श्रीधरजी जहागीरदार ह्यांची एका साहित्य-समूहात ओळख झाली, परिचय, स्नेह वाढत गेला आणि आता श्रीधरजी , श्रीधर झाला आहे, माझ्यासाठी.
श्रीधर जहागीरदार सुरपाखरू या समूहाला चांगलाच परिचयाचा आहे. एक चिंतनशील साहित्यिक आहे आणि अनेकांना प्रेरणा देणारा समुदेशक आहे.
त्याची ही कविता मला किती उमगली ते इथं मांडतो आहे.
-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:
श्रीधर जहागीरदारची
खूप जुनी कविता
*विसावा*
तुला जाणीले पहिल्यांदा मी रानाच्या काठी,
खुशाल होता झुलत कोवळ्या पानाच्या देठी…
कां नाकारू, भय अनामिक जळात थरथरले ,
रान पांखरू माथ्यावरुनी होते भिरभिरले….
वणवण फिरलो शोधण्यास मी माझा ध्रुव तारा,
क्षणभर देखील तुझ्या विचारा दिला न मी थारा…
किती तुडवल्या रानोरानी नंतर बाभूळ वाटा,
कधी घडविल्या रक्त सिंचुनी नवीन पाऊल वाटा…
अंतरातले किती किनारे वादळ साहून पुरले,
ऊर फाटले दर्याचे पण शिबाड शाबूत उरले,
अटळ सावली परि तुझी ही नभ व्यापून उरली,
शिशिरामधली पानगळी कां वसंतात स्मरली…
दिसे अता मज रानामधला डोह चांदणे प्याला,
जरा विसावा घे .. नभातून मला इशारा आला…
– श्रीधर जहागिरदार
२६.०३.२०१२
मला त्यात उमजलेलं…
श्रीधर
तू पाठवलेली गहन कविता अगोदर वाचली आहे, परत परत वाचली.
आज थोडं लिहायला बसलो, पहा, मला काही उमगलं आहे का? की एक फक्त शब्द-जाल झालंय?
रानाच्या काठी …
कोवळ्या पानाच्या देठी अंकुरणारं नवजीवन तुला दिसलं आणि त्याचवेळी ते भिरभिरणारं पाखरूही तुझ्या नजरेतून सुटलं नाही.
शोध घेणारा आणि ज्याचा शोध घ्यायचा आहे, यांचा एक छान लपंडाव चालू आहे पहा. शोधणाऱ्याची ही दृष्टी काही वेगळीच आहे. रान पाखरू, भिरभिरून जाणारं, उगाच अनामिक भय निर्माण करुन जाणारं, सुटलं नाही नजरेतून तुझ्या.
त्याला टाळायचा किती प्रयत्न, स्वत:त गढून जाऊन मार्ग आक्रमत, सारं सहन करीत, किती संकटं अंगावर घेतलीत…
थोडं काही शिबाड शाबूत राहिलं आहे ह्या झंझावातात…
तरी त्याची सावली अटळ, सदैव व्यापून राहणारी…
अगदी आनंदोत्सवीही तुला जाणवणारी चाहूल… नजरंच तुझी ती…
डोह, रहस्यमय आणि गूढ वाटणारा; त्यात पडलेलं चांदणं देत आहे एक अंतिम विसाव्याचा इशारा…
आता…
तो इशाराही तू समजतोस…
तो कुठल्या अनिष्ठाचा नाहीय, निरंतर विसाव्याची चाहूल आहे ती.
जन सामान्याला भयभीत करून जाईल असला हा इशारा, पण तुझी संवेदना वेगळीच आहे, तुझी दृष्टी वेगळी आहे.
कोण असावास तू? शरीर, मन, बुध्दी, चित्त, नेणीव, जाणीव ह्या पलीकडचं बघण्याचं कसब असणारा तू … ‘स्व’…
सूरतच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून निवृत्त प्राध्यापक, फाॅरमॅकोलाॅजी विषयाचा; वयाच्या ७१ वर्षापर्यंत वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत.
सूरत, इंदौर आणि मंडी ( हिमाचल प्रदेश) इथं आलटून पालटून वास्तव्य.
वैज्ञानिक विषय आणि मराठी साहित्यात आवड आहे, थोडं फार लिखाणही करीत असतो. काही रचना पुरस्कृत. मागच्या वर्षी 'संस्कृतीचे अवशेष' हा अनुवादित कवितासंग्रह (अष्टगंध प्रकाशन ठाणे) प्रकाशित.