*केल्याने पर्यटन!!!*
✍️हेमंत नाईक
*’सृष्टीमध्ये बहु लोक।*
*परिभ्रमणे कळे कौतुक*
*चुकोनी उदंड आढळते।’*
देशाटनाने सृष्टीची रहस्ये कळतात. निसर्गात, समाजात जे काही उदंड अलौकिक विस्मयकारी आहे, ते समजते. असे रामदास स्वामींनी लिहून देशाटनाचे महत्त्व विषद केले आहे ..
कंटाळ्यास येता कंटाळा
करायला तयाचे उच्चाटन..
भरा आजच बॅग पूर्ण
सुरु कराया छान पर्यटन..
तेच तेच रुटीन नको
बदल हवा जीवनात ..
रिचार्ज होऊनी परततो
दुप्पट वेगाने होई कार्य..
कुटुंब हवे ते सोबतीला
त्याशिवाय नाही मजा..
मित्रपण जर साथ असे
दुग्धशर्करा योग जाहला..
दोन कुटुंबाची सहल
गप्पाना नसे कधी अंत..
नाविन्यपूर्ण सृष्टीरूप
तृप्त झाले अवघे लोचन..
पर्यटनाचे करता नियोजन
येतो यातही सुखानुभव..
यात्रा कंपनी जागोजाग
पर्यटन ते स्वतःच योजावे..
केल्याने सर्वं देशाटन
चतुर आणखी होई चतुर..
मैत्री विद्वानांशी होता
अंगी रुजते शहाणपण..
पर्यटन विरंगुळ्यासाठी
नकळत शिक्षणही देई..
जन्माचे होई सार्थक
विश्व बघता याची डोळी..
पर्यटनदिनांचा नको अतिरेक
घराकडे आपुले धावे मन .
जगात सर्वात श्रेष्ठ सुंदर घर
तोच स्वर्ग तेथेच स्वर्गसुख
पर्यटनाची महती सांगती
अनेक आमुचे थोर संत..
त्यातूनी वसुधैवकुटुंबकम
जाणतो आम्ही सर्वंजण ,.
लहानपणी शाळेत असताना अराऊंड द वर्ड इन एट डॉलर्स हा राजकपूर हिरो असलेलला चित्रपट बघताना चित्रपटगृहातच जगाची सफर झाली असली तरी … जग बघण्याची उत्कंठाही मनात तेव्हापासूनच वाढली होती. त्यातील एक गीत अजूनही स्मरणात आहे.
पर्यटनाचे हे सामर्थ्य गीतकार शैलेंद्र यांनी या गीतात लिहिले आहे….…
‘दुनिया की सैर कर लो
दुनिया की सैर कर लो
इन्सा के दोस्त बनकर
इन्सा से प्यार करलो…
हम अमन चाहने वाले
हम प्यार में मरने वालें
एक बात कहेंगे सबसे
नफरत को मिटादो जगसे
अराउंड द वर्ल्ड इन एट डॉलर
अराउंड द वर्ल्ड इन एट डॉलर…’
या गीतातून पर्यंटनाचे महत्व सांगताना ते शांतीचाही संदेश देतात.
आदिमानव अन्नाच्या शोधार्थ दुष्काळ पडल्यास पाण्याच्या शोधार्थ भ्रमंती करत असे.. इथूनच पर्यटन सुरु झाले असावे. जसा काळ सरला तसें पर्यटनाचे उद्देश्यही बदलत गेले.‘
*चराति चर तो भगः’ असे संस्कृतमध्येही सुभाषित आहे. ‘जो चालतो त्याचे भाग्य चालते’ असा त्याचा अर्थ आहे. एके ठिकाणी जो बसून राहतो तो मागेच तिथेच राहतो..*
‘साधु चलता भला, पानी बहता भला’यांसारख्या लोकोक्तीतून निःसंग साधूने सतत चालत राहिल्याने त्याची आध्यात्मिक उन्नती, विकास होतो असे सांगितलेले आहे . तसेच पाणी वाहते असेल तर ते शुद्ध, पिण्यायोग्य राहते. त्याचप्रमाणे मानवी जीवन विकसित, प्रवाही बनायचे असेल तर त्याने प्रवास केला पाहिजे. प्रवास करणे ही मानवी जीवनाची मूलभूत प्रेरणा आहे.अगदी लहानपणापासूनच फिरायची ओढ आहे..बाहेर भुर्रर्र जायचं म्हणल की अगदी तान्ह्या मुलाच्या गालावरही हास्य उमलते.
