एव्हाना आमच्या लग्नाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. खूप सारे प्रेम आणि मधे मधे छोटे मोठे वादविवाद होत होत आमच संसार वृक्ष छान फुलला आहे. त्याला दोन मधुर फळे सुद्धा लागली आहेत . का म्हणून माहीत नाही पण, कधी माझी स्वारी लाडात आली की , मी माझ्या पत्नीला निसर्गतः “ मां “ म्हणून आवाज देतो , मला असे का वाटावे, हे मलाच पडलेले कोडे आहे, त्या निमित्ताने .
आपल्या प्राचीन भारतीय साहित्यात(मुख्यतः गरुड़ पुराण) एक प्रसिद्ध श्लोक आहे, जो एक आदर्श भारतीय पत्नीचे सहा गुण किंवा अपेक्षित भूमिकांचे वर्णन करतात .
कार्येषु मन्त्री करणेषु दासी,
भोज्येषु माता शयनेषु रम्भा ।
धर्मानुकूला क्षमया धरित्री,
भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा ॥
ह्या श्लोकानुसार ह्या सहाही भूमिका कोणाही पत्नीकडून अपेक्षित करणे, दुर्लभ वा चुकीचे आहे, असे म्हटले आहे.
आता , कार्येषु मन्त्री म्हणजे घरी किंवा परिवारात एखाद्या महत्वाच्या कामात ती एक बुद्धिमान मंत्र्यासारखी काम करते. करणेषु दासी म्हणजेच आपल्या रोजच्या कामात ती एक अहंकार नसलेली समर्पित सेविका (दासी) असते.
भोज्येषु माता म्हणजे आपला पती आणि अन्य कुटुंबासाठी ती आई सारखी सस्नेह आणि मायेने जेवण करून देते . शयनेषु रम्भा म्हणजे शयनकक्षात ती स्वर्गातील अप्सरेसारखी (रम्भा) सुख आणि आनंद देत असते .
धर्मानुकूला म्हणजे कोणत्याही धार्मिक कार्यात ती सहधर्मचारिणी म्हणून सहभागी असते . आणि सर्वात महत्त्वाचे तर ती , क्षमया धरित्री म्हणजे क्षमा किंवा माफी करतांना पृथ्वी सारखी धैर्यवान और सहनशील असते.
अशी पत्नी असणे , खूप दुर्लभ असते,हे जरी मानले तरी , माझ्या. “ मां “ मध्ये ह्यातले बरेच गुण आहेत म्हणूनच मला निसर्गतः तिला “ मां “ असेच म्हणावसे वाटत असावे.
आपल्या पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत बरेचदा पत्नीला उपहासात्मक वागणूक दिली जाते. बऱ्याच वेळा तिच्यावर विनोद करणे, हा पुरुषांचा जन्मसिद्ध समाजमान्य अधिकार असल्याचे मानले जाते. आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी ह्या सुद्धा कोठेतरी कोणाची पत्नी म्हणूनही वावरत असते, त्यामुळे असे वागणे योग्य की अयोग्य हा विचार आपल्या मनात आला पाहिजे.