औदुंबर–बालकवी
ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेउन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून .
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे .
पायवाट पांढरी तयातुनी अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे .
झाकाळून जळ गोडकाळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर .
बालकवींच्या अनेक सुंदर निसर्ग रम्य कवितांमधील
ही एक उत्कृष्ट कविता आहे.या कवितेत गूढ अर्थ दडलेला आहे अनेक लोकांनी या कवितेचे रसग्रहण केले आहे .कुणाला ही कविता निसर्ग रम्य वाटते तर कुणाला
एक सारगर्भित रचना वाटते.'औदुंबर 'हे एक केवळ
झाडच नाही तर एक काळपुरूषच आहे .एक संन्याशाचे
प्रतीक आहे.ही कविता नितांतसुंदर ,गुढरम्य सौंदर्य असलेली कविता आहे.
सूचकता —-कवितेत सूचकता जाणवते.पहिल्या चार ओळीत निसर्ग रम्य दृश्या़तून मानवाचे आनंदी जीवन दर्शवण्याचा उद्देश आहे .तर पुढच्या काही ओळीत
जीवन हे केवळ सुंदर असते असे नाही तर कधी कधी
अनेक संकटाना त्याला तोंड द्यावे लागते तेव्हा तो निराश होतो .ते कवीने आडव्या तिडव्या वाटांमधून दर्शवले आहे.आणि असा तो कुठे चालला आहे तर मृत्यू कडे
म्हणजेच काळ्या डोहाकडे.डोह या शब्दाचा अर्थ गूढ वाटतो.डोह म्हणजे खोल गंभीर अनाकलनीय .त्यात
काय सामावले आहे हे कोणालाच माहित नसते तसेच
मृत्यू चे असते
चित्रमयता —-तर खूप च जाणवते .निसर्गाचे सुंदर वर्णन असलेली ही कविता म्हणजे एखाद्या चित्रकाराने कैनवास वर काढलेले नितांतसुंदर रम्य चित्र.
शब्दलालित्य —भरपूर आहेजे पहिल्या चार ओळीत आपल्याला जाणवते.मोजक्या रंगात निसर्ग चित्रण छान साधले आहे . . उदा.निळासावळा झरा,हिरवी शेतमाळे,,पांढरी पायवाट आणि काळा डोह
गतिशीलता—–कवितेला गती आहे. कविता वाचत असतांना सजीव चित्र डोळ्यासमोरून झरझर निघत असते
अनेकार्थता—-अनेक अर्थांनी सिद्ध असलेली ही कविता आहे त्यामुळेच अनेक मोठमोठ्या साहित्यिकांनी तिचा आपापल्या परीने वेगवेगळे अर्थ लावले आहेत कुणाला ती निसर्गरम्य तर कुणाला गूढ तर कुणाला अध्यात्मिक रस असलेली जाणवते
अल्पाक्षर रमणीयता—-केवळ आठ ओळींची कविता आहे परंतू जीवंत चित्रण निर्माण करण्यात यशस्वी.
रसग्रहणाच्या मुद्यांवर विचार करू या.
कवितेचा विषय /मध्यवर्ती कल्पना —
कवितेचा विषय आहे औदुंबराचे झाड त्याच्या सभोवतालचे चित्र .म्हटले तर बालकवींच्या निसर्गरम्य कवितांमधील एक सुंदर कविता.दूसरा विचार केला तर औदुंबराचे झाड हे एक अध्यात्मिक अर्थाने समृद्ध
कवितेतील प्रतिमा /प्रतीके/अर्थालंकार वगैरे
निळा सावळा झरा हे प्रवाहमान जीवनाचे प्रतिक.तसेच त्यात आकाशाचे पडलेले निळे सावळे प्रतिबिंब हे जीवनदर्शन दर्शवते. आपल्या जीवनातील चांगल्या वाईट दिवसांचे जाणीव करुन देणारे तरीही ज्याप्रमाणे जीवन पुढे जातच रहाते तसा तो झरा .
