Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

परिक्षा पद्धतीतले कालसुसंगत बदल

राम किन्हीकर जानेवारी 19, 2026 1 minute read
0
gumohor-water
प्राध्यापकी पेशात एखाद्या हाडाच्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवणे, विद्यार्थ्यांमध्ये रमणे जेव्हढे आवडते तेव्हढेच त्या शिक्षकाला दोन गोष्टी अत्यंत टाळाव्याशा वाटतात. पण गंमत अशी आहे की टाळाव्याशा वाटणा-या या दोन्हीही गोष्टी त्याच्या पेशाचा अविभाज्य अंग असल्याने त्याने कितीही टाळाव्या म्हटल्यात तरी तो टाळू शकत नाही. त्या दोन गोष्टी म्हणजे
अ) परिक्षांदरम्यान पर्यवेक्षण करणे (Invigilation Duty)
आ) परिक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणे
माझ्या माझ्या बाबतीत मी या दोन्हीहीवर उतारा काढलाय. पर्यवेक्षण सुरू असताना जे आवश्यक काम आहे (परिक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांवर सह्या, बारकोडस चिटकवणे, परिक्षाविषयक इतर नोंदी करणे वगैरे) ते साधारण अर्ध्या तासात संपवून उरलेला दीड. अडीच तास हा अगदी आपला आपला वेळ असतो. या वेळात मी माझ्या लिखाणासंबंधी चिंतन करतो. एखादे टिपण घ्यावेसे वाटले तर जवळच्या छोट्या डायरीत टिपून घेतो. मनात खूप दिवसांपासून घोळत असलेल्या एखाद्या कल्पनेचा विस्तार करायचा असेल तर या वेळासारखा दुसरा वेळ नाही. हा वेळ मी असा सत्कारणी लावतो.
आणि परिक्षा झाल्याझाल्या पेपर्स तपासून घेतले म्हणजे मग पेपर तपासणीचे कामसुद्धा कंटाळवाणे होत नाही हा माझा अनुभव आहे. अशा प्रकारे शिक्षकी पेशातल्या या टाळाव्याशा वाटणा-या पण टाळता न येणा-या बाबींवर मी माझा माझा तोडगा काढलेला आहे.
या पर्यवेक्षणादरम्यान माझ्या मनात या परिक्षा पद्धतींबाबत कायमच एक प्रश्नचिन्ह तयार होत असते. आजची आपली पारंपारिक परिक्षा पद्धती ही कालबाह्य होतेय का ? आणि होत असली तर सर्वांनाच हे पटूनही त्यावर उपाययोजना का होत नाही ? हा मला पडलेला मोठ्ठा प्रश्न आहे.
पाठांतरावर आधारित परिक्षापद्धतीला माझा विरोध नाही. ज्या ज्या देशांनी, संस्कृतींनी पाठांतरावर आधारित परिक्षापद्धतीला पहिल्यापासून झुगारून दिलेले आहे त्यांच्या शिक्षणपद्धतीचे काय हाल झालेत ? ते आपण आज बघतोय. पाठांतरावर आधारित परिक्षा पद्धती हवीच पण ती पदवीला प्रवेश घेईपर्यंत. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा मेंदू पाठांतरावर छान तयार व्हायला हवा.
पदवी परिक्षेत मात्र पाठांतरावर भर नकोय. पदवीच्या अगदी पहिल्या वर्षापासूनच. पदवी मिळवतोय म्हणजे जो विषय आपण पदवीसाठी निवडलाय त्यात मला कौशल्य प्राप्त करायचेय. मग त्यात आपली पारंपारिक परिक्षा पद्धती थिटी पडतेय असे मला ठामपणे वाटत आलेले आहे. या सर्व परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठांतर परिक्षे ऐवजी त्यांनी त्या विषयातले किती कौशल्य अर्जित केले याचे मूल्यमापन व्हावे असे मला वाटते. आणि आजचा काळ हा सर्वार्थाने या सर्व बदलांसाठी अनुकूल असताना तर हे करणे अत्यंत सोपी आहे. फ़क्त कुणीतरी तसा ठाम निर्णय घेऊन तसे पाठबळ या नवविचारांना द्यायला हवे.
कोरोना काळात घरी बसल्या बसल्या, महाविद्यालयात रोजचे जाण्यायेण्याचे तास वाचल्याने, फ़क्त थेअरी लेक्चर्स घ्यायचे असल्याने प्रात्यक्षिकांचे तास वाचल्याने उरलेल्या वेळात आपल्यापैकी ब-याच जणांनी Coursera सारख्या ऑनलाईन माध्यमावर अनेक विषय शिकले. मी पण त्यातलाच एक होतो. माझ्या विषयाव्यतिरिक्त मी अनेक नवीन तंत्रज्ञान त्या माध्यमातून शिकलो. त्या अभ्यासक्रमात अनेक तज्ञांची व्हिडीयो लेक्चर्स असतात, त्यांच्या नोटस दिलेल्या असतात. आपण ते बघायचे आणि आपल्याला कळलेय की नाही हे बघायला त्यांच्या परिक्षा द्यायच्यात. परिक्षा पण ऑनलाईनच. परिक्षेदरम्यान त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपण