Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

पारू काकू

गौरीबाई गोवेकर जुलै 15, 2026 1 minute read
0
gumohor-water

मुलांचा क्रिकेटचा खेळ रंगात आलेला.  शाळेतल्या वयाची मुले वाड्या मागच्या मोकळ्या जागेत खेळत होती. आणि आम्ही मुली, त्यांचा खेळ पहात लांब उभ्या होतो. कार्लेकरने चेंडू फटकावला तो वाड्याच्या मागच्या अंगणात टप्पा खाऊन कुठेतरी 

दिसेनासा झाला.  चेंडू शोधत शोधत मुले वाड्याच्या मागच्या भागात आली. आम्हीही त्यांच्या मागे. चेंडू बाहेर पडलेला नव्हता. कदाचित पडवीत गेला असेल मुलांना वाटले. पडवी बंद होती पुढच्या बाजूला गज लावलेले होते.

आत अंधार होता. मिचमिच्या डोळयांनी मुले आत चेंडू दिसतो का ते पाहू लागली. आम्ही मुली सुद्धा बेताबेताने टाचा उंचावून त्या गज लावलेल्या खिडक्यांच्या आत पाहू लागलो

काय असेल रे इथे? ए कोण रहातं आणि ती चूल कोण पेटवत असेल. मुलांची हलक्या आवाजातली चर्चा. 

अरे हे तर विनायक भोळेचं घर. कांतूने माहिती पुरवली. भोळ्यांचा विनायक या मुलांच्याच वयाचा. पण तो फारसा कधी मिसळत नसे मुलांच्यात. त्यांच्या गड्याबरोबर नेहमी शेतावर जाइ खेळायला. विनायक आत दिसतो का हे मुले पाहू लागली. 

विनाsssssयक सुहासनं हाक मारली. आत आवाज घुमला. मुलांना गंमत वाटली मग प्रत्येकजण वेगवेगळ्या आवाजात हाक मारू लागला.  विनाsssssयक, विनाsssssयक, विनाsssssयक आम्हीही मुलांची री ओढू लागलो.‌

पडवीच्या गजांना चिकटून आम्ही आत विनायक दिसतो का ते पहात होतो. तेवढ्यात आतल्या बाजूला अंधारात  काहीतरी हालचाल झाली गजांखाली असलेल्या भिंतीच्या सांद्रीतून एक गोलाकार डोक वर आलं. या अनपेक्षित हालचालीनं मुलं घाबरली. हातात धरलेले पडवीचे गज सोडून मुलांनी खाली उड्या मारल्या

भूतss भूतss मुले ओरडू लागली. आम्ही मुलीही किंचाळत खिडकीच्या गजांपासून दूर झालो. भूत भूत भूत

आपण काय पाहिलं ते मुलांना नीट समजलं नाही. प्रत्येकजण आपल्याला काय दिसलं ते दुसऱ्याला सांगू लागला. लांबूनच ऊंच उडी मारून पडवीच्या दिशेने आम्ही पहात असताना पडवीच्या आतील बाजूने एक मानवी  आकृती उभी राहिली. आपल्या दोन्ही हातांनी गज धरून ती आम्हा मुला मुलींच्या कडे पाहून बोलावू लागली. ती एक स्त्री होती. लाल तांबड्या पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला.  तोच पुन्हा अंगभर लपेटलेला.

“काय रे बाळांनो?? “ घोगऱ्या आवाजात ती व्यक्ती म्हणत होती.

पातळातून दोन गोरे सुरकुतलेले दंड, चोळी विना. हातात बांगड्या नाहीत की कानातले. पदर डोक्यावरून घट्ट ओढून घेउन दोन्ही  कानामागे खोचलेला. चेहेऱ्यावर मात्र हास्य. निरागस. एखाद्या बालीकेसारखं. पुढचे दात पडलेले. 

अशी व्यक्ती आम्ही मुलांनी कधीच पाहिली नव्हती. ती स्त्री आम्हा मुलांना खुणेने बोलावत होती.

“ या रे बाळांनो. काय शोधताय तुम्ही? असे घाबरू नका या! या!”.

मी आजी आहे तुमची, पार्वती आजी.

ईतर आज्यांपेक्षा ही काही वेगळीच दिसत होती.

आम्ही एकमेकांकडे बघुन खुसुखुसू हसू लागलो.

आजी आमचा चेंडू आलाय का इथं? सुहासनं धीर करून पार्वती आजीला विचारलं.

“या इथं पडलाय का पहा”. आजी म्हणाली. मुलांचा धीर चेपला. आजीनं दाखविलेल्या ठिकाणी चेंडू पडलेला होता.

काही दिवसापूर्वी  दूरदर्शन वरच्या मराठी मालिकेत  अशा विकेशा स्त्री ची व्यक्तिरेखा पाहिली आणि पार्वतीकाकू माझ्या डोळ्यासमोरून  तरळून गेली.  आजच्या काळात अशा स्त्रिया समाजात अभावानेच सापडतील पण माझ्या पिढीतल्या कित्येकांना अशा स्त्रियांचं नकळत्या वयात ओझरतं का होईना, दर्शन झालेलं आहे. म्हणूनच आमच्या स्मृती पटलावर अशा स्त्रियांचं वास्तव्य अजूनही आहे.

पार्वतीकाकू एक विधवा, विकेशा स्त्री होती. भोळ्यांच्या घरात सून म्हणून आली तेंव्हा ती दहा वर्षांची होती. कळण्याचं वय नव्हतं. ज्या पुरुषाशी लग्न झालेलं तो हिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा. काहीतरी झालं आणि पुढे अवघ्या अडीच तीन वर्षात तो गेला. घराण्याची प्रतिष्ठा, सुरक्षितता इत्यादी कारणं पुढे करत तिला विकेशा केलं गेलं आणि तेव्हापासून ही अंधारी पडवी तिच्या नशिबी आली. पार्वतीला माहेरचा आधार नव्हता. गरीबाघरची मुलगी म्हणून पत्करलेली. 

