मला उधारी म्हटले की मला, अमित टंडन ह्या स्टैंड अप कॉमेडियन ची आठवण येते. एका प्रयोगात त्याने उधारी दिलेल्या व्यक्तीचे कथानक खुप वास्तवतेने रंगविले आहे . त्यात तो व्यक्ती , आपल्या पत्नीला न सांगता , मित्राला उधारी देतो आणि ती वापस न मिळाल्यामुळे , त्याला स्वतःच्या पत्नीचे बोलणे आणि मित्राकडून न मिळालेली उधारी, ह्या कैचीत कसे जगावे लागते , हे मार्मिक पद्धतीने सांगितले आहे. आजपर्यंतच्या आयुष्यात माझ्याही कडे असेच काहीसे अनुभव गाठीशी आहे . कोणाला उधारी देऊन , आपण आपले पैसे आणि ज्याला पैसे देतो ते नाते , दोन्ही घालवून बसण्याचा धोका स्वीकारत असतो , असे समजावे.
उधारी कधी लागतच नाही, असे म्हणायचे , म्हणजे थोडे अतिरेकाचे वाटते . लहानपणी कधी आपल्या घरी, वेळीअवेळी पाहुणा आला, की शेजाऱ्याकडे साखर मागायला मागच्या दाराने हक्काने जाण्याचा संस्कार , आमच्या पिढीने घेतलेला आहे . आताच्या पिढीला ब्लीनकिट च्या आगमनाने ह्या जीवनावश्यक संस्काराला मुकावे लागत आहे , तो भाग वेगळा. कोविड काळात आपल्याच पत्नीकडुन आपलेच पैसे उधार घेतलेले कितीतरी पती , मुळ मुद्दल देऊन सुद्धा, आजपर्यंत व्याज देतच आहेत , असे अनुभव आहेत. अश्या उधारीचा एकदा धसका घेतला की, मी मी म्हणणारे पुढे शहाणे होतात, अशी असंख्य उदाहरणे आहेत.
आपल्या समाजात उधारीला जितकी समाजमान्यता आहे , तितकी जगात कुठेही आढळत नसावी, असे मला वाटते. उधारी हा एव्हाना आपल्या समाज जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. आम्ही शाळेत असताना पुढील वर्गातील असलेल्या मुलांकडून पुस्तके उधार घेत असु आणि वर्षभर वापरून तीच पुस्तके नंतरच्या वर्गातील मुलांसाठी ती परत देत असु . ह्यात उधार घेणे म्हणजे काही उणे वाटणे, असे नसायचे, तो एक प्रेमाचा व्यवहार होता,आणि ते प्रेम आम्ही आजपर्यंत टिकवून ठेवले आहे. तरीही ऋण घेऊन सण साजरे करू नये वा अंथरुण पाहुनच हातपाय पसरावे , अश्या अनेक म्हणी प्रचलनात होत्या,आणि आमचे वागणेही त्याला समजूनच असायचे.
आपल्या समाजात उधारी आणि कर्ज ह्याला समान वागणूक नसते, हे महत्वाचे आहे. कर्ज हे उधारीचेच व्यावसायिक रूप म्हणू शकतो,कारण कर्जानंतर व्याज मिळेल, अशी अपेक्षा (नुसती अपेक्षा) करायला काही हरकत नसते, पण उधारीनंतर व्याज मिळेल,असे समजणे , हा शुद्ध मूर्खपणा ठरतो. त्यापेक्षा उधारी आणि दान ह्याला समानार्थी शब्द म्हणून वापरणे, जास्त शहाणपणाचे आहे,असे मला वाटते. उधारीचे व्यवहार हे ओळखीच्या लोकांमध्येच होतात पण कर्जाचे व्यवहार करायला तसे काही बंधन नसते, हाही एक फरक लक्षात घेता येतो.
आपल्या जेवणात जितके स्थान चटणी , कोशिंबीर ला मिळते, तितकेच स्थान उधारीला द्यायला हरकत नसावी . उधारी देण्यात एक मांगल्य असते, ते टिकवण्याचे भान घेणाऱ्याने टिकवणे गरजेचे असते . हे मांगल्य टिकणार नसेल तर उधारी मागु नये वा देऊ नये,असे मला वाटते.