सामर्थ्य वाणीचे
वाणीचे सामर्थ्य काय असते हे समर्थ वाणीतून ओळखले जाते.वाणी म्हणजे बोलणे , शब्द किंवा आवाज . भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात वाणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.मानवी जीवनात विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी वाणी हे प्रभावी माध्यम आहे
गोड बोलल्याने दूरचे लोकही जवळ येतात आणि प्रेम वाढते.परंतु कठोर शब्द जवळच्या लोकांना ही दूर करतात.म्हणून वाणीवर संयम असणं आवश्यक आहे.तसं पाहिलं तर ही एक कठोर तपस्या आहे.वाणी कधीही उथळ नसली पाहिजे जसं उचलली जीभ लावली टाळ्याला.मानवाला ' वाणी 'हे सरस्वती चे वरदान आहे.तिचा दुरुपयोग होता कामा नये.
चांगली वाणी मानवी नातेसंबंध सुधारते आणि मनाला शांती देते. वाणीचे सामर्थ्य आपण महाभारतात रामायणात अनुभवले आहे.कैकयीने वाणीवर संयम ठेवला असता कदाचित त्यापेक्षाही मंथरेने तिचे कान भरले नसते तर रामायण घडलेच नसते. त्याचप्रमाणे महाभारतात वेळोवेळी हे जाणवते मग ती द्रौपदी असली तरी तिने सूत पुत्र म्हणून कर्णाचा अपमान केला नसता तर..?दूर्योधनास आंधळ्या पित्याचे आंधळी मुलं म्हणून चेष्टा केली नसती तर…?शिशुपालाच्या मुखातून शंभर अपमानास्पद बोल बाहेर पडले नसते तर..?या जर तर त्या भोव-यात संपूर्ण महाभारत घडले आहे .
या उलट वाणीवर संयम ठेवून गीतोपदेश करणा-या भगवान श्रीकृष्णाला विसरू शकतो का?ज्ञानेश्वरांचे पसायदान ,रेड्याच्या तोंडी वेद वदवून घेणे हे सर्व वाणीचेच प्रकार आहे.
एखादा रोगी डॉक्टरकडे जातो तेव्हा त्याला शांत आणि योग्य शब्दात धीर दिल्याने त्याच्या मनातील भय नष्ट होते.काही लोक अत्यंत तुसडे
असतात, अशा लोकांकडे वारंवार जाण्याची इच्छा होत नाही.तेच कुणी हसतमुखाने प्रेमळ शब्दात आपलं स्वागत केलं तर मनाला चांगले वाटते.आपण देखील लोकांशी छान वागलं पाहिजे.एखाद्याची चूक दर्शवायची असली तर गोड शब्दात त्याला समजावून सांगितलं तर ते समोरच्या व्यक्तीला बोचत नाही.पण हेच जर त्याची चेष्टा केली किंवा कडवट बोललं तर ते समोरच्या व्यक्तीच्या जिव्हारी झोंबत आणि मग तिथूनच बदल्याची भावना निर्माण होत असते.
कोणालाही अपमानास्पद बोलण्याआधी दहा वेळा विचार करून बोलावं.समोरच्याच्या चूका दर्शवतांना स्वतःला त्याच्या जागी कल्पून पहावं.
राग आला तरी वाणीवर संयम ठेवणे गरजेचे आहे.आपण म्हणतो ' प्रेमाने सर्व जग जिंकता येते ' परंतु प्रेम दर्शविण्यासाठी उचित वाणीचा वापर करणं जरूरी आहे. आपल्याला वाटतं की आपण तोंडाने जी बोलतो तीच वाणी आहे पण असं नाही.वाणी चार प्रकारची असते आणि आपल्या भारतीय योगशास्त्रात तिचं फार महत्व आहे.चार प्रमुख स्तर आहेत जे परा ,पश्यंती मध्यमा आणि वैखरी आहे
वैखरी –मुखातून स्पष्ट उच्चारली जाणारी सामान्य वाणी.आपण जी भाषा बोलतो,ओरडतो किंवा संवाद साधतोती वाणी
मध्यमा–कंठस्थानी राहणारी, मनातील विचार रूप वाणी.ही वाणी जिभेवर येण्यापूर्वी मनात विचार स्वरूपात असते
पश्यंती –हृदयस्थानी उमटणारी जाणीव स्वरूपातील वाणी.ही एक जाणीव अथवा अनुभूती असते.नामस्मरणाच्या प्रक्रियेत हिचा दर्जा उत्तम आहे
परा–नाभीस्थानी स्थित सर्वात सूक्ष्म आणि व्यक्त न झालेली दिव्य वाणी.ही वाणी श्वासाचे पहिले स्पंदन मानले जाते.ही अभिव्यक्तीच्या पलीकडची अनादी आणि अनंत अवस्था आहे,जिचा अनुभव योगी लोकांना येतो.
वाणीचे सामर्थ्य सांगताना आपण हे म्हणू शकतो की मानवी जीवनातील सर्वात मोठे प्रभावी साधन म्हणजे वाणी जी नातेसंबंध जोडण्या पासून ते समाज घडवण्यापर्यंत कार्य करते.गोड बोलण्याने शत्रूलाही मित्र बनवता येते
तर चूकीच्या शब्दांमुळे निर्माण झालेला दुरावा आयुष्यभर टिकू शकतो.शब्दांमध्ये उर्जा ,प्रेरणा
आणि दु:ख निवारण्याची ताकद असते, ज्यामुळे कठीण काळातही जगण्याची उमेद मिळते.योग्य वेळी वापरलेले शब्द एखाद्याला नैराश्यातून बाहेर काढून यशाकडे पोचवतात.शब्द हे दुधारी
तलवारी प्रमाणे आहेत ,ते कोणाचे मन जिंकू शकतात किंवा कोणाच्या मनावर खोलवर जखमही करू शकतात..
वाणी ही मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे जिच्याद्वारे आपण आपले विचार,भावना आणि ज्ञान इतरांपर्यंत पोहचवतो.
कविता आणि साहित्यातून शब्द दु:खाला आशेचा किरण दाखवतात आणि माणसाला जगण्याचे बळ देतात.
थोडक्यात काय तर शब्द हे अत्यंत सामर्थ्यवान
शस्त्र आहे,ज्याचा वापर विवेकबुद्धीने केल्यास आयुष्यात यश आणि आनंद प्राप्त होतो.म्हणूनच बोलण्यापूर्वी शब्दांचा विचार करणे आवश्यक आहे.