#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
आठवड्याच्या शेवटी घरी जात असताना नेहमीच काही न काही छोटा मोठा बदल नजरेस पडतो. इतक्यात असा च एक बदल नजरेस पडला. बसमध्ये गर्दी असताना दोघांच्या जागेवर जेव्हा तिसरा बसायला येतो किंवा येते आणि ते जसे हळूहळू थोडं थोडं सरकत जाऊन स्वतः साठी जागा करून घेतात, अगदी तसंच रस्त्याच्या कडेची तात्पुरती बांधलेली दुकानं हळूहळू थोडं थोडं सरकत मुख्य रस्त्यावर येतात – त्यालाच आपण अतिक्रमण म्हणतो. तर असंच एक दुकान जे रस्त्याच्या कडेवरून प्रत्यक्ष रस्त्यावर येणारच होतं ते अचानक नवीन बांधल्या जाऊन चक्क रस्त्याच्या खाली कडेला विसावू बघत होतं. मला तर अगदी विजेचा झटका बसावा – किती वोल्टचा ते तुम्ही ठरवा – अगदी तसा आश्चर्याचा धक्का बसला. मी तो चेहऱ्यावर दिसू दिला नाही हे वेगळं सांगायला नको.
अतिक्रमणं बरीच असतात. घरावर, रस्त्यावर, शेतात – जिथे जिथे असू शकतात तिथे तिथे, अगदी अवकाशात देखील असावीत. आपल्याला काय माहिती? आपण कुठे बघायला गेलोय नाही का!
अशीच अतिक्रमणं डिजिटल स्पेस मध्ये देखील असतात. त्याचं अगदी साधं, सोपं सर्वांच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे आपलं लाडकं व्हाटसअप.
तुमची कसलीही परवानगी न घेता तुमच्या बंद दरवाज्यातून भ्रमणध्वनीमध्ये आणि तिथून थेट तुमच्या मेंदूवर अतिक्रमण करण्याची ताकद या माध्यमात अन् त्यावरून येणाऱ्या संदेशांमध्ये आहे. एखादा संदेश वाचला नसेल अन् हिरवं चिन्ह तिथे दिसत असेल तर अस्वस्थ होतं ना ? जणू काही हे सगळे संदेश वाचण्याची अन् त्यावर प्रतिक्रिया देण्याची विशेष जोखमीची जबाबदारी आपल्यावर सोपविलेली आहे.
अनेकविध नात्यांचा, विषयांचा एक एक ग्रुप. चिल्लर एक एक चॅट वेगळेच. त्यात आता कार्यालयीन कंकाजविषयीचेही एक दोन ग्रुप असतातच. त्यामुळे बिगर-कार्यालयीन वेळेत, सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपलं काम अन् कार्यालय आपल्या घरात अन् डोक्यात विनापरवानगी शिरकाव करत असतंच आणि त्या शिरकावाला आपण कुठलाही अटकाव करू शकत नाही हे सत्य वारंवार बोचत राहतं. घशात माशाचा काटा अडकावा किंवा दातात सोपेचा कण अडकल्यानंतर कसं टोचत राहतं अगदी तसं हे सत्य बोचत राहतं. मुख्य म्हणजे हे अतिक्रमण दूर करण्याचा कुठलाही वाव असत नाही. त्यातून रात्री झोपेत सुद्धा कामाची स्वप्नं बघणारी अन् त्याच विचारांनी झोपेतून दचकून जागे होणारी बरीच मंडळी आपल्या आसपास भेटतील. या अतिक्रमणाविरोधात कुठलीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही जिथे तक्रार दिल्यास अतिक्रमण हटवण्यात येईल. बाकीची अतिक्रमणे काढण्यात येतात आणि ती पुन्हा प्रस्थापित होतात पण सोशल मीडिया वरील आपल्या स्पेस वर झालेली अतिक्रमणे सातत्याने अस्तित्वात असतात आणि त्यांचा विस्तार होत राहतो.
कोणे एके काळी कामानिमित्त सतत ५ ते ६ माध्यमांवर उपलब्ध राहण्याची कसरत दीर्घकाळ करून झाल्यावर मला स्वतःला हरवल्यासारखे वाटू लागले, छोट्या छोट्या गोष्टींचा विसर पडू लागला – वाटलं द्यावं सगळं सोडून अन् निघून जावं हिमालयात. अर्थात वाटणं अन् करणं यात अंतर आहे म्हणून आपण अशी अतिक्रमणं सहन करून पुढे चालवत नेतो.
पुढे मागे काही उपाय मिळाला तर कळवा तोपर्यंत अतिक्रमणे सहन करण्याची तुमची शक्ती वाढत राहो हीच सदिच्छा.