त्यांचे व्हिडीयो बघू शकतो, नोटस वाचू शकतो. कारण शेवटी ही परिक्षा आपल्या आकलनाची असते आपल्या पाठांतराची नव्हे. आणि परिक्षेतले प्रश्न सुद्धा नोटस वाचून, व्हिडीयोज पाहून त्यातून थेट उत्तरे देण्यासारखे नसतात. परिक्षेतले प्रश्न सुद्धा आपल्या आकलनावर आधारित असतात आणि ब-याचशा विषयांमध्ये पास होण्यासाठी चक्क ८० टक्के गुण मिळवायचे असतात. समजा एखाद्या दिवशी आपण त्या परिक्षेत तेव्हढे गुण प्राप्त करू शकलो नाही तर पुन्हा २४ तासांनीच ती परिक्षा पुन्हा द्यायला मिळते तोपर्यंत तो पेपर आपल्या कॉम्प्युटरवर पुन्हा उघडत नाही. २४ तासात पुन्हा तेव्हढे ज्ञान प्राप्त करायचे, तेव्हढे आकलन प्राप्त करायचे आणि मग परिक्षा द्यायची. मला ही पद्धत फ़ार आवडली.
आज मी संगणक अभियांत्रिकी, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धीमत्ता वगैरे क्षेत्रातले विद्यार्थी आजच्या पारंपारिक परिक्षा पद्धतीत प्रोग्रॅमिंगचे पेपर्स लिहीताना बघितले की त्यांची, त्यांचे पेपर्स तपासणा-यांची आणि या एकूणच परिक्षा पद्धतीची कीव येते. एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम कागदावर लिहीताना तो नीट चालतोय की नाही हे त्या विद्यार्थ्याला कसे कळणार ? तो प्रोग्राम बरोबर लिहीलाय की नाही हे त्या पेपर तपासणा-याला तरी कसे कळणार ? हे माझ्यापुढ्चे गहन प्रश्न आहेत. त्यापेक्षा त्यांची अशी Coursera पद्धतीची परिक्षा झाली असती तर तो प्रोग्राम चालतोय की नाही हे त्यांचे त्यांनाच कळले असते. त्यातल्या चुका कशा काढायच्या याचे कौशल्य त्यांचे त्यांनीच मिळवले असते. यात परिक्षकाची भूमिका फ़क्त तसा पेपर देण्याची आणि अशा ऑनलाईन माध्यमात जर व्यवस्थित नियोजन केले तर प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच काठिण्यपातळीचे पण वेगवेगळे प्रोग्राम्स लिहायला सांगता येऊ शकेल त्यामुळे एकमेकांचे बघून लिहीणे वगैरे प्रकार टळू शकतील.
आजकाल तर कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान वापरून अनेक सॉफ़्टवेअर कंपन्या विद्यार्थ्यांची घरबसल्या परिक्षा घेत असतात. एकाच वेळी अक्षरशः हजारो विद्यार्थ्यांची. त्यात त्या विद्यार्थ्याने परिक्षेच्या विंडो व्यतिरिक्त दुसरी विंडो (गूगल, चॅट जीपीटी वगैरेला विचारण्यासाठी) नुसती उघडली तरी त्या विद्यार्थ्याची परिक्षाच रद्द होते. त्या विद्यार्थ्याच्या लॅपटॉप / डेस्कटॉपचा कॅमेरा त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या  हालचाली टिपत असतो. थोडीही संशयास्पद हालचाल, बोलणे त्यात दिसले की एक वॉर्निंग येते आणि त्या वॉर्निंगला भीक न घालता आपण आपले चुकीचे काम सुरूच ठेवले तर त्या विद्यार्थ्याची ती परिक्षा रद्द होते.
हे आधुनिक तंत्रज्ञान आता सर्वत्र उपलब्ध आहे आणि सर्व विद्यापीठांना शैक्षणिक संस्थांना अगदी परवडण्यासारखे आहे. मग आजकालच्या युगातल्या परिक्षा अशा स्मार्ट पद्धतीने का होऊ नयेत ?
नरसी मोनजी विद्यापीठात अध्यापन करीत असताना माझे मार्गदर्शक आणि विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. शरद म्हैसकर आमच्या स्थापत्य अभियांत्रिकीतला एक अत्यंत कठीण विषय शिकवीत असत. भूतंत्रज्ञान अभियांत्रिकी (Geotechnical Engineering). पारंपारिक परिक्षा पद्धतीत या विषयासाठी खूप फ़ॉर्म्युले, खूप डेरिव्हेशन्स, खूप संकल्पना लक्षात ठेवाव्या लागतात आणि म्हणून हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांना डोकेदुखी वाटतो. नरसी मोनजी विद्यापीठात या विषयाची “ओपन बुक” परिक्षा व्हायची. त्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके, नोट्स वापरण्याची मुभा असायची आणि पेपरमध्ये नुसते फ़ॉर्म्युले, डेरिव्हेशन्स न विचारता (नाहीतर विद्यार्थ्यांनी ते सगळे सरळ पुस्तकांमधून