या मागचे कारण आणि त्यावरील उपाय शोधण्याचा प्रयत्न करताना मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.
मुळात घर असो, शेजार-पाजार असो किंवा समाज – सर्वत्र आपली किंमत किंवा महत्त्व आपण इतरांसाठी कोणते ठोस योगदान देतो त्यावरूनच ठरते .
या योगदानाचे प्रामुख्याने खालील प्रकारांत वर्गीकरण करता येईल:
-आर्थिक योगदान
-शारीरिक योगदान
-बौद्धिक योगदान
लहानपणी आपल्याकडून आर्थिक किंवा बौद्धिक योगदानाची अपेक्षा नसते. पण शारीरिक कामांच्या बाबतीत मात्र आपल्याकडून सहभागाची अपेक्षा असते – मग ते घरातील कामात मदत करणे असो, कौटुंबिक समारंभ असोत किंवा सामाजिक कार्यक्रम. जो मुलगा किंवा जी मुलगी अशा प्रकारे सक्रिय असते, त्याचं कौतुकच होतं , किमानपक्षी दुर्लक्ष केलं जात नाही.
युवा आणि प्रौढावस्थेत अपेक्षा बदलतात. आपल्याकडून पैसे कमवण्याची आणि त्याच वेळी शारीरिक कामांसाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा असते. कुटुंबात पैसे कमवणाऱ्या सदस्यांना सहसा आदराची वागणूक मिळते. त्याच वेळी, घर चालवण्यात मदत करणाऱ्यांनाही – मग त्या गृहिणी असोत, घरकाम करणाऱ्या मदतनीस असोत किंवा इतर कोणी – एक विशिष्ट दर्जा किंवा मान मिळतोच.
जेव्हा आपली कदर केली जात नाही असा मनात विचार येतो तेव्हा आपण स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे – आपल्या वयानुसार अपेक्षित असलेले योगदान आपण देत आहोत का?
आणि जर आपण आपले योगदान देतच असू, तर त्यात आणखी थोडी प्रगती करूया.