हिमाचल प्रदेशच्या कुलू मनाली पासून मणिकरन रस्त्यावर भुंतर नंतर अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर कासोल नावाचे छोटेसे गाव आहे. तेथून ३५ किलोमीटरची हिमालयीन भटकंती केल्यानंतर १३,८०० फूट उंचीवर “सार पास “ नावाचे स्वर्ग सुंदर ठिकाण आहे , ह्यालाच भारताचे स्विझरलँड सुद्धा म्हणतात .अखंड खळखळणाऱ्या ग्रहान नाल्याच्या बाजूने देवदार, पाईन आणि सालइच्या घनदाट जंगलातून , नियतीच्या निर्मात्याने मुद्दाम लावून ठेवल्यासारख्या भासाव्या , अश्या रोडोडेंड्रॉन च्या बागा आणि त्यात फुललेले जंगली गुलाबाचे असंख्य ताटवे तुम्हाला भान हरवायला लावतात.येथूनच सार पास चा ट्रेक सुरु होतो.
सार पास साठी कासोल हा बेस कॅम्प असतो. आम्ही येथे वाय एम सी ए च्या ट्रेक साठी असलेल्या बेस कॅम्प मध्ये थांबलो होतो. “ सुर्यका अस्त और कासोल मस्त “ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या गावात इस्रायली बंधूंचा संध्याकाळनंतर तेथील कैफ़े,क्लब आणि हॉटेल मधे नुसता जल्लोष सुरू असतो. त्या ठिकाणी पाहता , आपण इसेराएलच्या एखाद्या जुन्या शहरात असावे , असेच वाटते . पार्वती नदीच्या ह्या पवित्र खोऱ्यात अमली पदार्थांचा हा गोंधळ पाहता मन उदास होते, पण आज ही वास्तविकता आहे. येथून ४ किलोमीटरवर मणीकरण येथे औषधी गुणासाठी प्रसिद्ध असलेले गरम पाण्याचे झरे आहेत.भगवान शंकराने पार्वतीच्या कर्णशृंगारातील हरवलेला मणी शेष नागाद्वारे येथूनच पाताळलोकात जाऊन शोधून आणला होता,अशी अख्यायीका आहे . येथे १९४० पर्यंत पार्वती नदीच्या ह्या प्रवाहात मणी सापडत होते, असेही सांगितले जाते. गावातील काही वृद्ध मंडळी आपल्या गळात ते मणी घालून आजही मिरवत असतात . मणिकरण येथे पार्वती नदीचा हा प्रवाह येथून कुलू मार्गे बियास नदीला जाऊन मिळतो. पार्वती नदीच्या दोन्ही काठांवर देवदार आणि पाईन चे खूप घनदाट जंगल आहे , आणि ह्या जंगलात हिमालयीन मोनाल, खालिज, पिन सेंट, हिमालयीन बुलबुल, स्कार लेट मिनीवेट, बी ईटर, वाटर रेडसार्ट सारखे असंख्य पक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक आणि पक्षीमित्र ह्या जंगलात फिरतांना दिसतात. पार्वती नदीचा तो खळखळणारा आवाज आणि त्यात ह्या पक्ष्यांचा गुंजारव आपल्याला ब्रह्मानंदाचा आभास देतात.
येथून ५ किलोमीटर वाहनाने गेले की , गुरुद्वारा मणीकरण साहेब आहे. हिंदू आणि शीख धर्मातील लोकांसाठी हे १७६० मीटर उंचीवर असलेले एक पवित्र श्रद्धास्थान आहे.अखंडपणे १०४ डिग्री फेरानाइट तापमानावर उकळत असलेले सल्फर युक्त पाणी येथे पार्वती नदीच्या प्रवाहात एकसारखे मिसळत असते. पार्वतीच्या वरच्या बाजूला ह्या सल्फर स्प्रिंगच्या पाण्यात पोहता येईल,इतके मोठे पाण्याचे टाके आहे .गुरु नानक देवजी जेव्हा १६ व्या शतकात येथे आले होते,तेव्हा लंगर साठी आगीची सोय नसल्याचे शिष्यांनी सांगितले ,आणि गुरूंनी येथे एक दगड उचलला आणि त्याखालून वाफ आणि गरम पाणी यायला लागले,त्यावर मग लंगरसाठी अन्न शिजवणे सुरु झाले . ते लंगर आजगायत सुरू आहे आणि आजही येथे त्या गरम वाफेवर पूर्ण स्वैपाक तयार केला जातो, आम्ही सुद्धा येथे प्रसाद घेतला . गुरिद्वारा सोबतच जवळपास येथे विष्णु, शंकर आणि श्रीरामाचे सुद्धा मंदिरे आहेत.
सार पास ला जातांना कासोल मणिकरण भागात २-३ दिवस रहावे, येथून जवळ असलेल्या ठिकाणी एक दिवसाचे ट्रेक करावे, येथील विशाल शिलांवर रॉक क्लाइबिंगचे धडे घ्यावेत आणि येथील निसर्गाशी समरस व्हावे , असा नियम आहे. ह्याला ट्रेकिंगच्या भाषेत एक्लिमीटयझेशन म्हणतात, ते न केले तर, पुढील सार पास च्या प्रवासात हवे तसे स्वास्थ्य टिकवता येत नाही आणि पर्वतारोहणाचा खूप त्रास होतो .खूप वेळ गरम पाण्यात पोहले तर , सल्फर पाण्याच्या वासाने चक्कर येते , हे सुद्धा लक्षात असू द्यावे.
येथून ग्रहान ,पदरी,रातापाणी ,नागारु करीत सार पास ला जावे लागते आणि बीस केरी, बंदक थाच मार्गे मणीकरणहून कासोल ला परत येता येते, ह्या प्रवासाचे वर्णन पुढे कधी तरी करूया.