एग्जिट (Exit) म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग, चित्रपट गृहात लाल रंगात प्रकाशमान असलेली ही पाटी आपल्याला ओळखीची असते . आपण सर्व चित्रपट बघायला जातो, बघता बघता त्या चित्रपटाचा एक भाग बनतो आणि तो संपला की , ह्या पाटीच्या दिशेने चालायला लागतो.आपल्या जीवनाचेही असेच असते, आपण ह्या विश्वरुपी रंगमहालात येतो, ह्याचा एक भाग बनतो आणि आपला हा चित्रपट संपला की , रंगमहाल तसाच सोडुन बाहेर चालायला लागतो. चित्रपटाचा एक विशिष्ट ठरलेला कालावधी असतो आणि तेवढा झाल्यानंतर जायचेच असते,पण कधी कधी कोणी , हा रंगमहाल अकाली सोडून जातो,आणि त्याचे ते जाणे, आपल्या मनाला सदोदित खुपत राहते. असेच काहीसे माझ्या काही मित्रांचे झाले आणि ते मनाला चटका देऊन गेले आहे.
माझा एक बालमित्र असाच, मला १० वर्षापूर्वी सोडून गेला.तो खूप खेळकर होता आणि जीवनात नेहमीच आनंदी असायचा. तो वाणिज्य शाखेतील पदवीधर,पण मला सांगायचा की , तुला मेडिकल ला प्रवेश मिळावा , म्हणून मीच ती जागा सोडली , म्हणूनच तु डॉक्टर झाला आहेस. अगदी शेवटच्या दिवशी तो सकाळी माझ्या दवाखान्यात आला, आणि म्हणाला,अबे,थोड बीपी पाहून घे लवकर, मला ऑफिसला जायचे आहे. आणि दुपारी मी फ़ोन करून त्याच्या तब्बेतीची चौकशी करावी म्हणतो, तर तो रंगमहल सोडून गेला होता. माझा दुसरा मित्र , नेहमी शांत आणि समाधानी असायचा , एक दिवस संध्याकाळच्या दवाखान्यासाठी गेला, आणि घरी वापस येतांना एका छोट्याशा अपघातात असाच निघून गेला. माझ्या ४२ वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायात मला अनेक रुग्णांकडून असे अनुभव येत असतात , खुप काही त्रास नसतो, काही आधीचे आजार नसतात,वरवर पाहता सर्व आलबेल असतं आणि कोणालाही अपेक्षा नसतांना , हे रुग्ण अचानक बाहेरचा रस्ता धरतात.
मलाही असे घडणे , खटकत असते. वैद्यकीय क्षेत्रात ह्याला सडन डेथ सिंड्रोम (SDS ), किंबहुना , Sudden Arrhythmic Death Syndrome (SADS) मृत्यू असे नाव दिले जाते. आणि सोप्या शब्दात सांगायचे तर , हे मृत्यू हृदयातील विद्युत वाहिन्या (Electrical Conduction) आणि त्यांच्या गतीशी (Rhythms) निगडित , न समजणाऱ्या विकारामध्ये , मोडले जातात. अश्या मृत्यूचे कारण कधी कधी , अनुवांशिकते मध्ये लपले असते , पण त्याचे आधी निदान करणे सोपे तर नसतेच , पण कधी कधी अशक्यच असते. अति भावनिक धक्का , कधी कधी त्याला घडवून आणतो, पण त्यानेच ते होते, असे ठामपणे कोणालाच सांगता येत नाही.
माझे ह्याबाबत थोड वेगळे मत आहे, मला असे मृत्यू , त्या व्यक्तीची जीवनाकडे बघण्याची एकंदर दृष्टी, त्याची जीवन जगण्याची ओढ , त्याचे त्याच्या जीवनावर असलेले प्रेम आणि त्याची एकंदरीत आर्थिक, पारिवारिक, सामाजिक व भावनिक परिस्थिती , ह्या सर्वांशी निगडित वाटते. तसे पाहता कोणालाही काहीही त्रास न देता , असा मृत्यू होणे, ही त्याच व्यक्तीची आंतरिक इच्छा असावी, फक्त त्याचा त्रास , त्याच्याच प्रिय व्यक्तीला सहन करावा लागतो, हे मात्र खरे आहे. जन्म झाल्यावर मृत्यु येणार आणि त्याची वेळ विधिलिखित असते, हे अध्यात्म जरी त्रिकालाबादीत सत्य मानले , तरी आपण कधीही मृत्यूचा विचार न करता , आपल्या जीवनावर निस्सीम प्रेम करीत आनंदाने जगत रहावे , असे मला मनस्वी वाटते.