आपला परिवार, आपले नातलग आणि आपले मित्र ह्यामध्ये अनेकवेळा दुमत होत असल्याचे असंख्य अनुभव दैनंदिन जीवनात खूप वेळा येत असतात. आपले दुसऱ्यासोबत अगदी पूर्णपणे एकमत होते आहे,असे खचितच घडते. आपल्याला सत्य-असत्य, बरे-वाईट, खरे – खोटे असे दोन्ही अनुभव नेहमीच येत असतात, पण त्यात जे सत्य नाही, म्हणजेच ते असत्य आहे , असे आपण समजले पाहिजे. असत्याला आपले वेगळे अस्तित्व नसते, हे येथे मला नमूद करावसे वाटते. पण त्यात माझे सत्य आहे म्हणजेच दुसऱ्याचे असत्य असते, असा आपला समज असतो, आणि येथेच आपण चुकतो. बरेच वेळा आपल्याला जे सत्य वाटते, ते दुसऱ्यासाठी असत्य असू शकते, त्यामुळे सत्य आणि असत्य हे बरेच वेळा एकाच नाण्याच्या दोन विरुद्ध बाजू आहेत,असेही म्हणता येते. आपण कधी कधी सत्य बोलणे अडचणीचे वा दुसऱ्यासाठी नुकसानदायक असेल तर , सत्याचा काही भाग राखून ठेवतो,त्याला आपण अर्धसत्य समजुया, पण त्यात दोघेही खरे असले तरी , त्यात त्यांचे दुमत असते .
आपल्या वैवाहिक जीवनात तर , असे वादाचे प्रसंग सदोदित होत असतात. येथे दोन पूर्णतः भिन्न व्यक्ती , समाज जीवनाचा एक भाग म्हणून , एकत्र राहत असतात आणि यांच्यात एकमत अपेक्षित करणे, मला तर मूर्खपणाचे वाटते . असेच काहीसे कमी जास्त प्रमाणात सर्वच नात्यात असते, मग ह्यावर काही उपाय असू शकतो का ?
जर आपल्याला दुमताकडून एकमताकडे प्रवास करायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे , आपल्यासाठी नाते महत्वाचे की आपले मत , हे पाहिलेच ठरवावे लागते. जर नाते टिकवायचे असेल तर मत दुय्यम मानले पाहिजे. त्यानंतर दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची घाई करू नये . आपली प्रतिक्रिया (Reaction) ही प्रतिक्षेप (Reflex) असता कामा नये. आपली प्रतिक्रिया देण्यासाठी जर , आपण आपली वेळ घेतली , त्यावर सारासार विचार केला , तर ती प्रतिक्रिया जास्त परिपक्व असते . बरेच वेळा प्रतिक्रिया न देता , जर आपण आपले मौन पाळले, तर आपले मत मौनाद्वारे जास्त शशक्तपणे व्यक्त होत असते . मेरी मुर्गी की एकही टांग ,असे म्हणत वाद घालत बसण्यापेक्षा शांतपणे मौन बाळगणे , जास्त योग्य वाटते . येथे वादाच्या दोन्ही बाजु ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु असाव्यात, असे समजायला हरकत नसावी . जर आपण असे वागु शकलो तर दुमताकडुन एकमताकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे , असे समजावे. आपल्या स्वतः च्या आनंदासाठी असे प्रयत्न करणे , मला गरजेचे वाटते.