पुढचा क्षण आपला आहे की नाही यांची खात्री कोणीच देऊ शकत नाही. सकाळी नाश्ता करताना चमच्यातला घास चमच्यात राहील त्यांनी मान टाकली क्षणात खेळ संपला. अशा अनेक घटना आपण आजू बाजूस बघत असतो तरीही आयुष्यात आपण स्वतःला खूप गृहीत धरतो जणू आपण अमरपट्टा घेऊन जन्मलो आहोत असे सर्वाना वाटते आणि या भावनेने “नंतर” या शब्दाचा आपण सर्रास वापर करू लागतो. खरं तर जीवन मरणात फक्त एका श्वासाच अंतर असतें… पण कारण नसताना गोष्टी उद्यावर ढकलायची सवय लागते आणि आपल्या बकेटलीस्टचे वजनही वाढत जाते.
काही जण आपल्या भूतकाळात इतके रमले असतात.. अजूनही ते कधी काळी असलेली भूतकाळातील प्रतिष्ठा, मोठेपणा कुरवाळत बसतात किंवा कटू स्मृती आठवून स्वतःला त्रास करून घेतात.
भूतकाळाच्या कटू स्मृती आणि येणाऱ्या भविष्याची भीती आपला बहुमूल्य वर्तमान बाधित करीत असतें म्हणून फक्त वर्तमानात जगा. जसं जसं वय सरत तशी याची जाणीव प्रकर्षाने होते.
काहीवेळा आयुष्यात ती घटना घडणारही नसते पण त्या न घडणाऱ्या घटनेची चिंता आजचा आनंद हिरावून घेत असते.समस्यापासून दूर जाऊन ती नष्ट होत नाही किंवा तिला पेंडिंग ठेवली तर काट्याचा नायटा होतो तिला सामोरे जाणे हाच खरा उपाय आहे.. नंतर बघू नंतर सोडवू ही विचारसरणी चूक ठरू शकते.
नापास होईल या भीतीने सर्व उन्हाळयांची सुटी तणावात घालण्या ऐवजी, आपले प्रयत्न प्रामाणिक होते पेपर कठीण आला पास होणे कठीण आहे असे घरच्या बरोबर त्याच दिवशी शेअर करून जे होईल ते होईल… आल अंगावर तर घेईल शिंगावर वा बचेंगे तो और भी लढेंगे ही वृत्ती हवी.
वक्त चित्रपटातील एक गीत आठवते त्यात जीवनाचे वास्तव सांगितले आहे.
“आगे भी जाने न तू
पीछे भी जाने न तू
जो भी है बस
यही एक पल है l “
हे गीत क्षणाचे महत्व अधोरेखित करते.
“आता कशाला उद्याची बात” हे १९३९ मधील व्ही. शांताराम यांच्या अतिशय गाजलेल्या ‘माणूस’ या मराठी चित्रपटातील शांता हुबळीकर यांनी गायलेले आयकॉनिक गाणे. ,मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केले होते.ते वर्तमानात जगा ही याच अर्थाचे, त्यावेळी खूप सुपरहिट होते ते.
… हे नंतर करेन,
… हे नंतर सांगेन,
… नंतर विचारेल ,…
… नंतर बघेन..
… हे नंतर लिहीन
अशी अगणित नंतरची कामे आपण शिल्लक ठेवतो.या कधीच न संपणाऱ्या नंतरच्या यादीवर या मनात आलेल्या ताबडतोब टा क्षणी लिहून थांबतो..
तीन ती अक्षर…फक्त्त “नंतर”.
वाढवतात दुरी अन तें अंतर..
कार्य जरी उद्याला तुमचे नंतर
उरकुनी टाका आज तें सत्वर..
आज आता दिवस आला
संध्या झाली बघता बघता..
सोमवार हा असे वाटता
रविवार लगेचच तो आला..
महिने संपले,अनेक वर्ष संपली
नकळत पोहचलो ६०व्या वर्षी..
माता पिता आप्तस्वकीय तें
आम्हाला सोडून गेले हो काही..
कालचक्र अविरत पुढे जातें
आता कसे फिरायचे मागे ?
जो काही वेळ उरला आता
त्याचा घ्या सर्वं पूर्ण फायदा ..
आयुष्यात रंग भरा हो …
मनमुराद आनंद लुटा हो …
आवडते तें करण्यासाठी
पळभरही थांबायचे नाही..
‘नंतर’ आपुल्या हाती पक्के
समजूनी पुढे ढकलतो सगळे?
… नंतर नंतर…नका बोलु हो
उदया करायचे.. आज कराहो
काय गोडी त्या चहाची
चहा थंड झाल्यानंतर …
काय फिरण्याची ती गंम्मत
उत्साह निघून गेल्यानंतर…
जेवण्यावर येते बंदी
आरोग्य बिघडल्यानंतर …
श्राधाला गोड खीर ती,
आई-वडील गेल्यानंतर …
आश्वासन कागदी राहिली
आश्वासन न पाळल्यानंतर…
पश्च्यातापाचा उपयोग नाही …
वेळ ती निघून गेल्यानंतर
आपल्यास मगअवचित कळते…
उशीर तो झाला… अरे बापरे!!..
आपण फक्त्त धावतच होतो .
जीवन जगायचे मात्र राहिले..
उतरणीस वय आले आता
वादविवाद सर्वं बाजू ठेवा..
उदयासाठी न बाकी काही
नंतर शब्द तो नित्य विसरा..
आनंदे जगा सर्वं आज हो,
जसा जीवनी, अंतिम हा क्षण..
मनात येईल ते खुशाल करुनी ,
वेचा आनंदाचे कण अन कण ..
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६