अनेक दिवस “मला चप्पल घ्यायची आहे, मला चप्पल घ्यायची आहे” चा जप केल्यानंतर शेवटी एकदाचा योग आलाच. एका नामांकित कंपनीच्या एसी दुकानात मोठ्या नाईलाजानेच शिरले. आमच्या पिताश्रींचा फारा दिवसांचा हट्ट होता की मी त्याच कंपनीची चप्पल घ्यावी. खरं तर भारीतली चप्पल घेतांना खिसा किती हलका होईल हा आमच्या हलक्या मेंदूत उमटलेला पहिला प्रश्न. पण बोलून कोण दाखवणार? बोलून दाखवायला जावं आन् त्यांच्या शब्दसुमनांचा वर्षाव व्हावा – नकोच ते.
मग काय समोर गेल्यावर दरवाजा ढकलावा की ओढावा अशी शंका येता येताच गिळली आन् सूचना वाचून ती कृतीत आणली. मुलगी असूनही आधीपासून मुलांच्या चप्पल वापरल्यामुळे पहिली नजर तिकडेच गेली आन् एक चप्पल तर इतकी आवडून गेली की प्रेमात च पडले मी तिच्या. पण माझं पहिल्या नजरेतलं प्रेम काही फळाला जाण्याची चिन्ह नव्हती. घालून बघितल्यावर त्याची कल्पना आलीच. त्या प्रकरतली सर्वात लहान चप्पल माझ्या पायाला चक्क 2 नंबर ने मोठी झाली. प्रेमभंग का काय म्हणतात तो हाच असावा अशी माझी भावना झाली.
पण हा काही प्रेमभंगाचा पहिला प्रसंग नव्हता. या आधी चप्पल असो व कपडे, माझं नाजुक हृदय वारंवार घायाळ होत राहतं.
असाच एक कपडे घेतानाचा प्रसंग. सामन्यात: मुलं वापरतात तसे टी-शर्ट घ्यायला जावं आन् दुकानदाराने ऐकून न ऐकल्यासारखं मुलींचे, पातळ टी-शर्ट दाखवावे आन् वरून आपल्यालाच ऐकवावं की तो दाखवत आहे तेच कसे चांगले आहेत. बरं आपण आग्रहाने आपल्याला हवे ते निवडले तर त्यातही अगदी गुलाबी वगरे रंग त्याने समोर ठेवावा.
माझ्या वयाच्या मुलींना जेव्हा आईच्या साड्या नेसण्याची इच्छा होत असते तेव्हा मला मात्र माझ्या बाबांचे कपडे चोरावेसे वाटतात. का? कारण ते सुटसुटीत आन् जाड कापडाचे शिवलेले असतात. पण स्त्रीयांसाठी बनलेले कपडे, चपला या मुळात लवकर खराब व्हाव्या या उद्देशाने तयार केल्या जात असाव्यात या शंकेला बऱ्यापैकी जागा आहेच.
मध्यंतरी एका पॉडकास्ट मध्ये ऐकलं की मुलं एका विशिष्ट पद्धतीने वागतात आणि मुली सुद्धा एका वेगळ्या पण विशिष्ट पद्धतीने वागतात यामागे समाज व कुटुंबव्यवस्था सर्वस्वी जबाबदार नाही तर त्यामागे जीवशास्त्रीय कारण आहे. पण हा विचार खूपच खोल पातळीचा आहे, ज्याचा आधार संशोधन आहे.
रोज वापरण्याच्या वस्तु निवडण्याच्या वरवरच्या पण तितक्याच महत्वाच्या विषयाचे काय? कोणी काय घालावे? काय घालू नये? कोणाला कुठल्या पद्धतीने तयार केलेल्या वस्तु बाजारात उपलब्ध असाव्या किंवा असू नये हे कोणी ठरवावं?
दुकानात जाऊन मुलांच्या चपला किंवा कपड्यांची मागणी करताना जरी मी अल्पसंख्य असली तरी आजूबाजूला अनेक अशा मुलींना ओळखते ज्या रोजच्या आयुष्यात फॅशन पेक्षा काम निभावण्यासाठी योग्य अशा वस्तूंची निवड करतात.
मला आवडलेली चप्पल माझ्या मापात उपलब्ध का असू नये? मला आवडलेले कपडे मला सुरुवातीलाच का दाखवले जाऊ नये? पुरुषांच्या शर्ट पॅंट साठी असलेल्या कपड्याची सलवार कुर्ती विकायला का नसावी?
हे वरवर जरी साधे, आन् मूर्खासारखे प्रश्न वाटत असले तरी ते तसे नाही. एखाद्या मुलीने मुलांचे कपडे, चपला वापरण्याचा अट्टहास का करावा हा प्रश्न निर्माण होत असेल तर अमुक एक वस्तु मुलींची, आन् अमुक एक मुलांची हे ठरवण्याचा तरी अट्टहास का असावा? सरसकट सर्व महिला त्याच एका विशिष्ट पद्धतीत तयार झालेल्या वस्तु वापरत असाव्या किंवा त्यांनी त्या तशाच वापराव्या हा अट्टहास तरी बाजारपेठेचा का असावा?? याही प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असलीच पाहिजेत.
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६