२०२४ मधील हिवाळ्यातील रविवारचा दिवस होता. प्रत्येक रविवारप्रमाणे डीप क्लिनिंग करावे म्हणून कामाला लागलो. बगीच्यातील काम आटोपत तेथील कॅरी ओलांडण्याच्या प्रयत्नात एकदम पाय कुठेतरी अडकला आणि पडलो. काही क्षण अगदी सुन्न झाल्यासारखे वाटले. डाव्या पाय मुरगळून त्यातून काडकन आवाज आला. आपल्याला लिगामेंट इन्ज्युरी झालेली आहे याचा अंदाज आला. असह्य वेदना सुरू होऊन सूज सुद्धा आली. एका पायावर चालत थोडे एका जागेवर बसून नंतर आमच्या आजींनी सांगितलेले एक होमिओपॅथी औषध घेतले. त्याने नंतर जरी वेदना कमी झाल्या असल्या तरी, हाड फ्रॅक्चर असू शकते, x रे काढून घे वगैरे सल्ले घरच्या लोकांनी दिले. रविवार असल्याने बरेच दवाखाने बंद होते म्हणून सोमवारी यावर उपचार करायचा असे ठरले.
सोमवारी सकाळीच योग व निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. संदीपजी पथे यांच्यासोबत फोनवर बोलून झालेला प्रकार सांगून त्यांची अपॉइंटमेंट घेतली व त्यांच्याकडे जायला निघालो.
अरे हाडांच्या डॉक्टरकडे जा वगैरे असा सल्ला मला काहींनी दिला. पण आपलं शाश्वत ते शाश्वत विश्वासाचं आणि टिकणारं यावर विश्वास असल्याने आणि माननीय प्रधानमंत्री यांनी सुद्धा त्यांच्या भाषणातून बरेचदा स्वदेशी यावर जोर दिल्याने तशी कृती करावी यावर मी जोर दिला.
प्रधानमंत्री पद हे एक संविधानिक पद असल्याने त्यांना सुद्धा कोणत्याही बाबतीत बोलतांना जरा सावधपणे आणि तोलून मापून शब्द बोलणे भाग असते. स्वदेशीबाबतीत त्यांना काय म्हणायचे आहे, त्यातील नेमका काय गाभा आहे हे लक्षात आलेले होते.
डॉ. संदीपजी पथे यांच्याकडे पोहचून त्यांना झाला तो प्रकार सांगून उपचार सुरू झाला. वसुंधरा लेपन, लेझर थेरपी हे तीन वेळच्या उपचारांमधे करण्यात आले. आता पुढील तीन महिने म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत सूर्यनमस्कार करायचा नाही असे त्यांनी सांगितले.
आश्चर्य म्हणजे निसर्गोपचाराचा चमत्कारिक असा परिणाम बघायला मिळाला. आणि पुन्हा एकदा आपल्या शाश्वत आणि प्राचीन चिकित्सा पद्धतीचा अनुभव आला.
आता जरी तुला बरे वाटत असले तरी पुन्हा एकदा पुढील हिवाळ्यात थंडीमुळे दुखणे वर येऊ शकते असे काही ओळखीच्या लोकांनी म्हटले. पण असे काही झाले नाही.
पुढे जेव्हा जेव्हा डॉक्टरांसोबत बोलणे झाले. तेव्हा योग आणि निसर्गोपचार बाबतीत बरीच चर्चा झाली. निसर्गोपचार मुळे कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब, किडनी स्टोन आणि इतर गोष्टीपासून सुद्धा कशी मुक्तता होऊ शकते हे त्यांनी स्पष्ट केले.
नुकतेच माझ्या काही परिचितांनी टाइप टू मधुमेह याबाबतीत योग व निसर्गोपचार अवलंबून डॉ. पथे यांच्याकडून उपचार घेऊन मधुमेहापासून मुक्तता मिळविली आहे.
स्वस्थ भारतासाठी आपण आपल्या मुळांकडे वळणे किती आवश्यक आहे हे मला गेल्या काही वर्षात आलेल्या अनुभवावरून लक्षात आले. स्वस्थ भारत हे एकदम एका रात्रीत होणारी गोष्ट नसली तरी हे शक्य आहे हे सुद्धा तेवढेच खरे.