आता वळूया उदयपूरकडे. उदयपूर म्हणजे मेवाड प्रांत. तिथे काही काळ होळकरांची सत्ता होती. पण उदयपूरच्या राणीने खूप शर्थ केली आणि होळकरांचा अमल उठवला. तिने आपली स्वतःची ठाणी स्थापन केली. पण अहिल्याबाई होळकर – त्या कमी नव्हत्या – त्यांनी आपली फौज पाठवून ती ठाणी पुन्हा बळकावली. मग दोघींमध्ये तह झाला. ठरलं की होळकर दोन हजार घोडेस्वार राणीला देतील आणि त्या घोडेस्वारांच्या साहाय्याने राणी आपल्या शत्रूंचा नाश करील. पण लालसोटच्या लढाईत बिजेसिंगने राणीला इशारा दिला आणि मराठी ठाणी उठवली. मराठी फौजा परत गेल्या. तुकोजी होळकर मथुरेहून उदयपूरकडे वळले. बरं, ही सगळी पार्श्वभूमी होती. मुख्य गोष्ट तर चित्तोडगडाची आहे.
आता मराठी इतिहासातील सर्वात अफलातून विजयाची गोष्ट ऐका. चित्तोडगड हा किल्ला! राजपुतांचा अभिमान! ते म्हणतात, “गढ में गढ चित्तोडगढ, बाकी सब गढियाँ!” अर्थात सर्व किल्ल्यांमध्ये चित्तोडगढ हा श्रेष्ठ, बाकीचे सगळे किल्ले छोटे. या किल्ल्यावर भीमसिंह नावाचा राजपूत सरदार होता. तो राणाजीच्या अधिकाराला न मानणारा, आपल्या मर्जीचा राजा होता. महादजी शिंदे त्याला समजावायला गेले, पण भीमसिंहाने तर सरळ उत्तर दिले, “आमच्याकडे दारूगोळा आहे, प्रांताचा पैका तुम्ही घेतला, आता मेहरबानी ठेवून परत जा. आम्हाला काही द्यायचं नाही.” मुलांनो, हे ऐकून महादजी शिंदे काय करतील? ते हसले! त्यांनी ठरवलं – आता बघतो तुझा किल्ला किती मजबूत!
ऑक्टोबर १७९१ मध्ये मराठी फौजेने चित्तोडगडाला वेढा घातला. तोफा डगमगल्या, गोळ्यांचा वर्षाव झाला. भीमसिंहाने तोफा चालवल्या, पण मराठी फौज ही शेरांची फौज होती, ती थोड्याशा गोळ्यांनी मागे हटणार नव्हती. महादजींनी आपले तीन शूर सरदार – जालिमसिंग, अंबूजी इंगळे आणि लालाजी बल्लाळ – यांना उदयपूरच्या राणीला भेटायला पाठवले. ५ सप्टेंबरला राणी महादजींना भेटायला आली आणि तिने मराठ्यांना पाठींबा दिला. आता चित्तोडगड एकटाच होता, त्याला कोणी मदत नव्हती. महादजींनी वेढा आणखीनच घट्ट केला. तोफांचा कडकडाट, गोळ्यांचा धुमाकूळ, सैनिकांच्या गर्जना – अकरा दिवस सुरू होता हा धुमाकूळ. भीमसिंहाची हातचलाखी झाली. त्याने वाटाघाटी सुरू केल्या.
संकलन:- झंझावात, निनाद बेडेकर