गरज ही शोधाची जननी असतें. शोध हा नवीन वस्तूंचा शास्त्राचा आणि अगदी स्वतःचा सुद्धा निरंतर सुरु असतो. आपली पिढी त्या मानाने इतर पिढ्यापेक्षा खूप नशीबवान आहे खूप शोध बघण्याचे भाग्य लाभले आहे आपणाला.
आतापर्यत अनेक शोध लागले चाकाचा लागला तर जीवनाची गती वाढली.. मुंबई ते ठाणे ही रेल्वे धावली तर लोक आश्चर्याने थक्क झाली होती,त्यावेळी ते म्हणायचेत,
“साहेबाच्या पोराची
अक्कल भारी
बिनबैलांनी जोरात
गाडी हाकली!!”
जॉन लोगी बेयर्ड ने लावलेला टीव्ही चा सिद्ध, एडिसनचा लाईटचा, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा… अशी ही लांब न संपणारी यादी मोबाईल पर्यत येऊन पोहचली. नवीन मोबाईल निघाले तेव्हा आपल्या स्वातंत्र्यावर गदा येईल, आपल्याला चोवीस तास उत्तर देण्यास उपलब्ध रहावे लागेल या भीतीने काही जण ते घेणं टाळत होते आणि आता मोबाईल किती गरजेचा हे सांगायलाच नको.
GPay!! अर्थात डिजिटल पेमेंट आता या स्तरा पर्यंत वापरलं जाईल असं पंतप्रधान मोदींनाच काय पण GPay किंवा तत्सम पेमेंट प्लॅटफॉर्म्स बनवणाऱ्यांनाही वाटलं ही नसेल..
मित्रांच्या ग्रुपवर एक चलचित्र आले होती. त्यात नवरदेवाची वरात चालली होती आणि त्याचे मित्र नाच करण्यात मग्न होते… बँडवाले सुंदर धून वाजवत होते अशा वेळी त्याना नाचणाऱ्या भोंवती काही नोटा ओवाळून खुशीने रक्कम वाजवणाऱ्या जवळ देण्याची पद्धत आहे आणि त्या नोटाची जागा चित्रात चक्कमोबाईलने घेतली होती मोबाईल ओवाळून बँडवाल्याच्या गळ्यात लटकावलेलं क्यू आर कोडं स्कॅन करून ओवाळणीचे पेमेंट होत होते. हे बघितल्यावर मोबाईलचे आयुष्यात किती महत्वाचं स्थान झालं आहे हे लक्षात येते.. कोणी घराबाहेर पडल तर एक वेळ खिशात पाकीट नसल तर चालत..पण मोबाईल कोणी विसरत नाही!!
मागीलवर्षी द्वारकेला गेलो होतो. बेट द्वारकेकडे जातांना मार्गात असलेल्या प्राचीन रुक्मिणी मंदिरा समोर भिकारी लाईनीत बसलेले होते. समोर एक ऑटो स्पीकर लावलेला जो सतत ही घोषणा रिपीट करत होता..
*”एक को दान देगा तो सबको मिलेगा “*
तिथेही एक मोठा क्यू आर कोडं लागलेला बोर्ड होता. अशी सहकारी तत्वाने आधुनिक डिजिटल दान मागणारे भिक्षु मी प्रथम पाहत होतो.या शतकात मोबाईल आणि इंटरनेट यांनी क्रांती घडवली आहे.
मोबाईल अर्थात भ्रमणध्वनी फक्त संदेशाचे साधनापुरता मर्यादित नसून तो जादूच्या दिव्यातील जीन्स सारखा वाटतो. जे हव ते चॅटजिपिटी वर उपलब्ध करून देणारा तासाभरात स्विगी झोमॅटोवर डिश मागवणारा, गाणे चित्रपट बातम्या दाखवणारा, दूर राहणाऱ्या मुलाच्या बरोबर विडिओवर प्रत्यक्ष वार्तालाप करणारा मोबाईल जादूची छडी सारखा वाटतो.
आता तर ओटीपीमुळे मोबाईल हिच तुमची ओळख झाला आहे तो हरवला तर ओळख हरवल्या सारखं आहे. त्यामुळे तो सर्व जीवापाड जपतात.
मी चुकून मोबाईल विसरलो तर अस्वस्थ होतो, गाडी वळवून घरी येतो मोबाईलला घेण्यासाठी!!
तो खिशात नसला तर जगाशी संपर्क तुटल्याची भावना येते!!
याच मोबाईलच्या जादुई स्क्रीनवर त्याचे महात्म्य सांगणाऱ्या लिहिलेल्या या काही ओळी…
*मोबाईल महात्म्य!!*
सुंदर बँड वाजवण्याची
खुशीची देण्यास बिदागी..
खिशात आता नको पैसा
साथ मिळाली जी.पेची..
धुंदीत धुंद होऊन नाचतांना
मोबाईलच ओवाळी वराला..
दिली त्वरित जीपेनें बिदागी
ख़ुशी चेहेऱ्यांवर झळकली..
होईल का नोटांचा अंत?
राहील का प्लास्टिकचे कार्ड?..
मोबाईलच तुमची ओळख
हरवला तर तुम्ही गोत्यात..
बदल खूपखूप तो मोठा
पाहणारे आम्ही भाग्यवंत..
दूर हजारो मैल तो कोणी
बोलतो त्याच्याशी प्रत्यक्ष..
अद्भुत शोध या शतकात
मोबाईल दाखवे विश्वरूप..
जे वाटेल ते मिळे सर्व ज्ञान
त्यावरी ते सहज उपलब्ध..
मोबाईल सर्वज्ञानी गुरु तो
बँकही त्यालाच ओळखे..
ओटीपी मात्र गुप्त ठेवा
नाहीतर खाली होईल खाते..
मोबाईलच माझी वही रे
आणि तोच माझा पेन..
लिहिवतो..चुका सांगतो तो
अडलो तर तोच विश्वकोष!!
आप्त व्यापात आपुल्या
दूर दूर जरी या धरेवर..
सर्वांना एकत्र हा बांधे
सर्वांची ठेवतो तो खबर..
तोच आमुचा रे कॅमेरा
अनमोल देई स्मृतिगंध ..
वर्तमान भूत भविष्याची
खिडकी खरी तो एक..
मोबाईल साथीला नसता
सर्वजण होतो का उदास?..
ऑक्सिजन तोही दुसरा
त्यांचेविना जीव कासावीस..