विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत जामोदच्या वैद्यकीय सेवा केंद्राने , एव्हाना आपल्या दुसऱ्या वर्षात पदार्पण केले होते. जामोदच्या पंचक्रोशीत आता ते बऱ्यापैकी लोकप्रिय झाले होते. एमबीबीएस असलेला एक डॉक्टर हे सांभाळतो आहे, अशी प्रसिद्धी झाली होती, त्यामुळे दिवसेंदिवस माझे काम वाढत होते,आणि त्या कामांसोबत लोकांच्या अपेक्षा सुद्धा. मी फक्त माझी इंटर्नशिप आटोपून येथे आलो होतो, त्यामुळे कधी कधी माझीही तारांबळ उडत असे, अश्यातील ही एक घटना.
अरे,बामण डॉक्टर यथेच असते काजी ? , बंडोपंत कुलकर्णीच्या अंगणातून एका म्हाताऱ्या आजीचा आलेला घाबरता आवाज. मी तेव्हा त्यांचे घरी , माझे दुपारचे जेवण आटोपून , आश्रमशाळेकडे निघण्याचा बेतात होतो. त्यामुळे मीच समोर येऊन चौकशी केल्यावर कळले की , आजी सोबत एक दायी बाई आहे आणि अडलेल्या बाळंतपणासाठी माझी मदत घेण्यासाठी मला शोधत तेथे आले होते. थोडी जुजबी चौकशी केल्यावर कळले की, बाळंतपण झाले आहे , पण नाळ पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. आता काय करता येईल ? , माझी विचारचक्री जोराने फिरायला लागली . एमआरपी म्हणजे मैन्युअल रिमूव्हल ऑफ प्लॅसेंटा लागले , तर आपण घरी कसे काय करणार ? असे अनेक विचार डोक्यात गोंधळ घालत होते. मी आपली असमर्थता व्यक्त करून पाहिली , पण त्या दायी बाईचे म्हणणे होते की , तुम्ही एकवेळा पाहून घ्या, मग ठरवा . आता मात्र मी मोठ्या धर्मसंकटात अडकलो होतो, डॉक्टर म्हणून न पाहता , असे सांगणे , चूक वाटत होते . माझ्या धडधडत्या छातीसह मी दवाखान्यातून इमरजेंसी विजिट बैग उचलली आणि त्या आजी आणि दायी सोबत चालायला लागलो.
समोर दायी , आजीबाई आणि मागे मी, गावातून पायी पायी चालत असता , गावकरी जे समजायचे होते, ते समजले .गावातील बेंबला नदीच्या काठी , डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यामागे अमोरासमोर घरांची एकच रांग होती ,त्यातील एका घरात आम्ही पोहचलो होतो. येता येता डॉ आंबेडकरांना नमस्कार करून मी प्रार्थनाही करून घेतली. एक निळ्या रंगाच्या पॉलिथिनवर , नुकताच जन्म घेतलेला गोंडस मुलगा आणि बाजूला नीचपत पडलेली त्याची आई . पॉलिथिनवरून वाहणारे रक्त दारापर्यंत आले होते.मी ब्लड प्रेशर पाहायचे ठरवले तर ते खूप खालावले होते. खूप रक्तस्राव होऊन अजून परिस्थिती बिघडली तर आपण कसे सांभाळणार, मी परत माझी असमर्थता सांगून पहिली. जे करता येईल ते तुम्हीच करा,कारण तेथून मोठ्या दवाखान्यात जाईपर्यंत , आई कशी जगेल ? , हा प्रश्न त्यांनीच मला विचारला. मला एव्हाना सगळे देव आठवले होते,आणि मी त्यांचाही कौल घेत होतो आणि मग मी एकदाचे ठरविले व कामाला लागलो.
पाहिले मी सलाईन लावले, मेथारजिन इंजेक्शन दिले, घरच्या लोकांना धीर दिला, हातात ग्लोव्हस घातले आणि हाताने एमआरपी करत प्लॅसेंटा सोबत नाळ काढून घेतली . मलाच समजत नव्हते की , माझ्यात इतका आत्मविश्वास कोठून आला, आणि हे सर्व मंतरल्यासारखे होत होते. एव्हाना आई च्या चेहऱ्यावर थोडे हसू आले होते ,आणि तीच माझी मला मिळालेली सर्वात मोठी फी होती. अजून दोन तीन सलाईन द्यायला सांगून , मी परत येतांना परत एकदा पुतळ्याकडे पाहून अभिवादन केले , कारण त्यांनीच आज माझी लाज राखली होती.
दुसरे दिवशी जेव्हा मी दवाखाना सुरू करण्यासाठी आलो , तेव्हा त्या घरची आजी दवाखान्याच्या पायरीवरून काहीतरी पुडीत घेतांना मला दिसली. मला वाटले , तिला तब्येतीबाबत बोलायचे असेल, पण तसे नव्हते. मी थोड प्रश्नार्थक नजरेने त्या पुडीत काय आहे ? , असे विचारले. तिने सांगितले की , तिने दवाखान्याच्या पायरीची धूळ पुडीत घेतली आहे , बाळाच्या आईच्या कपाळावर लावण्यासाठी. ती म्हणाली, काल तुमचे पाय आमचे घरी लागले म्हणून आज माझी नातसून आणि पणतू दोघेही सुखरूप आहेत .म्हणून मी ही धुळ अंगारा म्हणून नेत आहे . मला जन्मभर पुरेल , इतकी फी आजीकडून मला मिळाली होती , मी दिलेल्या इमरजेंसी सेवेची.
माझ्या प्रचारकी जीवनातील अनेक घटनांमधील ही एक घटना मला खूप काही शिकवून गेली , म्हणून मला ती नेहमी आठवते .