“चहा नाही पीत? मग तू सायन्स स्टुडन्ट कसला?”
कॉलेजमध्ये एखाद्याने “मी चहा पीत नाही” असं म्हटलं की त्याला चहा पाजणं हे जणू आमचं नैतिक कर्तव्यच असायचं. अनेक मित्र तर केवळ चहाच्या निमित्ताने जोडले गेले. खरं सांगायचं तर प्रत्येकाच्या आयुष्यात चहाभोवती फिरणाऱ्या असंख्य आठवणी असतात. माझ्याही आहेत… आणि त्या आठवल्या की आजही ओठांवर नकळत हसू येतं.
चहा हे आता आपल्या देशाचं अनधिकृत राष्ट्रीय पेयच झालं आहे. आयुष्यात कधीच चहा न पिलेला माणूस भारतात शोधणं कठीण. कोणाच्याही घरी गेलं की “चहा घेणार ना?” हा प्रश्न विचारल्याशिवाय पाहुणचार पूर्णच होत नाही.
एम.एस्सी.ला असताना माझा रूम पार्टनर अमोल रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. मला मात्र दहा वाजताच झोप यायची. पण रात्री दोन-तीन वाजता त्याला चहाची तल्लफ आली की तो मला हलवून उठवायचा.
“अरे, चहा पितोस का?”
या प्रश्नाला माझ्या तोंडून “नाही” हा शब्द कधी बाहेरच पडला नाही. मग आमच्यापैकी कोणीतरी उठून चहा करायचा. चहा उकळेपर्यंत गप्पा रंगायच्या. चहा झाला की तो पुन्हा अभ्यासाला बसायचा आणि मी चहा पिऊन निवांत झोपायचो.
आज विचार केला तर चहा झोप उडवतो की आणखी गाढ करतो, हा संशोधनाचा विषय आहे!
एकदा आम्ही आमचा ज्युनिअर आनंदच्या रूमवर चहा प्यायला गेलो. चहा पावडर कमी पडली म्हणून त्याने त्यात थोडी कॉफी मिसळली. तो प्रयोग इतका भन्नाट जमला की त्या पेयाचं आम्ही लगेच नामकरण केलं—”चॉफी!”
त्यानंतर त्याच्या रूमवर गेलं की “चॉफी” पिणं हा अलिखित नियमच बनला.
कॉलेजजवळच्या कॅन्टीनमधला चहा म्हणजे वेगळीच गोष्ट. एका हातात चहाचा ग्लास आणि दुसऱ्या हातात फिजिक्स. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, क्वांटम, रिलेटिव्हिटी… कोणता विषय चर्चेला यायचा याचा काही नेम नसायचा. कधी कधी वाटतं, आमच्या चर्चा ऐकून कॅन्टीनवाल्यालासुद्धा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमध्ये वगैरे समजायला लागले असावे!
कोरियात गेल्यावर मात्र भारतीय चहा फारसा मिळायचा नाही. बाहेर कॉफीच जास्त प्यावी लागायची. ग्रीन टी, लेमन टी… असे कितीतरी प्रकार चाखून पाहिले; पण भारतीय चहाची सर त्यांना कधीच आली नाही.
पहिल्यांदा ग्रीन टी पिल्यानंतर तर अशी मळमळ झाली की समोर प्रोफेसर बसले होते म्हणून कसाबसा तो कप संपवला. त्यानंतर ग्रीन टीकडे पुन्हा कधी वळलोच नाही.
तसं पाहिलं तर कॉफी बनवणं अगदी सोपं. गरम पाणी, कॉफी, साखर आणि थोडं दूध. प्रमाण थोडंफार चुकलं तरी चालतं.
पण चहाचं तसं नसतं.
आधी पाणी की आधी दूध?
आलं किसून टाकायचं की ठेचून?
विलायची घालायची की नाही?
कोणत्या ब्रँडचा चहा?
दुधाचा प्रकार?
प्रत्येक गोष्ट चवीवर परिणाम करते. त्यामुळे चहा बनवणं ही एक कला आहे आणि ती अनुभवानेच आत्मसात होते.
कॉलेजमध्ये आमचा ग्रुप इतका चहाप्रेमी होता की मित्रांनी आमचं टोपणनावच ठेवलं होतं—”चहाडे!”
एकदा उन्हाळ्यात रात्री अकरा-बारा वाजता आम्ही बियाणी चौकात चहा प्यायला गेलो. वेश मात्र अगदी घरगुती—कोणी लुंगी-बनियनमध्ये, कोणी टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये. त्या काळात “चड्डी-बनियन गँग”ची चांगलीच चर्चा होती.
आम्ही निवांत चहा पित उभे असतानाच पोलिसांची गाडी आली. एका पोलिसाने आम्हाला हटकलं. नशीब, आमच्यातल्या एकाच्या खिशात कॉलेजचं आय-कार्ड होतं. नाहीतर त्या रात्री चहाऐवजी पोलीस कोठडीची हवा खावी लागली असती!
असाच एक प्रसंग यवतमाळला घडला. त्या दिवशी शहरात कर्फ्यू होता. आम्ही कॉलेजमध्ये अडकलो होतो. कसाबसा पोलिसांना चुकवत मेन रोडवर आलो. एका कॅन्टीनवाल्याने समोरचं शटर बंद करून मागच्या बाजूने चहा बनवायचा उद्योग सुरू ठेवला होता.
चहाची हुक्की आली आणि आम्ही तिथेच थांबलो.
पाचच मिनिटांत पोलिसांची गाडी आली. आम्ही सगळे घाबरलो.
“वाटलं, आता खरंच काहीतरी बिनसलं!”
तेवढ्यात एका हवालदाराने दूरूनच विचारलं,
“अरे… चहा आहे का रे?”
आमचा जीव भांड्यात पडला! आम्ही आनंदाने त्यांच्यासाठी चहा घेऊन गेलो. त्यांनी निवांत चहा घेतला आणि मग म्हणाले,
“चला, बसा गाडीत.”
क्षणभर वाटलं,
“आता पोलीस स्टेशन!”
पण त्यांनी आम्हाला थेट बसस्टँडवर सुरक्षित सोडून दिलं.
त्या दिवशी जाणवलं,
“चहाप्रेमी माणसं एकमेकांना ओळखतातच!”
त्यामुळेच बहुदा “घ्या ना, चहा-पाण्याचं काय असेल ते.” असंही बिनदिक्कत म्हणतात. बिचाऱ्या चहाला बदनाम करतात.
पण त्याच चहाला आणि चहावाल्यांना मोदीजी पंतप्रधान झाले, याचा सार्थ अभिमान झाला असेल.
तिकडे युरोपमध्ये ४० अंशांवर सगळे हवालदिल झाले असताना आपण भारतीय मात्र ४८ अंशांवरही,
“भाऊ, गरम चहा द्या!”
म्हणतोच.
असे आपण सगळे चहाडे.
आज मागे वळून पाहताना जाणवतं, चहामुळे किती मित्र मिळाले, किती चर्चा रंगल्या, किती आठवणी तयार झाल्या आणि कितीतरी क्षण आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासारखे मिळाले. चहाचं हे पुराण कधीच संपणार नाही.
चला तर मग…
“रक्तवर्णीय उष्ण कषाय पेयाचं पान करूया…”
म्हणजेच…
“एक कप चहा घेऊया!”
#30दिवसात30 #surpakharu #जुलै26