पूर्वी काशीयात्रा अत्यंत दुर्गम असायची. धार्मिक भावनेतून झालेले ते एक पर्यटनच.. काशीला गेलेला माणूस परत येईल याची खात्री नसायची. म्हणून काशीयात्रा झाली की मोठे गावजेवण घालण्याची पद्धत होती त्यास मावंद असेही म्हणतात. काशीची यात्रा झाली की घरी गंगापूजन करून काहीतरी गोष्ट सोडायची पण पद्धत आहे.त्याचीच एक ही गमतीदार कथा..
काशीयात्रा पुर्ण करून आलेल्या मनोहरपंतांनी गंगापूजन करून गावजेवण दिले होते.. सर्व गावाशीच प्रेमळ संबंध असल्याने पूर्ण गाव लोटला होता.
“मनोहर पंत, काशी यात्रेनंतर तुम्ही काय सोडलं?”
अशी सर्वं विचारणा करत होते.
“मी फक्त्त राग सोडलाय.. कोणावरही रागावयाच नाही.. चिडायचं नाही “
मनोहरपंताचे वारंवार उत्तर होते. हे सांगून सांगून जेव्हा संध्याकाळी उशिरा शेवटी एकाने हाच प्रश्न त्यांना विचारला…तेव्हा चिडून मनोहरपंत म्हणाले,
“अरे केव्हाच सांगतोय… राग सोडला..राग सोडला कळतं नाही का?”
थोडक्यात कोणतीही गोष्ट सोडणं कठीण आहे.
तसंच माझे लिहिण्याबाबत झाल आहे. मला लागलेला हा छंद कदापि सुटणार नाही.
बहुतेक सर्वांचे भारत दर्शन झाले असणार काहींचे तर बरेच देशही बघून झाले असतील. काळाप्रमाणे पर्यटनही खूप बदलले आहे. पूर्वी इन्कम कमी असल्याने मोजकेचं जण फिरण्यासाठी निघायचेत.. मात्र आता चित्र बदलले आहे त्यामुळे पर्यटकांची वर्दळ सर्वं ठिकाणी वाढली आहे.
चाळीस वर्षपूर्वी मनालीला गेलो होतो तेव्हाचे मनाली आणि आताचे यात जमीन असमानाचा फरक आहे सर्वत्र गर्दी!.. ट्रॅफिक जाम ची समस्या आहे… आमच्या ड्रायव्हर ने सकाळी चार वाजता स्नो पॉईंट साठी निघायला लावल्यामुळे आम्ही तेथे जाऊन..एन्जॉय करू शकलो. नियोजन नसले तर पर्यटन दुःखद होऊ शकते.
प्रत्येक पर्यटनावर लिहायचे झाले तर एक मालिकाच होईल.
कोडॅक क्रोमा कॅमेरात फोटो रोल मध्ये ३६ ऐवजी ४० यशस्वी फोटो आल्याचे कौतुकाचा जमाना गेला आहे..डिजिटल युगात शेकडो फोटो काढले जातात..फोटोचे अप्रूप कमी झाले पण अजूनही सर्वं पूर्वीच्या जुन्या अल्बम मधील त्या गोड स्मृति अधून मधून बघतांना आपल्यातलाही बदल जाणवतो.
कधीकाळी काळेभोर उडणारे केश रुपेरी झालेले आहेत, काहींच्या बाबतीत तर त्यांनी पुर्ण रजा घेतली असली तरी त्या जुन्या गोड आठवणी अजूनही तेवढ्याच आनंददायी वाटतात.
पर्यटनाने नेमके काय साध्य होते..?
“वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, धर्म, पंथ असलेल्या आपल्या या देशात हिंडल्याने मन विशाल होते.. आपण अनुभवाने समृद्ध बनतो. अधिक सहिष्णू बनतो. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ चाखून आपली रसना तृप्त होते. निसर्गाचे भव्य आणि दिव्य रूप बघितल्यावर आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव होते. दुराभिमान सारा गळून पडतो. निसर्ग सौंदर्याचा आगळा आणि वेग वेगळा साक्षात्कार आपल्या मनात देशा विषयी सार्थ अभिमान जागृत करतो. आपल्याला देश अधिक कळतो. आपला देशाभिमान जाज्वल्य आणि प्रखर बनतो. आपले देश विषयक कर्तव्य अधिक स्पष्टपणे प्रतीत होतो.जगात फिरताना विश्वाची माझे घर जाणून आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेला वसुधैवकुटुंबकम हा मंत्र खऱ्या अर्थाने कळतो. रुटीन मध्ये बदल होऊन नवीन जोमाने परत आपुल्या कार्यास लागतो. थोडक्यात “आनंदाच्या डोही आनंद तरंग…” याची प्रचिती येते.
