#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
माणूस परिचयाच्या नसलेल्या प्रदेशात असला की उगाच त्याला घरच्यासारख्या वस्तूंची, पदार्थांची, घटनांची आठवण येऊ लागते, ओढ लागते. मग तो जसंच्या तसं तो जिथे असेल तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहतो किंवा तसं काही दिसतंय का कुठे ते शोधत फिरतो. म्हणूनच असेल कदाचित घरी, भारतात असताना काहीही न करणारी मंडळी परदेशात गेल्यावर सर्व सण, वार, परंपरा, सोपस्कार नेमाने पाळताना, साजरे करताना दिसतात – म्हणजे समाजमाध्यमांवर तरी दिसतं तसं.
विदर्भातून दहावी झाल्यानंतर पुण्यात राहायला जाऊन तिथे नाही म्हटले तरी दोन गणेशोत्सव साजरे केलेल्या माझ्या एका जीवलग सखीचं असंच काहीसं झालं. दोन वर्षं पुण्यात राहून आल्यानंतर तिच्या डोक्यात घट्ट बसलं की मोदक म्हणजे उकडीचेच मोदक असतात. त्यामुळे ‘उकडीचे’ हा शब्द उच्चारला नाही तरी ती तो गृहीत धरू लागली. मग आणखी एक दोन ठिकाणी फिरून, राहून, दिवस काढून झाल्यानंतर राणीसरकारांनी कामानिमित्त छत्तीसगढची राजधानी रायपुर येथे आपले बस्तान बसवले. त्यावेळी मी सुद्धा नुकतीच कामासाठीच तिथे मुक्काम हलवला होता त्यामुळे आम्ही सहकारी, शेजारी अन् समदु:खी सुद्धा झालो अनेक अर्थाने.
दिवस पुढे जात गेले आणि पुनः एकदा आला गणेशोत्सव. आमच्या विद्यार्थिनींनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. आम्हाला नियमाने या सगळ्यात समोरून भाग घेण्याची सरळ परवानगी नव्हती. आडून आडून जो घेता आला तो घ्यावा हे मनोमन ठरलेलं. दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले अन् सकाळ संध्याकाळ आरती, प्रसादाचे वेळापत्रक पाळल्या जाऊ लागले. एरवी त्या आरतीच्या वेळी नेमके कुठले न् कुठले काम उपटसूंभासारखे उभे राहायचे अन् आरती-प्रसादाचा योग येत नव्हता पण आमच्या सखीची इच्छाशक्ती तीव्र असावी बहुधा – त्यातही ती आरती साठी होती की प्रसादासाठी यावर न बोललेलं बरं. तर या दहा दिवसांच्या उत्सवात एक दिवस हुल उठली की आज प्रसादासाठी मोदक आहेत.
झालं – पुणेकरांहून पुणेकर झालेल्या आमच्या झाडीपट्टीतल्या सखीला उकडीच्या मोदकांचा ध्यास जडला. सवयीप्रमाणे न उच्चारलेला ‘उकडीचे’ शब्द तिने मनोमन मोदकांच्या पुढे लावून घेतला अन् संध्याकाळ होण्याची वाट बघत बसली. अखेर ती अखंड प्रतिक्षेनंतर ची संध्याकाळ अवतरली अन् आरतीची वेळ झाली तशी स्वारी गणपतीच्या स्थानावर निघाली. आम्ही बापुडे हनुवटी छातीला लागेस्तवर मान खाली घालून काम करत बसलो. पण आमचा हा कामाचा उत्साह टिकतो न टिकतो तोच आमची सखी आमच्या मानेपेक्षाही खाली लटकलेला चेहरा घेऊन सामोरी आली अन् सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले – नक्की काय झालंय?
उत्तर आलं – मोदक उकडीचे नव्हते – बुंदीच्या लाडवाचे तयार केले होते. – झालं घोर निराशा. त्यानंतर कित्येक दिवस हे मोदक पुराण असं च सुरू राहिलं.
पण जिद्द हरली ती माझी सखी कसली – त्यातही पुण्यात राहून आलेली – मग तर विचारता सोय नाही. स्वयंपूर्ण अन् स्वयंभू असल्याचा फक्त समज नाही तर तशी पात्रता अंगी बाळगणारी आमची सखी – तिने ठरवलं या गणेशोत्सवात – म्हणजे पुढे आलेल्या – आपणच मोदक करायचे – तेही उकडीचेच. जे उकडीचे नसतात ते जणू मोदक च नसतात.
झालं – ठरलं म्हणजे ठरलं. तसंही राणीसरकार वयाच्या सोळाव्या वर्षी ५० जणांचा स्वयंपाक रांधणाऱ्या – त्यांना उकडीचे मोदक ते काय.
पण मग महत्वाकांक्षेच्या आकाशातून वास्तवाच्या जमिनीवर उतरल्यावर लक्षात आलं – सामान तर काहीच नाहीय. म्हणजे – ओलं नारळ खवायला आणि मुख्य म्हणजे मोदक उकडायला उकडीची सगळी सोय – कुठून करणार. एवीतेवी इंडक्शन वर मॅगी, अन् चहा करण्यापूरती भांडी. आता आली का पंचाईत. पण आमची सखी – ती असताना काहीच अशक्य नसतं.
मग आमच्याच एका सहकारी मैत्रिणीच्या आईने दिलेला छोटा स्टीमर – ज्याची जाळी सारखी सारखी खाली पाण्याच्या भांड्यात पडत होती ती घेतली मोदक वाफवण्यासाठी. मेसच्या आंटीकडून (हो आंटीच) मिक्सर मागवला. नारळ विकत घ्यायला तीन मुलीच आलेल्या दिसतात म्हटल्यावर दुकानदाराने नारळाचे आवरण ढीले करून दिले. मग नारळ, गूळ अन् तांदळाचं पीठ घेऊन आम्ही परत आलो अन् बसलो पराक्रम करायला. आमच्या तीघीमध्ये दोघी होत्या ज्यांनी मोदक खाल्ले होते, एक होती जिला मोदक कसे करतात हे फक्त बघून माहीत होतं अन् एक होती जिला न खाऊन मोदक माहिती होते न बघून. मग काय – पीठाच्या हिशोबाने सारण तयार करण्याचं सोडून आम्ही सारणाच्या हिशोबाने पीठ घेतलं. उकड तर छान जमली. आणि सारणही. म्हटलं ना आमच्या सुगरण सखीची कमाल अन् मोदक खाण्याची जिद्द. मग आकार देताना दमछाक झाली तिथे मी पुढाकार घेतला – आकार देण्याचा अन् शिकवण्याचा सुद्धा. कुठेतरी आपलाही उजेड पडायला नको का! एकूण ते मोदक करण्यासाठी सुरुवातीपासून तर ते पोटात जाईपर्यंत यांचे नाही म्हटलं तरी ६ तास गेलेच असतील. पण छत्तीसगढच्या बुंदीच्या मोदकांना पुढच्याच वर्षी उकडीच्या मोदकांनी उत्तर देता आलं अन् पोटभरून, मनभरून मोदक खाता आले हे ही नसे थोडके.