शेतमाळ्यांची हिरवी गर्दी म्हटलं तर नयनरम्य दृश्य समृद्ध जीवनाचे प्रतीक पण त्यातून जाणारी वाट पांढरी रंगहीन निरस आडवीतिडवी म्हणजे अनेक संकटे किंवा जीवनातील खाचखळगे तुडवणारी अधूनमधून सुखाचे दिवस दाखवणारी. अंतिम टप्पा काळा डोह हा मृत्यूचे
प्रतीक अनाकलनीय गूढ.आणि त्या डोहात पाय पसरवून बसलेला औदुंबर म्हणजे ईश्वर. बालकवींनी ' औदुंबर 'च का घ्यावा कवितेत तर मला असे वाटते औदुंबराचे झाड हे दत्त गुरुचे निवासस्थान. औदुंबरामध्ये तिन्ही देवांचा वास असतो ' ब्रम्हां, विष्णू आणि महेश 'सृष्टी रचयिता ,पालनकर्ता आणि संहारक ,'हे ईश्वरच आहे आणि तो ईश्वर कसा तर औदुंबराच्या झाडासारखा स्थितप्रज्ञ. मनुष्य शेवटी त्याच्याकडेच जातो.त्या काळ्या डोहात तोच बसला आहे. त्याच्याकडेच सर्व आकृष्ट होत असतात. जसे चालून चालून दमल्यावर मनुष्य पाणी प्यायला तिथेच येतो तेव्हा ते पाणी त्याला गोड लागते.औदुंबराच्या सावलीने ते पाणी जरी काळे भासत असले तरी ते थकलेल्या मनुष्याला अमृतासमान गोडच लागते. त्याचप्रमाणे जीवनाच्या शेवटी औदुंबर नामक काळपुरूष म्हणजे ईश्वरच त्याच्याकडे जातांना जीवनातील सुखदुःखाचे निसर्गाशी तादात्म्य साधत कवीने छान वर्णन केले आहे.
तसेच चार घरांचे गाव म्हणजे हे लहानसे जीवन .असेही कवीला सुचवायचे आहे.
कवितेला नाद लय चांगली असल्याने ही कविता गेय आहे.मुक्तछंदातील ही कविता आपल्या सुंदर निसर्ग रम्य मनोहारी वर्तनामुळे आनंद देणारी आहे त्यामुळे तसेच जीवनाचे सार सांगणारी आहे .म्हणून मला खूपच आवडली.
एक अन्वयार्थ असाही आहे की मनुष्याने आपले जीवन औदुंबरासारखे स्थितप्रज्ञ राहून जगले पाहिजे.जीवनातील संकटाना तोंड दिले पाहिजे. तसेच सुखदुःख तर येतच असतात . त्यांचा आपल्या जीवनावर परिणाम न होऊ देता अंतिम लक्ष म्हणजे मृत्यू रूपी काळा डोह व त्यात आपली मूळे रोवून बसलेला औदुंबर म्हणजे ईश्वराकडेच अखेर जायचे आहे तेही न थांबता झ-या प्रमाणे अविरत.आपले हे जीवन चार दिवसाचे आहे हे मानून व्यतीत करणे हादेखील संदेश कवीला द्यायचा आहे.
ऐलतटावर आणि पैलतटावर म्हणजे जीवन आणि मृत्यू. हिरवाळीवर म्हणजे यापार आणि त्यापार पण जीवन आहे .पांढरी वाट म्हणजे जीवनातील खाचखळगे ज्याप्रमाणे हातावरच्या रेषा. चार घरांचे गाव म्हणजे जीवनातील चार आश्रम आणि ते पार पडल्यावर शेवटी ईश्वराकडे जायचे.परंतु हे जगत असताना मात्र त्या औदुंबराच्या झाडाप्रमाणे स्थिर वृत्तीने सर्व पहायचे. झ-याप्रमाणे आयुष्य हे गतीशील असते.त्यात येणा-या अडथळ्यांना पार करत शेवटी त्या काळ्या डोहाकडे पोचायचे.सरते शेवटी मनुष्य तिथेच पोचणार आणि तिथे ” तो.”म्हणजे औदुंबर रुपात ईश्वर!बेटाबेटातून म्हणजे प्रत्येक माणूस हा एक बेट आहे.चार आश्रम–
ब्रम्हचर्याश्रम ,गृहस्थाश्रम,वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे पार पडल्यानंतर तिकडे पण हिरवाळी म्हणजे जीवन आहे.
.