TVJ, तुष्की नागपुरी… अर्थात तुषार जोशी.
मी त्याला अहो-जाहो करत नाही, कारण प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वी आम्ही दोनेक वर्षं इंटरनेट मित्र होतो. (खरं तर तोही एक मोठा रंजक इतिहासच आहे, पण त्याबद्दल आत्ता इथं लिहिणं अप्रस्तुत ठरेल.)
माझ्या करिअरमधील सर्वात मोठे स्थित्यंतर घडवण्यात तुषारचा फार मोठा हात होता. नागपूरला आल्यावर सुरुवातीच्या दिवसांत मी त्याच्याच घरी अनेक दिवस राहिलोय.
आम्ही एकाच कंपनीत काम करत असलो तरी प्रत्यक्ष भेट क्वचितच होते . पण जेव्हा कधी भेटतो तेव्हा त्या शिळोप्याच्या गप्पा कधीही नसतात. त्याच्याशी बोलणे हा नेहमीच एक बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असतो. कधी तो एखाद्या नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअरबद्दल सांगेल, किंवा एखाद्या अत्यंत उत्तम पुस्तकाची (उदा. 'Winning') शिफारस करेल, किंवा त्याला सुचलेला एखादा रंजक विचार मांडेल. त्याच्याशी बोलून आल्यावर नेहमीच काहीतरी नवीन गवसल्याची भावना मनात असते.
तुषार एक पक्का 'टेकी' (तंत्रज्ञानाची आवड असलेला) असूनही तरल, संवेदनशील कवी आहे; विपुल लेखन करणारा ब्लॉगर आणि उत्तम छायाचित्रकार आहे; तो एक हाडाचा शिक्षक आहे, एक उत्कृष्ट संघटनकर्ता आहे. त्याच्याकडे पुस्तकांचा आणि गाण्यांचा प्रचंड संग्रह आहे. तो कधी जर्मन शिकत असतो तर कधी उर्दू मध्ये शेरोशायरी करून राहतो. त्याच्या नावावर अनेक आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे आहेत आणि मला माहित नसलेल्या अनेक तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म्सवर त्याचे प्रभुत्व आहे… त्याच्या व्यक्तिमत्वाला असे अनेक पैलू आहेत.
तुम्ही 'गूगल सर्च'मध्ये फक्त Tushar Joshi Nagpur एवढं टाका आणि येणारे असंख्य सर्च रिझल्ट्स पहा…. त्याचा नाविन्याचा, सतत नवीन काहीतरी करत राहण्याचा ध्यास आणि चिकाटी स्तिमित करणारी आहे.
तुषारची मला विशेष भावलेली गोष्ट म्हणजे, तो कधीही आपले विचार तुमच्यावर लादत नाही; 'असं कर', 'तसं कर' असे काही घोडे पुढे दामटवत नाही. त्याऐवजी, त्याला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल अथवा योग्य वाटणाऱ्या पर्यायाबद्दल तो फक्त सांगतो आणि तिथेच थांबतो. पण लवकरच तुम्हाला त्याच्या सूचनांचे महत्त्व पटू लागते.
या संदर्भात मला वाटते की, 'तुषार' हे नाव त्याला अगदी साजेसे आहे… कारंज्यातून उडणारे, पावसाचे पडणारे पाण्याचे थेंब स्वच्छंदपणे पडत असतात … त्यांच्याप्रमाणे तुषार आपले ज्ञान मुक्तहस्ते वाटत असतो. ते 'मोती' वेचून घेणे हे आपल्याच हातात आहे.
अशा ह्या मित्ररूप गुरूला आज गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा व आदरपूर्वक वंदन.