“अक्षर आहे की, कोंबडीची पिल्लं नाचली होती वहीवर?” शाळेतल्या गुरुजींची कान पिळून शुध्द-लेखनाची वही तपासतांना दिलेला हा आहेर अजूनही लक्षात आहे. त्यावेळी आहेर या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता.
वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळाल्यावर माझ्या अभियांत्रिकी मित्रानं चार चोघांत किती कशी आरती करावी? “विन्या कदाचित तुझ्या अक्षरामुळेच तुला ही वैद्यकीय पदवी मिळाली असेल रे. तुझ्या अक्षरामुळे तू प्रसिद्ध चिकित्सक होणार यात शंका नाही”
हा विनोदाचा भाग झाला तरी, शाळेत आमच्याबरोबरच आमच्या अक्षराला वळण लावण्याचा आमच्या शिक्षकांनी जे प्रयत्न केलेत, ते आठवून आजही गहीवरायला होतं. सुवाच्य अक्षर लेखन स्पर्धा, शाळेचं हस्तलिखित यासाठी निवड झाली की मोठा मान मिळाला असं वाटायचं.
'टाक', त्याची ती छान 'निब', ती बदलायची सोय असायची. ती कशी वापरायची याच्या छोट्या सूचना अजूनही लक्षात आहेत. अलंकृत-सुलेखनासाठी वेगळया 'निबा' असायच्या. त्या जवळ असल्या की अधिक श्रीमंत असल्यासारखं वाटायचं.
'फाऊंटन पेन' वापरायला ब-याच उशीरा सुरुवात केली. त्याचीही 'निब' स्वच्छ करणं, विशिष्ट कोनातून घासून ती सुरळीत चालते की नाही ते तपासणं, फार छान वाटायचं. वार्षिक परीक्षेच्या आधी तर हे सोपस्कार आमचे काका करून द्यायचे, त्याचं अप्रूप वाटायचं. युद्धपूर्व तलवारी परजण्यासारखं वाटायचं ते.
'टाका'नं किंवा 'फाऊंटन पेन'नं अक्षर छान कोरून आणि ठळकपणे काढलं जायचं, एक सौन्दर्य जाणवायचं त्यात. नंतर 'बाॅल पेन' अवतरलं, त्याचं चलन वाढत गेलं, त्यात नवनवीन प्रकार आले. काही म्हणा माझं अक्षर हळूहळू घसरायला लागलं. त्यात 'या 'बाॅल पेन' हात असावा का?' अशी उगाच शंका डोकावून जाते. आपल्या चुकांचं खापर फोडायला काहीतरी शोधायला लागतंच की!
अक्षर म्हणजे, जे आपण काय म्हणतो ते इतरांना वाचता यावं म्हणून मानव-जातीनं लावलेला शोध. न बोलताही इतरांशी बोलण्याची ही कला, आणि ती वहीच्या किंवा पुस्तकाच्या रूपानं 'अक्षर' करण्याचीही सोय. पण हेच अक्षर, 'सुवाच्य' ऐवजी 'अवाच्य' किंवा 'दुर्वाच्य' होतं, त्यावेळी होणारे घोटाळे हास्यास्पदच नव्हे तर जीवावर बेतणारेही होतात. जाणून बुजून 'ध' चा 'मा' असं एक अक्षर बदलून, घडलेला इतिहास मराठी माणूस विसरू शकत नाही.
चिकित्सकाचं हस्ताक्षर विनोदाचा विषय न राहता, धोकादायक विचित्र घटनांना कारणीभूत असल्याचं जेव्हा लक्षात यायला लागलं, तेव्हा हस्ताक्षराबद्दल विशेष जागृती असण्याविषयीचे 'निर्देश' राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला काढायची वेळ आली आहे! असो.
आता तर चिकित्सक 'औषध-सूचना' टंकलिखित स्वरूपात द्यायला लागले आहेत, छानच आहे. पण हे 'एक पाऊल पुढं' म्हणावं की 'हस्ताक्षरा'चा पराभव म्हणावा?
१८ जुलै २०२६
सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६