लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच सीमांत पूजनाच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस साधारपणे ६.३० ला लग्नाच्या ठिकाणी वर पक्ष पोहचला. त्या दिवशीचे सर्व विधी आटोपून लवकरात लवकर निजावे, म्हणजे दुसऱ्या दिवशी वेळेवर लग्न लागेल यादृष्टीने झालेले नियोजन अगदी योग्यरीत्या पार पडले. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर वेळेवर लग्न लागले.
लग्नामध्ये होत असलेली समुद्रपूरकरांची धावपळ बघून लक्ष्मणराव त्यांना हळूच म्हणाले, अजयराव जरा शांतपणे. काहीपण काम असेल तर सांगा, माझ्याकडे मुले आहेत. समुद्रपूरकर तेवढ्यात बोलणार तेव्हा त्यांना न बोलू देता, लक्ष्मणराव त्यांना समजावत म्हणाले. लग्न हे दोन्ही पक्षांमिळून एकमेकांच्या साहाय्याने पार पाडले जाणारे कार्य आहे. मुलीची पडती बाजू असते वगैरे मी मानणारा नाही. त्यामुळे बिनधास्त राहा. माझा विजय आणि त्याची टीम सगळं व्यवस्थित सांभाळेल. तुम्ही सर्व विधीमध्ये लक्ष असू द्या. लक्ष्मणरावांच्या ह्या सर्व बोलण्यामुळे आपण स्वतः काय बोलावे हे अजय यांना सुचेना. डोळ्यात येत असलेले पाणी बाहेर न येऊ देता लक्ष्मणरावांना धन्यवाद देऊन ते बाकी कार्याकडे वळले.
लग्नाचा दिवस जसजसा जात होता एक एक विधी पार पडत होता. कन्यादान, सप्तपदी आणि इतरही आवश्यक विधी पार पडलेले होते. कन्यादानाच्या विधीच्या वेळी जेव्हा विजयला त्याच्या कामांमधून वेळ भेटला तेव्हा त्याने आवर्जून तो विधी बघितला. तो विधी बघतांना तो स्वतःच्या भावनांवर आवर घालू शकत नव्हता. तेव्हा वातावरण फारच भावुक झालेले होते. कात्यायनीची आई, वडील, तिची बहीण हे तर भावुक होणे साहजिक होते. पण आपलं लहान कार्ट का भावुक होतयं हे सुमनबाईंनी जाणून घेण्याचा पर्यंत केला तेव्हा विजय त्यावर काहीही बोलला नाही. मात्र लक्ष्मणरावांच्या ते लक्षात येत होते. आपले मुले जेवढे कर्तबगार, धीट आहेत तेवढेच संवेदनशील सुद्धा आहेत याचा अभिमान त्यांना वाटत होता.
सुन मुखाच्या वेळेस तर सुमनबाईंना कात्यायनीकडे बघून कात्यायनीला पहिल्यांदा बघितले तो दिवस आठवला. तर मुलीच्या पाठवणीच्या वेळी साक्षात मुलाची आई रडते हे बघून विजय सहज त्याच्या आईला म्हणाला,
आई लक्षात आले ना माझ्या डोळ्यात का पाणी आले होते?
शेवटी सगळे विधी संपवून लक्ष्मणराव आणि कुटुंब गावी रवाना होतात. तेव्हा कात्यायनीच्या मनात बरेच विचार सुरू असतात. तिचे जे आवडते आहे ते तिला करता येईल का? ते जर नाही झाले तर काय? पण सासरच्यांनी तर आश्वस्त केलेले आहे. ते फक्त बोलण्याचेच आहे की कृतीही होणार. असे बरेच विचार तिच्या मनात येतात. हे असे का होतेय? नकारात्मक विचार का येत आहे हेच तिच्या लक्षात येत नाही. हे बरोबर नाही कात्यायनी असे स्वतःलाच म्हणून ती गाव येण्याची वाट पाहते.
घरी सुनेच्या गृहप्रवेशाची पूर्ण तयारी झालेली असते. जिकडे तिकडे केलेली रोषणाई आणि विविध प्रकारच्या रांगोळ्या बघून संजय आणि कात्यायनी भारावून जातात. काही रांगोळ्या ज्या मराठी आणि इंग्रजी सुविचाराच्या काढलेल्या असतात, त्या विशेषकरून कात्यायनीसाठी असतात. ते बघून तिला लक्षात येते की, आपण जे विचार करत होतो ते चुकीचे होते. जिथे आपला आज प्रवेश होणार आहे त्यांना आपल्या स्वप्नांची जाणीवच नाही तर त्यांनी स्वतः ते जगायला सुरुवात केली आहे.
गृह प्रवेश पार पडल्यानंतर आणि बाकी गप्पा, गमती-जमती झाल्यानंतर सर्वत्र शांतता होते. त्या शांततेत लक्ष्मणराव देवघराजवळ येऊन आपल्या विठ्ठलाशी नेहमी प्रमाणे संवाद साधून प्रार्थनाही करतात.
हे विठुराया, आजपर्यंत तू जे केले आहेस ते सर्व चांगलेच केले आहे. आतापर्यंत तुझ्या साक्षीने सर्व झालेले आहे. यापुढेही तुझ्या साक्षीनेच सर्व काही होऊ दे.
आज तुझ्याच कृपेने पुन्हा एकदा आयुष्याचा एक अध्याय संपला आहे.