१९५० आणि त्यानंतरचा काळ असेल. माझी आजी म्हणजेच वडिलांची आई, जी तेव्हाच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होती. शिक्षिका आणि शैक्षणिक पर्यवेक्षकाची जबाबदारी ती पार पाडायची. तिला माझ्या वडिलांनीही बघितले नव्हते. ते दिड ते दोन वर्षांचे, मोठे काका दहा, तर लहान काका सात वर्षांचे असतील.
तेव्हा आजी एकाएकी एका छोट्याशा आजाराने गेली. जरी तिला वडिलांनी बघितले नव्हते मग आमचा प्रश्नच येत नव्हता. पण तरी सुद्धा मला तिच्याविषयी नेहमी एकप्रकारचे कौतुक वाटले आहे. तिचा तो भलामोठा फोटो, चेहऱ्यावरील तेज, तिने लावलेला तो कुंकवाचा मोठ्ठा गोल टिळा हे ते जेव्हा जेव्हा फोटोत बघतो तेव्हा बघतच रहावे असे वाटते. यामागचे कारण काय माहीत नाही मात्र ती आजी असण्यापलीकडे काहीतरी तर कनेक्शन असावे असे नेहमी वाटायचे. ते काय असेल त्याचे आजतागायत उत्तर मिळाले नाही. पण तिची जी डायरी आजही माझ्याकडे आहे जी माझ्या वडिलांनी सांभाळून ठेवलेली होती. ती जेव्हा सुद्धा बघितली तेव्हा असेच लक्षात आले की, आजींचे नियोजन पक्के असायचे.
ती जिथे कुठे दौऱ्यावर जायची ते सर्व लिहून ठेवायची. तेव्हा प्रौढ वर्ग चालायचे, तर त्या वर्गात किती विद्यार्थी आलेत किती गैरहजर आहेत हे पण ती व्यवस्थित नोंद करून ठेवत होती.
त्या डायरीच्या आधी पण तिची एक संपलेली डायरी असावी असा माझा अंदाज आहे. कारण जी डायरी मी सांभाळून ठेवली आहे तिचे काही पानेच भरलेले आहेत. पुढे त्यात मला काहीच नोंद दिसत नाही.
ज्या आजीला कधी बघितले नाही तिची एक आठवण सांभाळून ठेवण्यापासून तर ती डायरी आमच्याकडे द्या असे म्हणणारे एक वरिष्ठ कुटुंबीय, ती माझ्याकडे असू दे असा म्हणणारा भाऊ, तर तुझ्याकडे ती कशी काय ? तू छान सांभाळून ठेवली असे म्हणणारे चुलते. हे इथपर्यंत सगळं झालं आहे.
जेव्हाही ती डायरी बघतो तेव्हा एक लक्षात येतं, तेव्हाच्या काळात एका स्त्रीने शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणे, पर्यवेक्षक म्हणून बाहेरगावचे दौरे करणे, त्यातही प्रौढ वर्ग घेणे किती आव्हानात्मक असेल. कारण घरच्या जबाबदाऱ्या आणि नोकरी यात समतोल साधून ते सर्व करायचे म्हणजे सोपे नव्हतेच.
अशा बऱ्याच गोष्टी आपल्यापैकी बरेच व्यक्ती एक वारसा म्हणून जपून ठेवतात. कारण त्यात कुठेतरी भावना असतात, त्या व्यक्तींचा त्या वस्तुला स्पर्श झालेला असतो. त्या जपून ठेवणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीविषयी असलेला आदर व्यक्त होय.
अशा कर्तृत्ववान स्त्रीचा वारसा जपून ठेवण्याचा अभिमान तर आहेच. पण तिच्या पुढच्या पिढीतील स्त्रियांनी, म्हणजेच तिच्या नातींनी सुद्धा आपल्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली, याचा आनंद तिला ती जिथे कुठे असेल तिथून होत असणारच.