फार दिवसांनी रेल्वेने प्रवास करण्याचा योग आला. दिवसभराची कामे करून प्रवासाची तयारी करून आणि गावापासून २ बसेस बदलवून जवळच्या स्टेशन वर पोहचलो. उगाच उशीर झाला तर गडबड नको म्हणून चक्क २ तास आधी जाऊन बसलो. त्यात एक नेहमीचीच सुवार्ता(?) मिळाली – गाडी उशिरा असल्याची. मग काय – बघा वाट. रेंगाळत रेंगाळत जेवण करूनही फार वेळ वाया गेला नव्हताच. मग संयमाची परिक्षाच नाही तर थेट कडेलोट झाल्यानंतर राणीसरकार अवतरल्या आणि आम्ही विराजमान झालो. पुढच्या पाच मिनिटात पहुडलो सुद्धा – अहो म्हणजे झोपलो.
अगदी सडपातळ, शिडशिडीत राहण्यासाठी जसं काही लोक २ – २ तासांनी थोडं थोडं खात असतात तसंच आम्हीही स्वच्छतागृहाशेजारी बर्थ असल्यामुळे थोडं थोडं झोपत होतो. एकदाचं आमचं गंतव्यस्थान आलं आन् उतरलो. मग काय, तिथेच सर्व विधी उरकावे आन् पुढच्या कामाला निघावं असं घरून ठरवून निघालेलो – त्यातून आरक्षणाचे पैसेही पूर्ण वापरल्या जावेत नाही का! पण कसलं काय! प्रतीक्षा गृहाच्या स्वच्छता गृहात म्हणे कुणातरी सुशिक्षित संस्कारी घरातल्या बालकाने मध्येच प्रातर्विधी उरकला होता. मग आम्हाला आमचं उरकण्यासाठी २० रु. तासाप्रमाणे तुलनेने अधिक स्वच्छ असे म्हणून समाधान मानावे असे दुसरे प्रतिक्षागृह सापडले आन् वेळ निभावली. ते तेवढं महत्वाचं नाही का! आपण तरी कुठे मुक्कामाला गेलोय तिथे.
सर्व काम आटोपून, पाठ, खांदे, आन् हातांच्या भरवशावर असलेलं सामान घेऊन वॉकिंग डिस्टन्स म्हणता म्हणता काही किलोमीटर पायी फिरून झाल्यावर आन् अंगातील त्राण जाऊन अर्धमेल्या अवस्थेत पोहचल्यावर आम्ही शेवटी परत त्याच स्टेशन वर, या वेळी स्वच्छ प्रतीक्षागृहाच्या अपेक्षेत स्टेशन वर अवतरलो. काही वेळ बाहेर बेंचवर हवा खात बसू म्हटलं तर औषध प्राशन केलेले सज्जन येता जाता लोटांगण घेऊ लागले, काही तर पैसेही मागू लागले. मग नाईलाजाने प्रतिक्षागृहात डोकावून बघतो तर काय, ते प्रतिक्षागृह कमी आन् एका मोठ्या एकत्र कुटुंबांचं माजघर जास्त शोभत होतं. अगदी तपश्चर्या वगैरे वाटावी इतपत प्रतीक्षा केल्यावर शेवटी प्रतिक्षागृहात टेकायला जागा मिळाली – कचरकुंडीच्या शेजारी.
तितक्यात एक महिला सरळ आत आली आन् सवयीचं असल्यासारखी इकडे तिकडे डोकावू लागली आन् जणू काही तिच्या समोरच कुणी तरी त्या कचरा कुंडीत फेकले असावेत अशा सफाईने तिथे तेथून काही चुरगळलेले कागद बाहेर काढले – जसे आपण भेटवस्तूंना लपेटण्यासाठी वापरतो तसे – आपल्या मराठीत – गिफ्ट पेपर्स. तिने ते ३ बोळे मोकळे केले आन् तिथेच मांडी घालून स्थिरस्थावर होत एक एक कागद हलका जोर देऊन सरळ करण्यास सुरुवात केली. तिच्या हातांची हालचाल बघून एका क्षणासाठी वाटलं एखाद्या लहान लेकराच्या शरीरावरून हात फिरवत असावी. मग त्या कागदाच्या हट्टी वळ्या सरळ होण्याचे लक्षण दिसले नाही तर दुसऱ्या क्षणी वाटलं ती तिचं चुरगळलेलं नशीब तर सरळ करण्याचा प्रयत्न करत नसेल?
पुढच्या काही मिनिटात तिने होता होतील इतके ते कागद सरळ केले, त्यांची छान चौकोनी छोटी घडी घातली – एखाद्या सुविद्य, सुस्वरूप स्त्रीने समृद्ध घराची घडी बसवावी तशीच. मग तिने ते कागद तिच्या जवळच्या पिशवीत ठेवले आन् मुकट निघून गेली. त्या तेवढ्या गोंधळात मला ती एकमेव व्यक्ती वाटली जिचं सगळं ठरलंय, तिला कशाचीही वाट बघण्याची गरज नाही, जिच्यासाठी अनिश्चित असं काहीही नाही.
औषध प्राशन केलेल्या अथवा करण्यासाठी पैसे मागणारे सज्जन ही त्याच स्टेशन वर होते आन् ती महिलाही. तिला का नसेल वाटलं की आपणही दारू प्यावी? तिचं दुख: कमी होतं का? का तिच्या आयुष्याची कमी वाट लागली होती? घर होतं का तिला? आणि नसेल तर आजच्या समाजात असं उघड्यावर राहायचं कसं साधलं असेल तिला? मला दोन दिवसांपासून बघावी लागलेली वाट, आन् पावसामुळे, पावसात पायपीट केल्यामुळे माझी लागलेली वाट अनुभवून माझ्या कपाळावर पडलेल्या आठ्या तिच्या कागदाला पडलेल्या वळ्यांपेक्षा हट्टी का असाव्या?? आणि आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आधीच ठावूक असल्यासारखा तिचा चेहरा निर्विकार का असावा?
#सुरपाखरू #३०दिवसात३० #prayog२०२६