एकच भाऊ. तो ही परिस्थितीने गांजून गेलेला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तिथे हिची जबाबदारी कोण घेणार?  तिचं जणू अस्तित्वच पुसलं गेलेलं. ती तिथं आहे हे जणू सगळेजण विसरलेच होते. ती अंधारी पडवी हेच तिचं विश्व. मुळातच वाड्याच्या त्या भागात कोणी येत-जात नसे. पडवीतून वाड्यात जाण्या येण्यासाठी जी दोन दारं होती ती सदा बंद. जेंव्हा वाड्यावर कधी  कुळधर्म ,कुळाचार्, श्राद्ध असे तेंव्हाच एखादं दार किललिलत उघडे. तिच्यासाठी जेवणाच ताट ठेउन बंद होई. एरवी तीच आपला  भात रांधून घेई एका वेळेपुरता.

हे आयुष्य वाट्याला आलं तेंव्हा त्यातली गंभीरता कळण्याचंही तिचं वय नव्हतं. त्याला विरोध तरी ती काय करणार? पुढे वयात आली 'अशा' जगण्याचे चटके जाणवायला लागले. वाड्यावर काम करणाऱ्या मोलकरणी आपली कामं झाली की कधी मधी डोकावत. त्याच तिच्या मैत्रिणी.  वाड्यावर काय चाललयं ते हळू आवाजात तिला सांगत. कधी आजारपणात् औषधं आणून देत. अंग रगडून देत त्यांचा तिला आधार वाटे. ती मात्र कधीच बाहेर पडत नसे. या मोलकरणींकडूनच तिची हकिकत गावाला कळायची ती अशी हस्ते परहस्ते. अगदीच कुणीतरी याच बायकांबरोबर पार्वतीकाकू साठी एखादा जिन्नस कोणाच्या नकळत पाठवत. त्या तो पदराआडून तिला नेऊन देत.

चेंडूच्या निमित्तानं आमच्या भावविश्वात अचानक पार्वतीकाकू आली आणि ठाण मांडून राहिली. मुलं खेळताखेळता पडवीच्या दिशेनं जात असत. कधी मुद्दाम चेंडू त्या दिशेने मारायची. गजातून आत वाकून पार्वतीकाकू काय करते ते बघायची. काकूही आमची वाट बघते असं वाटायचं , आम्हा मुलींना आत बोलवायची. छोट्या मातीच्या मडक्यातून दही पोहे कालवून  द्यायची. आम्ही ते खायचो. तिच्याशी गप्पा मारायचो. पार्वतीकाकू बद्द्ल लोक फारसं बोलत नाहीत हे आम्हाला कळलं होतं. आम्ही मुली आपापसात तिच्याबद्दल बोलत असू पण तो विषय आपापल्या घरी कधी काढत नसू. तिच्या आणि आमच्या स्नेहात घरच्या कुणा वडील मंडळींचा अडसर येईल याची जाणीव आम्हाला त्या वेळीही होती. काही असलं तरी हा स्नेह आम्हा मुलींना तरी आवडायचा.

पुढे काळानुरूप माझं विश्व बदलत गेलं. जाणिवा जसजशा विकसित होत गेल्या तसं पार्वतीकाकूच आयुष्य मला स्पष्ट होत गेलं. शिक्षणासाठी गोवा सोडला. कॉलेजात गेल्यावर आमच्या कक्षा आणखी रुंदावल्या. पण काकूंच्या पडवीत निरागसपणे जाण्याचं आमचं स्वातंत्र्य आमच्या वाढलेल्या वयानं आमच्यापासून हिरावून घेतलेलं होतं. पुढच्या काळात अनेकानेक नात्यात मी गुरफटत गेले. साहचर्याच्या बंधनात बांधल्या गेल्यानंतर पार्वतीकाकूच्या घुसमटीचे अनेकानेक कंगोरे कल्पनेने सापडत गेले. समजत गेले. मी तिला शेवटचं पाहिलं ते शहरासाठी गोवा सोडताना. अगदी निघताना मला तिची आठवण झाली. आणि सगळ्या रिती, संकेत क्षणभर बाजूला ठेऊन मी त्या  पडवीत डोकावले.  अगदी थकलेली, क्षीण झालेली पार्वतीकाकू एका तरटावर पडली होती. मला पहाताच उठून बसली. मी नमस्कार केला.  बाय गो.. काजार झाले मगे तुझे? तिने मला विचारलं. तेच निरागस हसू अजूनही तसच होतं पण दात मात्र एकही नव्हता.

 त्या काळच्या समाजव्यवस्थेतील एक उणीव या पलीकडे पार्वतीकाकूचं स्पष्टीकरण माझ्याकडे आजही नाही. त्या गोष्टीलाही आता बरीच वर्षे लोटली. पुढे काकू गेल्याचेही समजले.  काकूच्या हसण्यातल्या त्या निरागसपणाचं गुपित अजूनही  मला कळलेलं नाही. कदाचित तिच्या विश्वाच्या मर्यादितपणामुळं ते हसू तसचं टिकून राहिलं होतं. पण अजूनही दही पोहे समोर आले की ठसका लागतो आणि डोळ्याच्या कडा ओलावतात.

गौरीबाई गोवेकर

लेखक

  • गौरीबाई गोवेकर
    गौरीबाई गोवेकर

Post navigation

Previous: नागपूरचा इतिहास – १५
Next: कॉम्प्युटर बंद पडला आणि …
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.