#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
नेहमी विनोदी आणि कुठलंही महत्त्व नसलेल्या गोष्टींवर भरभरून आणि अतिशय प्रामाणिकपणे तास दोन तास गप्पा हाणणाऱ्या माझ्या एका बहिणीने सूर्य पश्चिमेला नाही तर चक्क दक्षिणेला उगवावा अशा प्रकारे एका गंभीर विषयाला हात घातला. अर्थात तो योगायोग नव्हता. जुलै महिन्याच्या ३० दिवसात ३० लेख लिहून काढायचं मी घेतलेलं आव्हान माझ्या व्यस्त आयुष्यात चांगलंच आव्हानात्मक बनलं. लिहायला वेळ तर सोडाच विचार करायला सुद्धा संपलेल्या टूथपेस्ट च्या ट्यूब मधून एका शेवटच्या दिवसासाठी पेस्ट बाहेर काढताना जी कसरत करावी लागते तीच करण्याची वेळ असा वेळ काढण्यासाठी आली होती. म्हणून मग ज्या कोणासोबत बोलणं होत राहिलं त्यांना त्यांना ‘विषय सुचवा’ म्हणून अर्ज-विनंत्या करून झाल्या. तशीच विनंती माझ्या या वायफळ बडबड करण्यात तरबेज बहिणीकडेही केली. अर्थात ती काही उथळ व्यक्ती नाही जी कधीही कुठली गोष्ट गांभीर्याने घेणार नाही. फरक इतकाच की ती त्यावर बोलणं जाणीवपूर्वक टाळते. आधीच ताण कमी आहेत की उगाच विषय वाढवून वातावरण गंभीर करायचं म्हणून महत्त्वाचं सोडून आजूबाजूचं सर्व बोलत असावी असा माझा अंदाज.
तर अशी माझी ही बहीण एकदा ऑटोरिक्षा ने कुठेतरी जात असताना तिला एक मध्यमवयीन काकू भेटल्या. त्यांच्या मुलीने त्यांच्याकडे रोख रक्कम न देता यू पी आय ने पैसे पाठवले अन् तसेच त्यांनी ते रिक्षाचालकाला द्यावे हे गृहीत धरले. पण काकूंना या सगळ्याची सवय नव्हती. त्यात पावसामुळे नेटवर्क ची अडचण. ते यू पी आय काही केल्या चालेना. शेवटी त्या रिक्षाचालक त्यांना न घेताच निघून गेला. त्या पुढे त्यांच्या गंतव्य स्थानी कशा पोचल्या याबद्दल कळलं नाही. परंतु मनात एक प्रश्न आला – आपण बाहेर पडताना सोबत अजिबात रोख रक्कम न ठेवताही आपलं काहीही अडणार नाही इतक्या पुढे आपण आलो आहोत का?
मान्य की रोख रक्कम बाळगणं जोखमीचं आहे, मान्य की ऑनलाइन व्यवहार करताना सुट्ट्या पैशांचा विषय येत नाही, मान्य की एक मोबाईल सोबत ठेवला की सगळी कामं होतात. मान्य की यू पी आय ही आपल्या देशाची समस्त जगाला देणगी आहे. पण आपण भारतात राहतो हे आपण का विसरतो? वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सर्व कंपन्यांची सीम कार्डस वापरुन सुद्धा एकही २४ तास सरळसोट सेवा देणारं सीम आपल्याला मिळालेलं नाही हे आपण का विसरतो? आपलं वातावरण केव्हाही बिघडून आपण केव्हाही नेटवर्क च्या बाहेर जाऊ शकतो हे का विसरतो आपण? मुळात ज्या सहजतेने आपण हे सगळे व्यवहार करतो तेच मागच्या पिढीने सुद्धा अगदी तितक्याच सहजीने करावीत हे गृहीत का धरतो आपण?
यात आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ऑनलाइन पैसे खर्च करतो तेव्हा आपल्याला पैसे हातून सुटत आहेत या गोष्टीची जाणीव न झाल्याने खर्च जास्त होत चाललाय असं माझं म्हणणं नाही तर एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षातून समोर आलंय. तुमच्या आमच्या आजोबांसारखे हिशोब आपल्यातले किती जण ठेवतात? ऑनलाइन का होईना ठेवले पाहिजेत का नको?
अशीच आणखी उदाहरणे देता येतील – आपल्याला मोबाईल नंबर किती लक्षात राहतात? जर मोबाईल हरवला तर जवळच्या व्यक्तीचा संपर्क कसा कराल? तोंडी हिशोब करता येतो का? की छोट्या छोट्या बेरीज – वजाबाकी करण्यासाठी सुद्धा मोबाईल लागतो?
आता म्हणाल मी पुढे जाण्याच्या ऐवजी मागे जाण्याचा सल्ला देत आहे. तसं नाही पण जसं आपण आपल्याच पायावर उभं राहणं पसंत करतो तसं आपल्याच बुद्धीवर जास्त विश्वास ठेवणं चांगलं नाही का? नाही तर हळूहळू मेंदू आळशी होईल आणि त्याचे परिणाम गंभीर असतील. तंत्र अर्थात टेक्नॉलॉजी ही आपली मदतनीस असावी आपण तिच्यावर सर्वस्वी अवलंबून नसावं एवढंच वाटतं.