती. त्यामुळे मी माझ्याच मनाने गणित,केमिस्ट्री आणि फिज़िक्स या तीनच विषयात शिकवण्या घेतल्या होत्या .
गणित विषयात शिकवणीसाठी मी , माझे मावस भाऊ विनायकदादाकडे जात असे . पण त्यासाठी काही पक्की काळवेळ नसायची .वाटले तर जायचे,नाहीतर नाही, पण दादा कधीच काही बोलत नसे. शिकवणीसाठी दादा नेहमी पाटी आणि लेखन वापरायचे ,ती पुसायच्या आधी समजले तर ठीक , नाहीतर दुसरी काही सोय नसायची . बरेच वेळा तेथे माझी वहिनी दादासोबतच मला काहीतरी खायला द्यायची , अशी ही माझी गणिताची घरगुती शिकवणी होती .
केमिस्ट्री साठी श्री.पळसोदकर सर माझी शिकवणी घ्यायचे.त्यांच्याकडे माझ्यासोबत अजून ४-५ विद्यार्थी असायचे.त्यांच्या घरी समोरच्या १०X१२ च्या खोलीत सोफासेटवर आम्ही दाटीवाटीने बसायचो .सर घरी असल्यामुळे की काय, पण खूपच हळू आवाजात आणि जलद गतीने बोलायचे , तेथेही समजले तर ठीक, नाहीतर परत विचारायची सोय नसायची .रोज एक प्रकरण शिकवायचे आणि १५-२० दिवसातच आमचा कोर्स पूर्ण व्हायचा .
फिज़िक्ससाठी मला धन्तोली येथील परांजपे सर शिकवायचे. मी सायकल चालवत रामनगरहून तेथे एकटाच जात असे ,पण सर सहसा घरी नसायचे. मग मी त्याच्याच घरी खाली अंगणात तेथील मुलांसोबत खेळत बसायचो . सर आले तर माझी शिकवणी ह्यायची , नाहीतर खेळणे झाले की , परांजपे मॅडमला सांगून मी वापस जात असे. कधी कधी मॅडम काही तरी काम सांगायच्या आणि बदल्यात खाऊ मिळायचा. येथील शिकवणी म्हणजे फक्त गप्पा असायच्या ,त्यातून जे शिकायचं ते आपल्याला शिकावे लागत असे, बाकी सगळाच आनंद.
आजच्या काळातील एयर कंडीशन शिकवणी वर्ग ,त्यासाठी लाखो रूपये फी, बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह,जेवणासाठी मेस, नेण्या आणण्याची सुविधा ,टेस्ट सीरीज आणि अश्या शिकवणी वर्गात होणाऱ्या आत्महत्या , असे आमच्यावेळेस काहीही नव्हते. आजचे विद्यार्थी शिकवणी घेऊन किती ताण घेत असतात आणि आमच्यासाठी शिकवणी ही तर एक सहल असायची ,हसत खेळत शिकण्याची .