Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

देव बरं करुं

गौरीबाई गोवेकर जुलै 12, 2026 1 minute read
0
gumohor-water
साडीचा काठ हे महत्त्वाचं अंग आहे

काठ-पदर म्हणजे एखाद्या रागातले वादी-संवादी स्वरच म्हणा ना! अंगाच्या रंगाशी संगतवार असले पाहिजेत. काठाची रुंदी हा एक मुख्य घटक. आपल्या उंचीप्रमाणे काठाची रुंदी असावी. मला फार रुंद काठाच्या साड्या शोभत नाहीत. आईची उंची असल्याने मात्र ती अतिरुंद काठही वापरीत असे. तिच्यानंतर जेव्हा मी तिच्या रुंद काठाच्या नऊवार साड्या सहावर केल्या, तेव्हा त्यांच्या अतिरुंद काठांचं काहीच करता येईना. अशा काही साड्या काळजावर दगड ठेवून मी उंच व्यक्तींना दिल्या. काठाच्या नक्षीनुसार साडीचे प्रकारही पडायचे – नारळी, रुईफुली, करवत, कापशी, चौकडी (उत्तरेत चौसर म्हणतात), धारवाडी, टमटम असे काठांचे प्रकार असायचे. पदर – हा साडीचा प्राण. एखाद्या सुंदर स्त्रीचं नाक. सुंदर साडीचा पदर पाहायची इच्छा होतेच. साडीच्या प्रकारानुसार तिचा पदर असतो त्या त्या प्रकारच्या साडीचे पदर तसेच असायचे. पैठणी, बनारसी, माहेश्वरी, इंदुरी, चंदेरी, धारवाडी, इरकली, पाटोळा अशा साड्यांचे पदर ठरलेले असतात. फक्त रंगसंगती आणि लांबी तेवढी वेगवेगळी. पदरावरची नक्षीसुद्धा त्या त्या प्रकारानुसार ठरलेली. आजही हे असंच असतं. क्वचित एखादी संकरित बेढब साडी दिसतेही. म्हणजे साडी महेश्वरी तर पदर धारवाडी. साडी बनारसी आणि पदर इंदुरी. नक्षी – म्हणजे काठ पदरावर तसेच अंगावर असलेली कलाकुसर. मोठ्या अंगापिंडाच्या स्त्रीस बटबटीत नक्षी, तर नाजूक अंगाच्या स्त्रीस नाजूक नक्षी खुलून दिसते. नक्षीतही साडीनुसार वेगवेगळे प्रकार असायचे. पैठणी म्हटली की काठावर चौकडा आणि पदरावर बारू, मुनिया, फुलवारी हे असायचेच. अंगावरच्या नक्षीत कुयरी, फुली, चौसर, बुट्टा असायचेच. बनारसी असेल तर झडी, बुंदके, झुमका, जमुना, गंगा अशी नक्षी असायची. एकंदरीत नक्षी म्हणजे कलाकाराच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार. कल्पना जितकी श्रीमंत, तितकी नक्षी सुरेख असायची. नाहीतर मागे भारतात गेल्या वेळी माझ्या सुनेने हौस म्हणून काही साड्या खरेदी केल्या. त्याच्या पदरावर काय असावं? चक्क सुकलेल्या काटक्याकुटक्या, मडकी आणि बैलगाडीचं चाक! मी म्हणाले, “नशीब. बांबू वगैरे नाहीत. नाहीतर मर्तिकाची तयारी असां सगळी.” तर कळलं की बांबूही असतात पदरावर म्हणे! मी कपाळावर हात मारला. जितक्या प्रकृती तितक्या आवडीनिवडी. असो. गत – गत म्हणजे काय हे शब्दात सांगणं कठीण आहे. त्यासाठी ती साडी नेसायला हवी. नेसल्यावर तिच्या निर्‍यांचं एकमेकीशी होणारं घर्षण. वजनामुळे पदर रुळण्याची पद्धत म्हणजे गत. एकंदरीत साडीचं अंगावर रुळणं म्हणजे गत असं म्हणता येईल. काही साड्या नेसल्यावर अंगावर सहज रुळतात, तेव्हा त्यांची गत चांगली असते. काही चापून चोपून नेसाव्या लागतात, नेसायला कष्ट पडतात. पदर साडीवर घासताना जाणवतो, तेव्हा त्याची गत चांगली नाही असं समजायचं. आता आमच्याकडे असलेल्या काही विशेष साड्यांचा उल्लेख करून हे साडीपुराण (मानलं तर विषयांतर) आवरते. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच आम्ही खाजगी मैफलीसुद्धा केल्या. देशभरातील संस्थानिक, उद्योगपती, कलाकार, पत्रकार, सिनेक्षेत्राशी संबंधित, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, मंत्री असे लोक काहीबाही निमित्ताने आपल्या घरी, बंगल्यावर किंवा एखादं सभागृह घेऊन वा आपल्या मालकीच्या उद्यान गृहात गाणं करीत असत. घरची मंडळी, निवडक इष्टमित्र आपापल्या कुटुंबासमवेत, निमंत्रित असे लोक गाणं ऐकायला असत. ठरलेली बिदागी ते देत. शिवाय वस्त्र-पात्र-आभूषण असं काही देऊन सन्मान करीत. गाणं ऐकण्यासाठी फक्त पुरुषमंडळी आणि स्त्रिया नाहीत असे कार्यक्रम आम्ही घेत नसू. मैफलींबद्दल लिहायचं तर एक पुस्तक लिहून होईल सहज. तर ते एक असो. बडोद्याच्या सरकार वाड्यावर झालेल्या मैफलीनंतर सरकारांनी आईला चांदीचं तबक, त्यात बिदागी, सोन्याच्या जरीचा शालू, सुकामेवा असं दिलं. किरमिजी रंगाचा, रुंद काठ असलेला तो शालू म्हणजे उंची साडीचा एक नमुना आहे. त्यांचे कारभारी सरदेसाई म्हणून होते, त्यांच्याही घरी मैफल झाली म्हणे. त्यांनी आईला दिलेली जरीची रेशमी पैठणी. या शिवाय तिने स्वत: खरेदी केलेल्या अनेक रेशमी अस्सल जरीच्या दख्खनी कांचीपुरी साड्या आमच्याकडे होत्या, काही आहेत. आता मला मिळालेल्या काही साड्यांचा उल्लेख करते. रामपूरच्या सरकारांनी मला दिलेली बनारसी साडी, पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतींनी दिलेली अस्सल इरकली साडी, देवासच्या राजेसाहेबांनी दिलेली रेशमी महेश्वरी साडी, मुंबईत दोन पारशी कुटुंबे होती त्यांच्याकडे दरसाल गाणं होत असे, त्यांनी दिलेल्या दोन ‘गारा’ साड्या. (जांभळ्या रंगाच्या, अस्सल सोन्या-चांदीच्या जरीत नाजूक नक्षी भरलेल्या असतात. ही त्यांची खासियत.) गयेच्या एका जमीनदार कुटुंबाने भेट दिलेल्या एक पिवळी आणि दुसरी गुलाबी अशा दोन अस्सल बनारसी साड्या) मुंबईत काही मारवाडी घराण्यातही माझं दरसाल गाणं होत असे. त्यांनीही दिलेल्या अशाच रेशमी दख्खनी आठ-दहा साड्या. याशिवाय मी खरेदी केलेल्या असंख्य निरनिराळ्या प्रकारच्या साड्या. यावरून मला साड्यांचं वेड आहे हे वाचकांच्या लक्षात आलं असेलच. अर्थात आता वयामुळे मी साड्या नेसत नाही. आईने जसं गाणं बंद केलं, तसं ती साध्या सुती साड्या नेसू लागली

