पृष्ठसंख्या ७५०+ असते..
त्याशिवाय – छायाचित्रांची ४०+ पाने असतात…
त्याशिवाय – संदर्भग्रंथांची यादी (bibliography) ३५+ पानांची असते…
…आणि, निव्वळ तळटीपांसाठी ११० पाने खर्ची पडतात..
तेव्हा ते पुस्तक किती सखोल अभ्यास करून लिहिलेले असेल ते सहजरीत्या समजून येते .
आणि, असे एक अवजड पुस्तक वाचून हातासरशी केल्यावर लगेचच तुम्ही त्याच लेखकाचे ८५० पानांचे आणखी एक महाकाय पुस्तक लगोलग मागवता, तेव्हा तो लेखक खऱ्या अर्थाने जिंकलेला असतो!
अणुबॉम्ब बनवणाऱ्या मॅनहॅटन प्रकल्पावर अनेक पुस्तकें लिहिली गेली आहेत, परंतु हे दोन ग्रंथ म्हणजे या विषयाचा 'सर्वात अधिकृत इतिहास' मानले जाते. आणि तो सन्मान यथायोग्यच आहे, कारण यात वैज्ञानिक शोध, राजकीय डावपेच, तांत्रिक व अभियांत्रिकी आव्हाने, या प्रकल्पाशी संबंधित राजकीय नेते, शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी यांचे विचार व कृती या सगळ्या-सगळ्यांचा सविस्तर समावेश आहे.
“द मेकिंग ऑफ ॲटॉमिक बॉम्ब” या पुस्तकात विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे अक्षरशः बेचिराख करणाऱ्या अणुबॉम्बच्या निर्मितीपर्यंतचा, असा भला मोठा कालखंड व्यापला आहे. आइन्स्टाइन, फर्मी, ओपनहायमर आणि इतर अनेक महान भौतिकशास्त्रज्ञांबद्दल, त्यांनी गुंतागुंतीच्या समस्या कशा सोडवल्या याबद्दल वाचताना आपण प्रभावित होतो… पण लगोलाग त्याच अणुबॉम्बमुळे बळी पडलेल्या नागरिकांच्या अतोनात हालअपेष्टांबद्दल वाचून अंगावर शहारे येतात.
या पुस्तकाने 'पुलित्झर' पुरस्कारासह अनेक साहित्यिक पुरस्कार जिंकले आहेत, यात काहीच नवल नाही.
दुसरे पुस्तक “डार्क सन” आपल्याला त्याहीपुढे, थर्मोन्यूक्लियर युगाच्या – म्हणजेच हायड्रोजन बॉम्बच्या – उदयाकडे घेऊन जाते. यातील प्रमुख पात्रें आहेत क्लॉस फुक्स आणि रोझेनबर्ग्ससारखे हेर, उलाम आणि कुर्चातोव्हसारखे प्रखर बुद्धिमान भौतिकशास्त्रज्ञ, आणि लीमे व बेरिया यांसारखे कुटील, पाताळयंत्री लष्करी नेते . हे पुस्तक म्हणजे एका थरारपटासाठी अगदी योग्य अशी पटकथा आहे; यात हेरगिरी, राष्ट्रप्रेम आणि विश्वासघात, अलौकिक बुद्धिमत्ता आणि अन्वनित छळ असे सगळे काही आहे.
आणि, याहून वाईट काय घडणार असे आपल्याला वाटत असतानाच, संशयखोर नोकरशहा आणि मत्सरग्रस्त सहकाऱ्यांकडून रॉबर्ट ओपनहायमरसारख्या संवेदनशील शास्त्रज्ञावर लादल्या गेलेल्या हेरगिरीच्या खटल्यात या शोकांतिकेचा शेवट होतो.
एका खऱ्या इतिहासकाराप्रमाणे, लेखक कोणतीही बाजू न घेता किंवा कोणावरही दोषारोप न करता घटनांचे तटस्थपणे वर्णन करत जातात. अणुबॉम्बची, आणि त्याहून महाविनाशकारी हायड्रोजन बॉम्बची, भयावह छाया प्रत्येक पानावर गडदपणे पसरलेली आपल्याला जाणवत राहते… आपण अंतर्मुख होत जातो.