निवृत्तीनंतर घरीच थांबण्याची वेळ आलेल्या बरेच लोकांना “ साठी नंतर नाठी “ ह्या परिस्थिती ला सामोरे जावे लागते . मला माझ्या दवाखान्यात अशी नाठी झालेले बरेच रुग्ण भेटतात,आणि त्यांना मी जवळून पाहत असतो. साठी नंतर आपल्याला अजून किमान २५ – ३० वर्षे जगायचे आहे, ही वास्तविकता आपण जाणली पाहिजे, आणि आयुष्याचे तसे नियोजन केले पाहिजे , असे मी त्यांना सांगत असतो. एव्हाना व्यवसाय , नोकरी वा अन्य कामानिमित्त सदोदित बाहेर राहणारे , जेव्हा घरात बंदिस्त होतात, तेव्हा कुटुंबातील सदस्यांना त्यांची दिवसभर घरी असण्याची सवय नसते . अश्या परिस्थितीत साधारतः कुटुंबातील इतर सदस्यांना आपले वागणे अडचणीचे होईल , असे न वागण्याचे भान आपल्यालाच ठेवावे लागते . म्हणून साठीनंतर कुटुंबात सन्मानाने जगण्याची कला आपल्याला नव्याने आत्मसात करावी लागते . हा सन्मान आपल्याला मागुन मिळत नसतो, पण तो आपल्याला आपल्या वागण्यातून मिळवता येतो, त्यासाठी कसे वागायचे ते पाहूया
निवृत्ती नंतर शक्य असेल तर , काही हलके फुलके काम अवश्य करावे,त्यात आपल्याला ठराविक वेळ देता येतो आणि थोडेफार पैसे मिळत राहतात. पण त्यासाठी आपण आपल्या शारीरिक क्षमतेचा सुद्धा अवश्य विचार करावा . नियमित व्यायाम करून आपण आपली शारीरिक तसेच मानसिक क्षमता वाढवु शकतो, आणि असा व्यायाम रोज सातत्याने केलाच पाहिजे.
दुसरे म्हणजे, साठीनंतर आपण आपली एक दिनचर्या निश्चित करायची असते. एका ठराविक वेळी उठावे , त्यानंतर व्यायाम. रोजची काही ठराविक कामे, जेवण,आराम ,काही छंद सर्व ठरलेल्या वेळी करून , कुटुंबाला ह्या नवीन दिनचर्येची सवय करवून द्यायची असते.
साठीनंतर आपल्या कुटुंबात आपली मुल आता मोठी झाली असतात,त्यांना आपण आता स्वतंत्रपणे वागू दिले पाहिजे. नवीन पिढी नवीन पद्धतीने विचार करणार, हे आपण स्वतःला सांगितले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपण आपले विचार व्यक्त करायचे टाळले पाहिजे.आपले कुटुंब हाच आपला आधार असतो,त्यामुळे शक्यतो कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी पूर्णस्वी जबाबदारी आपण घेतली पाहिजे. कुटुंब म्हटले तर छोटे छोटे वादविवाद होतातच, त्यात आपण आपला ईगो आणून टोकाची भूमिका घेता कामा नये. वादविवाद झाले तरी , संबध तुटता कामा नये, ह्याची खबरदारी आपणच घेतली पाहिजे. आपले कुटुंब,आपले नातलग आणि आपले मित्र हीच आपली साथीनंतरची पुंजी असते, त्या पुंजीला आता जपून वापरले पाहिजे, त्याला संपवून आपण एकाकी पडलो,तर ही नाठी अजून त्रासदायक ठरते , ह्याची जाणीव असू द्यावी.
निवृत्तीच्या आधी पाहिलेली आपली काही स्वप्ने साठीनंतर आपण पूर्ण करू शकतो,त्याची एक यादी तयार करावी,आणि ती कशी पूर्ण करायची , ह्याचे नियोजन स्वतः करावे . ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील साधनांचा योग्य प्रकारे वापर करावा लागतो, त्याचे ओझे आपल्या मुलांवर पडणार नाही , ह्याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे .
साठी नंतरची नाठी टाळण्यासाठी आपण वानप्रस्थ जीवन खऱ्या अर्थे कसे जगायचे,हे नव्याने शिकायला पाहिजे. आपले घर, आपली संपत्ती, आपली अपत्ये ह्याचा त्याग न करता सुद्धा फक्त त्याबद्दलची आसक्ती टाळू शकतो , हे आध्यत्म आपण जाणले पाहिजे . आपल्या बुद्धीला चालना देणारे नवनवीन उपक्रम करून आपण आपले सुंदर जीवन एकटे जगत रहावे, हाच साठीनंतरची नाठी टाळण्याचा सुंदर उपाय आहे , असे मला वाटते .