जसं साड्यांबद्दल तसंच, दागिन्यांबाबत थोडक्यात सांगते. मला जितका साड्यांचा शौक, तितका दागिन्यांचा नाही. आईला संस्थानिक किंवा तत्सम घराण्यांतून मिळालेल्या काही दागिन्यात वज्रटीक, लक्ष्मीहार, तोडे, मोत्याची कंठी, सोन्याच्या कंठ्या (कमीत कमी आठ-दहा तरी) हिऱ्य़ाच्या कुड्या, हिऱ्याच्या अंगठ्या, मोरण्या, केसातली फुले, कंबरपट्टा असे बरेच दागिने आहेत. आम्ही हे कधीच मोडले नाहीत. आईची आठवण म्हणून मी व आक्काने ते आलटून पालटून वापरले. कंबरपट्टयाचा तेवढा अपवाद. तो आई असतानाच मोडला. आता एक गंमत सांगते. हे सर्व दागिने घरात ठेवायचे तर जोखीमच होती. त्या वेळी बँकेत लॉकर वगैरे नव्हते. आई मैफलीनिमित्त सारखी बाहेर, मग कसं करायचं? अशा वेळी सर्व दागिने जीबाईच्या अंगावर असायचे. सदासर्वकाळ ती ते घरातसुद्धा अंगावर घालून असायची. आई आली की तिच्या स्वाधीन करायची. लखलखीत सोन्याने नखशिखांत मढलेली धिप्पाड अंगाची जीबाई अजूनही डोळ्यासमोर आहे. (जीबाई म्हणजे आमच्याकडे फार पूर्वीपासून असलेल्या गोवेकर बाई.) याशिवाय आईने मला व आक्काला समसमान दागिने घडवले. त्यापैकी मोजके मी मैफलीत वापरत असे. आक्का तर गात नव्हती. त्यात सर्वसाधारण घरात असतात तसेच आहेत – पाटल्या, बांगड्या, तोडे, गोठ, लक्ष्मीहार, पोहेहार, आठ पदरी साखळ्यांचा हार, हिऱ्याच्या व पाचूच्या कुड्या इत्यादी. आणि हो… मी हट्टाने आईकडे मागितलेल्या रिंगा. कारण त्या वेळी रिंगांची फॅशन होती. त्या अशाच घरात वापरायला. मैफलीच्या व्यवहारात मी कुणाकडूनच दागिने स्वीकारत नसे. साडी इतपत ठीक आहे. ठरलेली बिदागी मात्र घेत असे. लिहायला खूपच आहे. येथे लिहीत असलेल्या लेखांच्या मालिकेत ते हळुहळू येईलच. तूर्त लेखनसीमा. तुम्हा सर्वांना माझी हीच विनंती की खूप कष्ट करा, भरपूर कमवा, उत्तम धनसंचय करा, योग्य ठिकाणी खर्चही करा. वेळ आणि संधी पुन्हा पुन्हा येत नसते. अजाणतेपणी एक पैही वाया जाऊ देऊ नका. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा. देंव बरें करूं..


श्रेयनिर्देश : प्रकाशचित्रे चारुदत्त गोवेकर ह्यांजकडून.

लेखक

  • गौरीबाई गोवेकर
    गौरीबाई गोवेकर

Post navigation

Previous: देव बरें करुं……३
Next: लक्ष्मणराव आणि कुटुंब – ११ ‘लक्ष्मणरावांचे नियोजन’
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.