वसाली हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले बुलढाणा जिल्ह्यातील कोरकू, भिल्ल आणि गोंड लोकांचे एक आदिवासी गाव, हे शेगाव पासून ५० किलोमीटर दूर आहे. तेव्हा तेथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी शेगावच्या गजानन महाराज संस्थानाचा फिरता दवाखाना आठवड्यात एक दिवस येत असे. पुढे काही कारणांनी तो बंद झाला, नंतर खामगावचे डॉ. भट्टड , रोटरी क्लब आणि विश्व हिंदू परिषदच्या वतीने एक चमू घेऊन वसालीला असेच आठवड्यातून एक दिवस येत असत. पण त्यात नियमितपणा नव्हता . आजूबाजूच्या आदिवासी लोकांसाठी वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी शेगाव ते वसाली बसने वाहतुकीची सोय असलेले , डांबरी रस्त्याने जोडलेले , हेच शेवटचे गाव होते. येथे एक स्थायी वैद्यकीय सेवा केंद्राची स्थापना करण्यासाठी खूप वेगवेगळ्या संस्था विचार करीत होत्या , पण ते शक्य होत नव्हते .
ह्या पाश्वभूमीवर १९८४ ला मी जामोदला आलो, हे वसाली पासून १० किलोमीटर दूर होते. वसालीला स्थायी केंद्र सुरू करण्यासाठी मग आम्ही जामोदला हालचाली सुरु केल्या . सुरुवातीला मी येथे आठवड्यातून दोन वेळा आणि नंतर आठवड्यातून तीन वेळा यावे , असे ठरले . येथे बबनराव नावाचे, खामगावच्या पाचलेगावकर मठाचे एक कार्यकर्ते , राहत होते आणि ते माझे येथील मदतनीस होते. आम्ही दोघांनी येथे एक सोयीची ,वस्ती नजीकची , जागा निवडली आणि तेथील लोकांच्या मदतीने एक झोपडीवजा कुटी बांधून घेतली . विज, पाणी, रस्ता, फर्निचर अश्या गोष्टी आमच्यासाठी कल्पनातीत होत्या, त्यामुळे तेथे उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून आम्ही हा दवाखाना थाटला होता. डॉक्टर म्हणून तर मी काम पाहणार होतो , पण येथून जवळचे औषधी दुकान १० किलोमीटर दूर होते , म्हणून येथे आम्हाला औषधांची सोय करायची होती. त्यासाठी आम्ही खामगाव, शेगाव, नांदुरा, भुसावळ, मलकापूर आणि अकोला येथील डॉक्टर कडील सॅम्पल गोळा करणाऱ्या अनेक चमू तयार केल्या आणि जमा झालेली ती औषधी शेगाव-वसाली बसने येथे पोहोचली की, मग आम्ही ती वेगवेगळी करून येथे वापरीत असू .
जामोदहून येथे सुरुवातीला , मी पायी यायचो, नंतर सायकल मिळाली, आणि नंतर मोटरसायकल. सकाळी निघायचे, येथे येऊन औषधीची व्यवस्था लावायची, चुलीवर पाणी उकळून सिरिंजचे निर्जंतुकरण करायचे , आलेल्या रुग्णांना तपासायचे, रोगनिदान करायचे, औषधी उपचार त्यांच्या भाषेत समजून सांगायचे,आणि अशी सर्व कामे झाली की , तेथील एका परिवारात जाऊन जेवण करायचे,आणि संध्याकाळी आश्रम शाळेत वापस यायचे, अशी दिनचर्या चालायची . १९८४ ते १९८८ ह्या कालखंडातील , ते मंतरलेले दिवस आठवले की , माझा माझ्यावरचा विश्वास आजही द्विगुणित होतो,आणि ती पुंजी मला आजपर्यंत पुरून उरते .
वसालीच्या ह्या माझ्या दवाखान्याने , मला शून्यातून आपले विश्व निर्माण करायची , कला शिकवली आणि तशी संधी दिली , ह्यामुळे मला पुढे जीवनात कधीही कोणतेही काम कठीण वाटले नाही . जीवनात नंतर अनेक स्वप्नवत वाटावे , असे प्रकल्प यशस्वीपणे उभे राहिले , पण त्याचे सर्व श्रेय , ह्या माझ्या वसालीच्या दवाखान्याला जाते .