शेंदूरजना घाट हे अमरावती जिल्ह्यातील, वरुड तालुक्यातील , माझे जन्मगाव , येथे १९६० ला माझा जन्म झाला, आणि माझे चवथी पर्यंतचे शिक्षण . तेव्हा आमच्या गावी , घरोघरी गाई असायच्या, गोठे असायचे, दूधदुपते असायचे आणि गाईचे संगोपन ही एक सामाजिक वास्तविकता होती. तिला राष्ट्रीय प्राणी वगैरे म्हणायची गरज नसायची, तरी पण , ती समाजजीवनातील एक अभिन्न अंग होती , घरोघरी प्रत्येकाला आपापल्या आई सोबत, ताई, माई आणि गाई सुद्धा दिसायच्या.
मी आणि माझ्या मित्राने जेव्हा नागपूरजवळ , सतनावरी येथे शेती घेतली, तेव्हापासूनच आम्हाला गाईची उणीव प्रकर्षाने जाणवायला लागली . खापरीला भारतीय उत्कर्ष मंडळाचे गोसेवा केंद्र आहे, तेथून आम्ही दोन कालवड आणि दोन गोह्रे , असे चार , एक ते दीड वर्षे वयाची पिल्ले घेतली . पुढे माझ्या मित्रांने , मला खूप आवडली, म्हणून एक सुंदर कालवड मला भेट म्हणून दिली . आणि पाहता पाहता आमचे शेत सजीव वाटायला लागले. पुढे, दोन तीन वर्षात आमच्या शेतात कालवडीच्या गाई झाल्यात, गोरह्याचे बैल झालेत आणि आमचे हे गोधन वाढत राहिले. आता आम्ही बांधलेला गोठा एव्हाना लहान वाटायला लागला होता, त्यात दाटी झाली होती, म्हणून आम्ही बाजूला प्रशस्त गोठा बांधला ,शेतासाठी आपोआप जीवामृत तयार करायची सोय केली, आणि अश्याप्रकारे आता आमच्या गो पालनाने एका प्रकल्पाचे रूप घेतले आहे .
गोपालन करायचे म्हणून आम्ही आमच्या शेतात चारा आणि कुटार होईल , अशीच पिके लावतो , त्यामुळे गोपालनाचा खर्च खूप कमी लागतो . आमच्या शेताच्या तीनही बाजुने जंगल असल्याने , दिवसा गाई तेथेच चरतात . गाय दुभती झाली की , मग मात्र , आम्ही ढेप विकत आणतो , लसीकरण मात्र आम्ही सरकारी यंत्रणेद्वारा करवून घेतो. आमचा शेतातील गडी , गोठा स्वच्छता आणि अन्य कामे करतो , बदल्यात आम्ही त्याला पूर्ण दूध देत असतो . शेतात तयार झालेले शेणखत शेतातच वापरले गेल्यामुळे , जमिनीचा पोत आणि शेतीतील उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे .गाईला कामधेनू म्हणतात , हे खरे आहे आणि आम्ही ते अनुभवत आहोत.
आमची ही शेती पारंपरिक पद्धतीने आम्ही करीत असतांना , त्याला गो पालन केंद्राची खूप छान साथ मिळाली आहे . शेतीच्या रूपाने, खरे तर , आपण भूमातेची सेवा करत असतो , भूमातेच्या संवर्धनासाठी आमच्या शेतीत येणाऱ्या प्रत्येकाला येतांना, “ एक वृक्ष -प्रवेश शुल्क “ म्हणून आणावा लागतो . आमचे हे गोपालन , गोसेवा आणि त्याद्वारे होत असलेली भूमी सेवा खूप आनंद दायी ठरली आहे , ह्यात शंका नाही.