नवीन वर्ष सुरु होण्याच्या काही दिवस अगोदर आपण ठरवतो म्हणजेच संकल्प करतो कि, आपण नवीन वर्षात काय काय केले पाहिजे. आपल्यापैकी काहींचे ते पूर्ण होतात, तर काहींचे नाही. कारण काय तर त्यात निरंतरतेचा अभाव आणि नियोजनाची कमी.
कधी कधी तर कुणाच्या तरी इन्फ्लुएन्स मध्ये येऊन नववर्षामधे काय केले पाहिजे याचा संकल्प केलेला असतो. तो किंवा ती जे करते ते आपण करावं असं ठरलं असतं.
बरेच संकल्प ७ दिवस किंवा जास्तीत जास्त १० ते १५ दिवसापर्यंत टिकतात. मग होत असं कि, चला आता गुढीपाडव्यापासून काही तरी करूया म्हणून पुन्हा पुन्हा तेच होऊन जाते जे होत गेले आहे. नवीन वर्षाचा एक एक महिना मागे मागे जाऊन ते वर्ष जुने होऊन पुन्हा एक नवीन वर्ष लागतं. पुन्हा संकल्प … पुन्हा तेच … असं कित्येकांच्या आयुष्यात घडलेलं आहे.
काहींनी चुका सुधारून जे संकल्प केलेत ते पूर्णही केले आहे. तर त्यांनी काय केले असेल किंवा करत असतील हा एक मोठा प्रश्न पडतो. सोपी गोष्ट आहे. त्यांनी एका एका पायरीचा, पावलांचा विचार केला. काही भली मोठी सुरुवात करण्यापेक्षा काहीतरी छोटचं करायचं, नियोजनानुसार आणि निरंतरतेने करायचं, हे त्यांनी ठरवलं.
जसं कि आपल्याला व्यायामाची सुरुवात करायची आहे, काही विशिष्ट विषयांवरची पुस्तके वाचायची आहे, काहींना वाईट व्यसन सोडायचे असते, तर सकाळी लवकर जागे होणे हि पण चांगली सवय आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्यावर आपण थोडे थोडे जरी कार्य केले तरी जे वर्षभरासाठी ठरविले आहे ते पूर्ण करता येते.
असं म्हणतात कि, एखादी सवय आपण स्वतःला लावून घेत असू तर निरंतरतेने २१ दिवस त्यावर कार्य केले तर ती सवय आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते.
जर व्यायाम नियमितपणे सुरु करायचा असेल तर, अगदी १० मिनिटांपासून सुरु करून आपण त्याला हळू हळू ३० ते ४५ मिनिटापर्यंत नेऊ शकतो. एकदम ३० किंवा ४५ मिनिट्स याचा विचार कराल तर २ ते ३ दिवसात आपल्याला कंटाळा यायला लागतो. उदाहरण म्हणून आपण सूर्यनमस्काराचं बघूया.
असं म्हणतात कि रोज १२ सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. पण ज्याला सुरुवात करायची आहे त्याला रोज एक एक वाढवून १२ दिवसांत १२ पर्यंत नेता येईल. किंवा ज्याच्या त्याच्या सोयीनुसार हे करून प्रत्येकाने सहज साध्य करता येतं.
पुस्तकांच्या बाबतीतही तसचं. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचायचं.अमुक संख्येतच पाने वाचल्या गेले पाहिजे हा दबाव स्वतःवर टाकण्यात अर्थ नसतो.
हेच सर्व बाबतीत लागू होते. फक्त निरंतरता महत्त्वाची. ते म्हणतात ना “स्मॉल थिंग्स अँड कन्सिस्टंसी आर ऑलवेज बेटर फॉर सेल्फ ग्रोथ”
तर सुरुवात करताय ना … आम्ही तर केलीय #३०दिवसात३० ची
#सुरपाखरु #प्रयोग२०२६
वैभव शिरखेडकर
दिनांक – ०१/०१/२०२६