पाहून लिहून टाकले असते.) एखाद्या फ़ाऊंडेशनचे डिझाईन करायला विचारले जात असे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांमधून, आय एस कोडमधून त्या डिझाईनची प्रक्रिया बघून दिलेल्या डेटावरून डिझाईन करायचे असायचे. ते विद्यार्थी पदवी घेऊन आपापल्या क्षेत्रात गेल्यानंतर जर त्यांना एखादे फ़ाऊंडेशन डिझाईन करायचे असले तर त्यांच्याकडे संदर्भासाठी पुस्तके, आय एस कोडस असतीलच. फ़क्त त्यांचा वापर करून डिझाईन कसे करायचे ? हे कौशल्य त्यांना त्या अभ्यासक्रमात शिकवायचे आहे. आणि म्हणूनच त्यांची तशी परिक्षा घ्यायची आहे हे माझ्या मार्गदर्शकांनी मला सांगितले होते. किती अभिनव कल्पना ! अभियांत्रिकीसोबतच इतरही सगळ्याच पदवी परिक्षांसाठी या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना शिकवले गेले आणि तशा पद्धतीने त्यांच्या परिक्षा घेतल्या गेल्यात तर विद्यार्थ्यांचा किती कौशल्यविकास होईल, नाही ? नुसते फ़ॉर्म्युले, डेरिव्हेशन्स ही थेअरी लक्षात ठेऊन जर एखाद्या विद्यार्थ्याला ते कुठे आणि कसे वापरायचे हे कौशल्य मिळत नसेल तर परिक्षेत चांगले गुण मिळवूनसुद्धा त्याचा उपयोग कुठल्याही क्षेत्रात त्याला आणि समाजालाही होणार नाही.
आणखी एक मुद्दा. वर्षभर शिकवून वर्षाअखेर एका तीन तासांच्या परिक्षेत त्या विद्यार्थ्याचे ज्ञान जोखण्याची जुनी पद्धती कशाला ? वर्षभर त्या विद्यार्थ्याने महाविद्यालयात किती प्रोजेक्टस केलेत, किती संशोधन केले, किती विविध कौशल्ये आत्मसात केलीत, त्याची आकलन क्षमता किती आहे ? ह्याचे गुणांकन त्या त्या वेळी त्या त्या शिक्षकाने केले तर शेवटी ही परिक्षा घेणे हेच कालबाह्य ठरेल. हे त्या त्या शिक्षकांना हे जोखू द्यात ना. अंतिम तीन तासाच्या परिक्षेचा आणि त्या विद्यार्थ्याने वर्षभर केलेल्या मेहेनतीचा संबंध आपल्याला तोडता येणार नाही का ?
बरे या अंतर्गत मूल्यमापनात हे शिक्षक जर भेदभावपूर्वक वागणूक करीत असतील तर त्यावरही अंकुश ठेवण्याची यंत्रणा अगदी सहज उभारता येऊ शकते. असलेल्या कौशल्यापेक्षा जास्त मूल्यमापन करण्याचे एखाद्या संस्थेने ठरविले आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांचे ओव्हरव्हॅल्युएशन केले तर ती एक केवळ कागदी सूज ठरेल. कारण असे ओव्हरव्हॅल्युड विद्यार्थी जेव्हा नोकरीसाठी त्या त्या कंपन्यांमध्ये, आस्थापनांमध्ये जातील तेव्हा त्यांच्या या फ़ुगवलेल्या गुणांचे पितळ उघडे पडेल आणि त्या त्या महाविद्यालयाची, विद्यापीठाची विश्वासार्हता धोक्यात येईल. याउलट आकसापोटी जाणूनबुजून एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण प्रदान करणा-यांवरही महाविद्यालयांतर्गत, विद्यापीठांतर्गत कठोर अंकुश ठेवण्याची यंत्रणा राबवता येईल.
थोडक्यात काय ? आजची लक्षात ठेवण्याची क्षमता तपासणारी पारंपारिक परिक्षा पध्दती आपल्याला विद्यापीठातल्या पदवी स्तरापासून पुढे नक्की टाळता येऊ शकते. त्याऐवजी विद्यार्थ्यांची कौशल्ये तपासण्याची पद्धती आणायला आजच्या युगात फ़ार श्रम पडणार नाहीत. गरज आहे ती शिक्षणतज्ञांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची आणि त्यांना सरकारमधल्या, विद्यापीठामधल्या, समाजातल्या सर्वच घटकांकडून मिळणा-या अगदी सकारात्मक सहकार्याची.
जायचेय मग पुढे ? करायचीय नव्या युगाला सुरूवात.
आपल्या अनेकविध मतांचे स्वागत.
– गेली अडीच तपे अध्यापन क्षेत्रात असलेला आणि या क्षेत्रात नवे बदल घडवून आणण्यास इच्छूक असलेला
प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
१९ जानेवारी २०२६

लेखक

  • राम किन्हीकर
Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Post navigation

Previous: बुंद से गयी वो …
Next: दोन सबलातील युद्ध “दंद्व”
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.