स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह निमित्याने आणि विवेकानंद केंद्र, नागपूर शाखेच्या एका कार्यप्रसंगी २०१२ – १३ च्या सुमारास श्री. अनंत ताम्हणे काका यांची ओळख झाली. ते एम. एस. इ. बी. चे एक प्रामाणिक अभियंता म्हणून निवृत्त झालेले होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात अनेकदा ऊर्जा, अक्षय ऊर्जा हे विषय नेहमी असायचे. आपल्या प्रतिभेचा, शिक्षणाचा योग्य उपयोग कसा करता येईल याचा विचार त्यांनी नेहमी केला. त्या अनुषंगाने ते नेहमी या विषयावर वर्तमानपत्रांमध्ये लिहत. तसेच कुणाला विद्युत ऊर्जा या विषयावर जाणून घ्यायचे असेल तर ते नेहमी मार्गदर्शन करायला तयार असत. नागपूरमधील काही आस्थापनांना त्यांनी बायोगॅस, सोलर याविषयी मार्गदर्शन केले होते.
उतरत्या वयात सुद्धा रामकृष्ण मठाच्या इमारतीवर चढून कार्य करून त्यांनी मन हे तरुण असते आणि मनाची जिद्द ही शरीरासमोर कधीही श्रेष्ठ हे त्यांनी तेव्हा सिद्ध केले. मठाचे कार्य करण्याबरोबरच त्यांनी विवेकानंद केंद्र, नागपूर शाखेचे सुद्धा समर्पितपणे कार्य केले. ते करतांना त्यांनी कधी आपण एक निवृत्त सरकारी व्यक्ती आहोत हे भासविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी युवा कार्यकर्त्यांसोबत चांगली मैत्री केलेली होती. युवकांसोबत साहित्य सेवेच्या स्टॉल वर उभे राहणे, केंद्राच्या मासिकांसाठी सभासद नोंदणी करणे हे त्यांनी अगदी हसत हसत केले. आम्ही कार्यकर्ते जेव्हाही त्यांच्यासोबत कार्यानिमित्य बोलत असू तेव्हा अगदी हसत हसत बोलून ते संवाद साधायचे.
एक शबनम बॅग, कडक इस्त्री केलेला शर्ट व पँट आणि शर्टिंग केलेली बटूमूर्ती जर दुरून दिसली तर समजायचे की हे ताम्हणे काका आहेत.
एकदा असेच ताम्हणे काकांशी बोलतांना आपण केंद्राच्या इमारतीमधे रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला हवे. जर शास्त्रीय पद्धतीने शक्य नसेल तर इतरही मार्ग आहेत असे मी त्यांना बोलून दाखवले. पुढे ते काही तांत्रिक कारणास्तव रखडले. पण अशा काही कल्पना काकांसमोर मांडल्या तर नेहमी त्यावर ते सकारात्मक चर्चा करत.
पुढे जेव्हा ते प्रताप नगर ला राहायला आले तेव्हा सुद्धा त्यांच्याशी भेट व्हायची. एक दिवस सहजपणे बोलता बोलता त्यांना हार्ट ची समस्या आहे व याबाबतीत डॉ. देशपांडे यांच्याकडून उपचार घेत आहे असे कळले. सध्या जरी ते मठ आणि केंद्राच्या कार्यात नव्हते तरी ते नियमित लिखाण करायचे. कधी तरुण भारत ला त्यांची पत्रे तर कधी कुण्या इतर वर्तमानपत्रात त्यांचा लेख यायचा.
काकांना जो कुणी कार्यकर्ता जिथे कुठेही भेटेल त्याची, त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची विचारणा करायचे. त्यांचा प्रेमळ स्वभाव, कर्तव्यनिष्ठा, सर्वांबद्दल वाटणारी आपुलकी हे सर्व विचारधन सोडून ते गेलेत, ही बातमी कळली तेव्हा विश्वास ठेवावा की नाही असे झाले. पण विश्वास ठेवणे भाग होते. कारण कधीही प्रताप नगर, शंकर नगरला भेटणारे काका आता कधीच भेटून गप्पा मारणार नव्हते.