कवी मोरोपंतांनी चातुर्य मिळवण्यासाठी त्यांच्या सुभाषितात देशाटन हा एक प्रमुख मार्ग सांगितला आहे.
“केल्याने देशाटन,पंडित-मैत्री, सभेत संचार,
शास्त्र, लोक-विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार ।।”
जगात हुशार होण्यासाठी देशाटन अर्थात भ्रमंती गरजेची आहे अर्थात फिरतांना तुमचे ज्ञान चक्षू मात्र उघडे हवे. जाऊ तेथील लोकजीवन संस्कृती तेथील कला आपल्याला खूप काही शिकवून जातात.
पंडित विद्वानांशी मैत्री केल्याने चातुर्य वाढते. आपल्या ग्रुपवरचे सर्व विद्वान सदस्य त्यांचे विचार, कविता , लेख, चित्र व ध्वनीफिती या त्यांनी पाठवलेल्या पोस्ट नियमित त्याची सत्यता पटवत आहे. विद्वानाच्या सभेत विद्वत्ताप्रचूर चर्चा ही पण उपयोगी ठरते.
ग्रंथ हेच गुरु.. असे ग्रन्थ संत साहित्य, शास्त्र आदींचे वाचन अवलोकन करून चातुर्य वाढते.
चातुर्य आणि हुशारी या दोन्ही गोष्टी विभिन्न आहे…वर चातुर्य वाढवयाच्या मार्ग सांगितले आहे तरी जगात पढतमूर्ख पण आहेतच. व्यवहारातील हुशारी ही मात्र प्रत्यक्ष अनुभवानेच येते. याचेच माझ्या एका मित्राचे सत्य उदाहरणही खाली देत आहे.
टक्के टोणपे खाल्ले की व्यक्तिमत्वास अनेक पैलू पडतात आणि ते प्रगल्भ बनते
“एका शालेय मित्राकडे गेलो असताना त्याने वही भर ‘मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही!!” हे एकच वाक्य.. एखादा जप लिहावा..तसें लिहिले होते. सर्वावर विश्वास ठेवण्याच्या त्याच्या विशेष स्वभावामुळे अगदी जवळच्या व्यक्तीकडूनच परत परत त्याचा विश्वासघात झाला होता. असो…. अनुभवच त्यादिवशी त्याचा गुरु बनून वहीत उजळणी करवत होता.” असो..
जसजसा काळ बदलत गेला, तसे प्रवासाचे उद्देश बदलत गेले. पूर्वी भारतीयांचा प्रवास धार्मिक वृत्तीतून घडे. त्यामुळे पूर्वी तीर्थयात्रांच्या निमित्ताने सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी देशाटन घडे. पुढे विद्यार्जन, व्यवसायांचा शोध, व्यापार,बदल, नविन्याची ओढ आदी कारणांतून पर्यटन घडू लागले. देशाटनामुळे विविध प्रदेश, देश यांचा परिचय घडतो. व्यवहारज्ञान, जीवन जगण्याची समृद्ध कला व शास्त्र समजते. व्यक्तिमत्त्व संपन्न होते. विद्वानांशी मैत्री होते. त्यामुळेच
केल्याने देशाटन,पंडित-मैत्री, सभेत संचार,
शास्त्र, लोक-विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार ।।
हे कवी मोरोपंत यांचे शब्द अगदी सार्थ वाटतात.
पर्यटनही मग एक आनंद यात्राचं…ठरते. अशा आनंदी पर्यटनाची एक चारोळी लिहून थांबतो.
पर्यटन जगात सदा घडो l
विद्या शांती चातुर्य वाढो l
ओसोंडूंनी आनंद वाहो l
पूर्ण विश्वात सर्वांसाठी ll
ही प्रार्थमा करून,
आपण सर्वांना आगामी पावसाळी पर्यटनाच्या खूप शुभेच्छा देतो.
🙏🙏🙏
✍️हेमंत नाईक