*पैठणी – शांता शेळके*
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी
माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गूढ आहे त्यास
धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली
वर्षामागून वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले
कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो
आजीला माझ्या कुशल सांगा
रसग्रहण —
पैठणी(रसग्रहण)
अतिशय सुंदर सामाजिक पारंपारिक आणि कौटुंबिक दजिव्हाळा जपणा-या स्त्रीमना चे दर्शन घडविणारी ही कविता.
पैठणी दूसरी तिसरी कुणी नाही तर एक संस्कारी स्त्री जिचे जीवन मुल्यवान आहे.जडण घडण मजबूत आहे.वेळप्रसंगी कडक तर कधी मायेची उब आहे.
फडताळ हा शब्द वाचल्या बरोबर एक जुने कपाट नजरेसमोर आल्याशिवाय रहात नाही.त्यातही तळाशी जपलेलं गाठोडे.स्त्रीमनाची जडण घडण यात दिसून येते.अनेक आठवणींना मनाच्या कोपऱ्यात दडवणारी भावनांना जपणारी जुन्या काळातील स्त्री नजरेसमोर येते.त्याकाळात अत्यंत मुल्यवान अशा गोष्टी फडताळात ठेवल्या जायच्या.जसे एका संवेदनशील स्त्रीसाठी तिच्या आठवणी तिची माणसं तिचे संपूर्ण कुटुंबच मुल्यवान असायचे.आपल्या लहान मुलांचे बाळलेणे,अंगडी टोपी थी नातवंडं होईपर्यंत जपायची .तिच्यासाठी ती पैठणी इतकीच महत्वाची असायची.
आता आपण पैठणी कडे वळू या .शांताबाईंनी ' पैठणी 'च का निवडली असावी.तर पैठणी हे एक श्रीमंतीचं लक्षण आहे.पैठणी सर्वांकडेच नसायची.म्हणजे आजीची सांपत्तिक स्थिती चांगली होती . तरीसुद्धा ती अहंकारी नव्हती.तिला माणसांचा लळा होता.दूसरं असं की पैठणी ही पारंपारिक आहे.एका पिढिकडून दूस-या पिढीकडे जाणारा वारसा आहे.ही साडी वर्षानुवर्षे टिकते.पिढ्या दर पिढ्या चालत रहाते.त्या पैठणी द्वारे चालत आलेला वारसा नाती पर्यंत पोचला आहे.हे त्यांना दाखवायचे आहे.आता ती पैठणी कशी तर धानी रंगाची
नारळी रंगाचा पदर असलेली.इथेही पहा कवयित्रीचं निसर्गप्रेम दिसून येत.धानी रंग म्हणजे शेतातील हलक्या हिरव्या रंगाचे गवत जे कोवळे असते.तलम असते नाजूक असते.तशीच ती पैठणी नाजूक पोत असलेली सुंदर साडी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संपन्न घरातील स्त्री दर्शविणारी .तिला पदर कसा तर जरीची चौकडी असलेला .यातही नारळाचा उल्लेख आलाच .वरून तो भरजरी आणि चौकडीचा.ही चौकोडी साधीसुधी नाही बरं का .ही चौकडी म्हणजे आजीने विणलेल्या नात्यांची चौकडी आहे ती जिच्यासाठी कुटुंबातील माणसं भरजरी आहेत.यातून तिच्या मनाची श्रीमंती दर्शवायची आहे.
कवयित्री सांगते तिच्या आजीने लग्नात ही पैठणी घातली होती आणि ती सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेत होती.यातून संस्कारक्षमता दिसून येते.प्रत्येकाच्या पाया पडताना मिळालेल्या आशीर्वादाचा एक वेगळाच सुगंध जाणवत होता .तर अवतीभवती असणा-या लहान मुलांच्या कुतुहुलापोटी केलेल्या स्पर्शाचा सुद्धा सुगंध त्यातून दरवळत होता.लग्न झालेली संस्कारशील नववधू यातून दिसते.काही लोक ओळखीचे तर काही अनोळखी.कसे असतील सासरची माणसं.याचा अंदाज घेण्याला किंवा जाणीव असायला गूढ म्हटलं आहे.
पैठणी हे महावस्त्र मानले जाते.मग कुठलाही सण समारंभ असो उच्चकुलीन स्त्रिया पैठणीतच वापरायच्या.मग त्यानिमित्ताने जळलेल्या धूप अगरबत्तीचा वास तिला लागायचाच.पण इथे धूप अगरबत्ती चे जळणे प्रतिकात्मक आहे.तिच्या मनाला झालेल्या सुखदुःखाच्या जाणीवा यांच्याशी निगडीत आहे.श्रीमंत असली तरी तिच्याही काही भावनांना तिला मुरड घालावी लागलीच.मन दुखावले गेले.पण त्या पैठणीने ते जपले तिच्या आतच ते दडले राहिले.शेवंती आणि चमेलीचा सुगंध टवटवीतपणा तिने जपला अशी कित्येक वर्ष निघून गेली.संसारातील टक्केटोणपे खाता खाता ती कडक झाली मजबूत झाली.अनेक प्रकारची नाती निभावता निभावता खस्ता खात ती जुनी झाली म्हणजेच त्या पैठणीने आता आजीच मऊ रूप धारण केलं आणि एक वेगळंच परिवर्तन तिच्यात दिसून आलं.नातवंडावर प्रेम करताना तिचा कडकपणा कुठे नाहीसा झाला ते कळलंच नाही.कवयित्रीला त्या पैठणीच्या रुपात आजीच्या स्वभावाचे अनेक पदर उलगडले जातात.कवयित्री म्हणते अशी ही माझी आजी किती भाग्यशाली होती की तिला अहेवपणी मरण आले.खरंतर इथे एक वेगळाच अर्थ लागत आहे.आता ही पैठणी इतकीच भाग्यशाली आहे की पिढी दर पिढी ती माझ्या कडे आली म्हणजे आजीचेच संस्कार मी अजूनही जपत आहे..त्या पैठणीला मी अजूनही उराशी कवटाळून धरते.याचा अर्थ आजीने दिलेले संस्कार अजूनही त्यागिले नाही.ते संस्कारांचे बाळकडू तिच्या पैठणीतून माझ्याकडे आले आहेत .अजून मी काहीच विसरले नाही.मधला काळ जणू आलाच नाही.यातही कवयित्री आपल्याला सांगू इच्छितात की मध्ये संस्कारहीनता समाजात बोकाळली होती.पण परत एकदा लोक जुन्या संस्कारांकडे वळताना दिसतात . म्हणून कवयित्री पैठणीच्या चौकड्यांनो
आजीला माझ्या कुशल सांगा.यात संस्कार , कुटुंबातील जिव्हाळा नातीगोती अजूनही मी जपली आहे.पिढी दर पिढी आलेल्या
पैठणीसारखाच!