मी वायरलेसवरून संदेश पाठवला आहे. एव्हांना बेस कॅम्पवरच्यांना कल्पना आली असेल.
ते जवळ येत असताना दिसताहेत. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या पार्श्वभूमीवर मुंग्यांसारख्या हालचाल करणाऱ्या आकृत्या. त्यांना वाटतंय इथे लक्ष ठेवणारं कोणी नसावं… आधी नव्हतंही. सियाचीनच्या या दुर्गम कड्यावर कोण कशाला राखण ठेवेल? पण आता ते दिवस गेले. हा नवा भारत आहे.
तळावरून मला कुमक येईल का? नक्कीच येईल. पण वेळेत? कदाचित नाही. ते वेळेत पोहोचू शकणार नाहीत.
बाह्यकरणी मी अगदी स्तब्ध पडून शत्रूला निरखतोय, पण अंतर्मनात मात्र विचारांचे आवर्त उठले आहे.
आईचा चेहरा डोळ्यांसमोर येतोय –सतत धुणीभांडी करून भेगा पडलेले तिचे हात, लहानपणी ती माझ्या केसांचा काय छान भांग काढायची.. मुलीच काय, मुलंही फिदा होती त्यावर.
बाबांचा करडा आवाज… नेहमी म्हणायचे, 'बाळा, ताठ बसायचं, शाळेत काय शिकलास आज?'
पण दिवसभर कितीही धाकात ठेवलं तरी रात्री मी झोपल्यावर मात्र हळूच येऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवायचे , कपाळाचा हलकासा मुका घ्यायचे.. आईला म्हणायचे “आज फार रागावलो का गं मी याला?”
खरं तर मी जागाच असायचो, पण त्या दोघांचंही बोलणं ऐकत पडून राहायचो!
शत्रूसैनिक अचानक थबकले का? त्यांना माझी पोझीशन दिसली असेल का?
ती …तिचे हसणे, तिची साडी नीट घडी करण्याची पद्धत, आणि गदगदून हसताना डोळ्यांच्या कोपऱ्यात पडणारी ती छोटीशी सुरकुती.. अर्जुन, माझा मोठा मुलगा. त्याच्या आजोबांसारखाच हट्टी, पण शूर बनण्याचा प्रयत्न करणारा; छोटी मीरा… ती अजूनही कधीकधी अंगठा चोखत असेल का? नको करू असं सांगेन मी तिल-
-पण मी आज इथे वाचणार नाही. त्यांना समजलंय मी आहे. त्यांचे एक पूर्ण युनिट आहे. आणि मी एकटा.
छे, एकटा कुठे? माझ्यासोबत माझी लाडकी राणी आहे ना – माझी मशीनगन. माझे हात तिच्या ट्रिगरवर स्थिर आहेत.
माझी मुले माझ्याविनाच मोठी होतील. सण-उत्सवांच्या वेळी ती विचारतील, 'बाबा कधी येणारे?' क्षणभर मला समोरचे काहीही दिसत नाही… डोळ्यांवर अश्रूंचा पडदा उभा राहिलाय.
पण ज्यादिवशी मी हा युनिफॉर्म चढवला त्याच दिवशी, त्याच क्षणी मी हे प्राक्तन स्वीकारलेय . त्याबद्दल माझ्या मनात शल्य नाही. बा हिमालया, आज माझे शौर्य पाहाशील आणि सांगशील माझ्या आराध्य देवतेला, माझ्या शिवरायाला की त्यांचा एक मावळा शत्रूला मारिता मारिता मेला.
काही क्षणांत ते माझ्या गनच्या टप्प्यात येतील.
अचानक मला एकदम हलके वाटू का लागलेय? माझ्या मनावर कोणतेही ओझे नाही… आजवर मी जगलो ते माझ्यासाठी , माझ्या आईसाठी, पपांसाठी.. माझ्या कुटुंबासाठी.
आतापर्यंत या हिमालयीन स्वेटर्सचे, वजनदार बूट्सचे फार वजन वाहिलेय…
आता ओझे वाहायचे ते फक्त एकच… माझ्या शरीराभोवती लपेटलेल्या तिरंग्याचे.
आले! ते अगदी टप्प्यात आले आहेत. मरा साल्यानो.
व्वा! माझ्या मशीनगनचा आवाज काय मस्त घुमतोय! सटासट गोळ्या सुटत आहेत, माणसे पटापट पडताना, सैरावैरा पळताना दिसताहेत.
बर्फावर कोसळणाऱ्या वेड्यावाकड्या आकृत्या. एक विचित्र, भयानक आनंद—एक उन्माद!
शाब्बास पट्ठे! मी एकटाच पुरून उरलो की या पळपुट्यांना.
हे कुशीत अचानक उष्ण गरम काय वाटत आहे? हम्म…रक्त.
गोळी घुसलीय पोटात. पण तिकडे लक्ष देऊन चालणार नाही… ते पुन्हा आले तर मी तयार-
फार थंडी वाजत आहे.. आई पांघरूण घालशील का…
इथले आकाश किती नितळ निरभ्र आहे, एकदा माझ्या हिला घेऊन इथं यायला ह-
फार झोप येतेय.
हा आवाज कसला? भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर इथे कुठे आले? माझ्या घरात?
घशाला कोरड पड-
एवढा आवाज कसला? कोण बोलतंय एवढं? ए पोरांनो, जा बाहेर जाऊन खेळा पाहू…
मला झोपू द्या.