कालपासूनच विचार करत होतो की, उद्यासाठी कोणत्या विषयावर लिहावे. काही विषय सुचत होते. एका विषयावर थोडे लिहूनही काढले, पण पुढे जाता आले नाही. त्यात आज एकामागून एक अडथळे येत होते. त्यामुळे लिखाणावर फारसा विचार करायला वेळ सुद्धा मिळत नव्हता. बुधवार असल्याने लाईट जाऊ शकते याची खात्री होती. म्हणून सकाळीच लवकर मोबाईल चार्जिंग करून घ्यावा, तर तो थोडा चार्ज होत नाही तर लाईट गेले. आणि ऑफिस संबंधित फोन सुरू झालेत. क्वचितच मोबाईलचे चार्जर ऑफिसमधे घेऊन जाणारा मी आज ते घेऊन गेलो. पण चार्जिंगला फोन लावायचे राहून गेले. कारण पुन्हा पुन्हा फोन वाजत होते आणि ते रिसिव्ह करून बोलणे भाग होते. तेवढ्यात कॉम्प्युटरवर कार्य करतांना ते एकाएकी बंद पडले. काही केल्या ते पुन्हा सुरू होत नव्हते. कालपासूनच प्रिंटरही संपावर गेल्यासारखा काम करणे बंद झाला. कॉम्प्युटर च्या एकाएकी खराब झालेल्या तब्बेतीविषयी बॉस च्या कानावर टाकले आणि त्यांनी एकदम हायसे वाटेल असे काही म्हटले,
वैभव कालच माझ्या मनात नवीन कॉम्प्युटर घ्यावा (जरी माझी ती इच्छा नसली तरी) असे मनात आले. आणि तू मला तो सुरू होत नसल्याची बातमी दिली.
मग एकदम मोबाईल कडे लक्ष गेले तर तो एक भुकेल्या व्यक्तीसारखा माझ्याकडे बघत होता. जणू त्याला म्हणायचे होते, अरे तुझ्या टिफीन प्रमाणे माझा पण आणला आहेस ना. मग काढ ना तो जरा, की माझी बंद पडण्याची वाट बघतोस.
माझ्या पटकन लक्षात आले. याला चार्जिंगवर लावला पाहिजे.
आपलं आयुष्य अगदी पूर्णपणे नाही पण असेच असते.
मनुष्य बंद पडला की तो पुन्हा मोबाईलसारखा सुरू होणे शक्य नाही. तरी एकाएकी कधी काय घडेल हे मनुष्याच्या बाबतीत सुद्धा सांगता येत नाही. म्हणून स्वतःला ज्ञान, विचार, स्वास्थ्य याबाबतीत अद्ययावत (अपडेट) ठेवणे आवश्यक असते.
कॉम्प्युटर मधील साठवलेल्या विविध प्रकारच्या माहितीचा बॅकअप घेता येतो. तो सुरू नाही झाला तरी त्याचेही एकाकून एक हुशार डॉक्टर्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे मनुष्यालाही जपलेल्या नात्यांचा, चांगल्या कर्मांचा आणि ज्ञानाचा बॅकअप ठेवणे तेवढेच आवश्यक असते. या सर्वांच्या सोबतीला जर नामस्मरण असेल तर ते या बॅकअपला पूरक ठरते. आणि ते एका शक्तिशाली चार्जर चे कार्य करून एकाएकी आलेल्या विपरीत परिस्थितीतून मार्ग दाखवून पुढे जाण्यास मदत करते. पण इथे सुद्धा अटी लागू असतात. इथे सर्वच प्रकारच्या कर्माचा बॅलन्स बघितल्या जातो आणि त्यानुसारच फळ मिळते.
एकंदरीत मशिन्स आणि मनुष्याचे काही बाबतीत सेम सेम असते.
कॉम्प्युटर बंद पडल्याने त्यामुळे फारसे काही कार्य ऑफिसमध्ये नसल्याने #सुरपाखरु साठी लेख लिहिणारा वैभव.