आता भगतसिंग अंगात भिनलेला असतो…. समाजवाद हे एकमेव सर्व प्रश्नांवर उत्तर आहे हे पटलेलं असतं …. पण…..
एक कळ कुठेतरी आत उमटलेली असते…. अवघा २३ वर्षाच वय…. पण केवढी समज…. केवढी सहनशीलता……
काय वाटतं हो? इंग्रज अधिकाऱ्याला मारण्याचा खटला ….. तत्कालीन संसदेत बॉम्बस्फोट ….. पोलिसांनी काय कमी रिमांड घेतला असेल? थर्ड डिग्री ला लाज वाटेल असं बदडलं असेल….. पण हा आपल्या महापुरुष आपल्या भावाला ३ मार्च १९३१ ला लिहिलेल्या पत्रात काय लिहितो?
उन्हें ये फ़िक्र है हर दम, नई तर्ज़-ए-जफ़ा क्या है ।
हमें ये शौक़ है देखें सितम की इंतिहा क्या है ।।
ते क्रूरतेचे कोणतेतरी नवनवीन स्वरूप शोधण्यात सतत मग्न असतात; (तर्ज़-ए-जफ़ा म्हणजे अत्याचार करण्याची प्रक्रिया.) आणि त्या जुलुमाची अंतिम मर्यादा नेमकी काय असेल, हे पाहण्यास मी उत्सुक आहे.
गुनह-गारों में शामिल हैं गुनाहों से नहीं वाक़िफ़ ।
सज़ा को जानते हैं हम ख़ुदा जाने ख़ता क्या है ।।
माझी गणना पापी लोकांमध्ये करतात, तरीही मला प्रत्यक्ष माझ्या पापांची जाणीवच नाही; मला केवळ शिक्षेबद्दलच माहिती आहे—तो अपराध नेमका काय आहे, हे केवळ देवालाच माहीत आहे. (म्हणजे सॉंडर्स वाढ आणि संसदेतील बॉम्बस्फोट हे अन्यायी सरकारच्या विरुद्ध, देशासाठी केलेल काम आहे. अपराध नाहीच मुळी.)
मला भावली ती ही गझल…. शोध सुरु केला… बृज नारायण ह्या हिंदू गझलकाराची ही रचना…. इतकी ताकद आहे ह्यात की शहीद-ए-आजम ला पण ह्यांनी भुरळ घातली. चला बघू पूर्ण गझल….
उन्हें ये फ़िक्र है हर दम, नई तर्ज़-ए-जफ़ा क्या है ।
हमें ये शौक़ है देखें, सितम की इंतिहा क्या है ।।
ते क्रूरतेचे कोणतेतरी नवनवीन स्वरूप शोधण्यात सतत मग्न असतात; (तर्ज़-ए-जफ़ा म्हणजे अत्याचार करण्याची प्रक्रिया.) आणि त्या जुलुमाची अंतिम मर्यादा नेमकी काय असेल, हे पाहण्यास मी उत्सुक आहे.
गुनह-गारों में शामिल हैं, गुनाहों से नहीं वाक़िफ़ ।
सज़ा को जानते हैं हम, ख़ुदा जाने ख़ता क्या है ।।
माझी गणना पापी लोकांमध्ये करतात, तरीही मला प्रत्यक्ष माझ्या पापांची जाणीवच नाही; मला केवळ शिक्षेबद्दलच माहिती आहे—तो अपराध नेमका काय आहे, हे केवळ देवालाच माहीत आहे.
ये रंग-ए-बेकसी रंग-ए-जुनूँ बन जाएगा ग़ाफ़िल |
समझ ले यास-ओ-हिरमाँ के मरज़ की इंतिहा क्या है ||
रंग-ए-बेकसी म्हणजे असहाय्यतेचा रंग, रंग-ए-जुनूँ म्हणजे उन्मादाचा रंग. यास-ओ-हिरमाँ म्हणजे निराशा आणि हताशपणा. शेराचा अर्थ असा की, अरे बेसावध माणसा, ही असहाय्यता कधी उन्मादात बदलेल हे तुला पण कळणार नाही. ह्या निराशे च्या आणि हाताशपणा च्या व्यसनाची पराकाष्ठा काय आहे ते समजून घे…
नया बिस्मिल हूँ मैं, वाक़िफ़ नहीं रस्म-ए-शहादत से ।
बता दे तू ही ऐ ज़ालिम, तड़पने की अदा क्या है ।।
बिस्मिल म्हणजे जखमी, रस्म-ए-शहादत म्हणजे बलिदानाची पद्धती, पूर्ण अर्थ असा की अरे मी तर नुकताच जखमी झालेलो आहे, मला हौतात्म्याची पद्धत, माहिती नाही, अपरिचित आहे. मग माझ्यावर जुलूम करणाऱ्या हे निर्दयी क्रूर माणसा तूच मला सांग ह्या तळमळणाऱ्या यातनांच खरा स्वरूप काय आहे.
चमकता है शहीदों का लहू, पर्दे में क़ुदरत के ।
शफ़क़ का हुस्न क्या है, शोख़ी-ए-रंग-ए-हिना क्या है ।।
शफ़क़ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी, पहाटे क्षितिजावर दिसणारा लालसरपणा, हिना म्हणजे मेहेंदी, रंग-ए-हिना म्हणजे मेहेंदी चा रंग, आणि शोख़ी-ए-रंग-ए-हिना म्हणजे लालचुटुक असलेला मेहेंदीचा रंग. पूर्ण शेराचा अर्थ असा, की हुतात्मांचे रक्त हे निसर्गाच्या पडद्यावर सतत उजळून निघत असते. बघा नं … सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी, पहाटे क्षितिजावर दिसणारा लालसरपणा म्हणजे काय आहे? किंवा लालचुटुक असलेला मेहेंदीचा रंग काय आहे? हे हुतात्म्यांचं रक्तचं आहे…. (निवांत बघता येणारी संध्याकाळ किंवा समारंभाआधी लागणारी मेहेंदी ह्याकरता असलेल्या स्वातंत्र्या करता किंवा शांतीकरता बलिदान करणाऱ्यांचाच रक्त सांडलंय नाही का? त्यांच्यामुळेच नाही का ही निवांतता किंवा उत्सव सदृश वातावरण आहे)
उमीदें मिल गईं मिट्टी में, दौर-ए-ज़ब्त-ए-आख़िर है ।
सदा-ए-ग़ैब बतला दे हमें हुक्म-ए-ख़ुदा क्या है ।।
आखिर म्हणजे सीमा, पराकाष्ठा…. जब्त म्हणजे सहनशीलता (बर्दाश्त)… दौर म्हणजे वेळ….. दौर-ए-ज़ब्त-ए-आख़िर म्हणजे सहनशीलतेच्या पराकाष्ठेची वेळ…. गैब म्हणजे अदृश्य लोक (आपल्या भाषेत स्वर्ग.) सदा-ए-गैब म्हणजे स्वर्गातून येणारी हाक, आवाज….
आता सर्व स्वार्थी आशा आकांक्षा धुळीत मिळाल्या आहेत, सहनशीलतेच्या पराकाष्ठेची वेळ आलेली आहे….. आता सहन करणं अशक्य होतंय….. अश्या वेळी, हे स्वर्गातून येणाऱ्या आवाजा, मला सांग आता देवाची माझ्या करता पुढची आज्ञा काय आहे. मी तयार आहे.
काय लिहिणार पुढे? कुणाला ह्यापुढे महान म्हणावं हा इतिहासाला पडलेला पेच अजूनही तसाच आहे….राहणार आहे….