“गणपत वाणी विडी पिताना,
चावायचा नुसतीच काडी,
अन् म्हणायचा मनाशीच,
या जागेवर बांधीन माडी.”
बा. सी. मर्ढेकरांची ही कविता. गणपत वाणी म्हणजे फक्त स्वप्नं बघणारा माणूस. स्वप्नं मोठी, पण त्यासाठी पाऊल एकही नाही.
वयाच्या सोळा ते वीस वर्षांत आपण सगळेच असे असतो. “मी हे करणार, मी ते करणार, मोठं नाव कमवणार…” अशी कितीतरी स्वप्नं मनात असतात. पण कधी कधी वाटतं, आपलंसुद्धा “गणपत वाणी” तर होणार नाही ना?
स्वप्नं पाहणं चुकीचं नाही. उलट ती असायलाच हवीत. पण ती पूर्ण करण्यासाठी घाम गाळण्याची तयारीही हवी. फार तर एक-दोन टक्के लोक एखादं ध्येय ठरवतात, त्यासाठी सातत्याने मेहनत करतात आणि यशस्वी होतात. बाकीचे? ते स्वप्नं बघत राहतात; पण त्यांच्यामागे धावत नाहीत.
“काहीतरी करून दाखवायचं आहे,” असं अनेक जण म्हणतात. पण ते “काहीतरी” म्हणजे नेमकं काय, हेच त्यांना माहीत नसतं. मग वर्षामागून वर्षं जातात आणि स्वप्नं मनाच्या एखाद्या कोपऱ्यात धूळ खात पडून राहतात. इतकंच काय, कधीतरी आपण अशी स्वप्नं पाहिली होती, हेही विसरून जातो.
लहान मूल म्हणतं, “मला डॉक्टर व्हायचं आहे… इंजिनिअर व्हायचं आहे… सैनिक व्हायचं आहे,” तेव्हा आपण त्याचं कौतुक करतो. कारण त्यात निरागसपणा असतो. पण मोठी माणसंही जर फक्त बोलत राहिली आणि त्या दिशेने एकही पाऊल टाकलं नाही, तर ती खरंच शोकांतिका आहे.
आज माहिती मिळवणं खूप सोपं झालं आहे. एका क्लिकवर जगभराचं ज्ञान मोबाईलवर येतं. पण माहिती मिळणं आणि ज्ञान मिळणं यात खूप फरक आहे. पूर्वी पुस्तक मिळवण्यासाठी वाचनालयात जावं लागायचं. मेहनत घ्यावी लागायची. आज ती गरज कमी झाली आहे.
गुगलवर दोन ओळी वाचल्या म्हणजे विषय समजला, असा गैरसमज अनेकांचा असतो. पण एखादा विषय शांतपणे, सखोल वाचला की मेंदू वेगळ्याच पद्धतीने काम करतो. विचार करण्याची क्षमता वाढते. समज समृद्ध होते. म्हणूनच “गुगल सांगेल ना!” या विचारावर विसंबून राहिलो, तर आपणही नकळत त्या गणपत वाणीच्या रांगेत जाऊन बसतो.
वयाची चाळीशी ओलांडली की थोडा मोकळा वेळ मिळायला लागतो. मुलं मोठी होतात. जबाबदाऱ्या थोड्या हलक्या होतात. तेव्हा अनेकांच्या मनात एकच विचार डोकावतो—“अरे, हे तर मला तरुणपणी करायचं होतं!” पण तेव्हा वेळ नव्हता, पैसे नव्हते, धाडस नव्हतं… आणि आता वय निघून गेलं.
किती जणांचं गाणं शिकायचं स्वप्न अपुरंच राहतं. कित्येकांना नृत्य शिकायचं असतं; पण लगेच मन समजावतं, “आता चाळिशीनंतर काय डान्स शिकायचा?”
पण खरंच, शिकायला वय असतं का?
मनाला आनंद देणारी गोष्ट असेल, तर ती कोणत्याही वयात सुरू करता येते. गाणं, चित्रकला, लेखन, वाचन, नृत्य, वाद्य… जे आवडतं ते बिनधास्त शिकावं. कारण त्या आनंदाला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसते.
हो, करिअरची वेळ एकदा निघून गेली, तर ती परत येत नाही. त्यामुळे योग्य वयात योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. पण म्हणून आयुष्यातल्या बाकीच्या सगळ्या आवडी मरून जाव्यात, असं नाही.
स्वप्नं दोन प्रकारची असतात. एक, जी जगण्यासाठी असतात; आणि दुसरी, जी जगणं सुंदर करण्यासाठी असतात. पहिल्या स्वप्नांसाठी वेळेवर मेहनत घ्यावीच लागते. पण दुसऱ्या स्वप्नांसाठी वयाची अट नसते.
फक्त एक काळजी घ्या…
स्वप्नं बघा, पण “गणपत वाणी” होऊ नका.
#सुरपाखरु #30दिवसात30 #जुलै2026