Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

कधी तू… पाऊस रूपी सखा जिवलग!

प्रशांत बठ्ठे जुलै 2, 2026 1 minute read
0
706102.jpg
दिवसभराच्या रखरखत्या उन्हाने, व्याकुळ करणाऱ्या उकाड्याने आणि थकवून टाकणाऱ्या कामाच्या रगाड्याने कंटाळून सहज विरंगुळा म्हणून बाहेर निघावं, तर अचानक आकाशात सजल ढगांची दाटी व्हावी आणि आलाच की तो! तो असा काही घनघोर होऊन अवतरला की, त्याने माणसाला बाहेर पाऊल टाकायला इतकीशीही उसंत दिली नाही. त्याच्या अशा अनपेक्षित, दमादार येण्याने सृष्टीचे डोळे दिपून गेले. त्याच्या या येण्याने तिचे म्हणजेच त्या धरित्रीचे, त्या व्याकुळ प्रेयसीचे असे लाजणे, त्याचे ते टपोरे थेंब अंगावर झेलताना तिचे मधुर मोहरणे, आणि त्याच्या या अचानक झालेल्या आगमनाने तिचे अंतर्बाह्य बहरून जाणे… हे सारे किती विलोभनीय! तिचे रुसणे, फुगणे, वागणे, बोलणे, असणे आणि किंबहुना तिचे व्याकुळ रुदन देखील त्याच्याच या लहरी स्वभावामुळे असते.
ती अनंत काळापासून अविरतपणे ज्याची वाट पाहत असते, तो तिचा सखा जेव्हा येतो, तेव्हा ती देवाघरच्या देवासारखं त्याला भरभरून भेटते. त्याच्या येण्याची ती आतुरतेने वाट पाहत असताना तिची सकाळ, तिची दुपार, तिची संध्याकाळ, तिचा संपूर्ण दिवस आणि रात्र अगदी रोमांचित होऊन जातात. कधी कधी या दीर्घ प्रतीक्षेत मनाला एक जीवघेणं मौन, एक कोरडेपण टोचत असतं, व्याकुळ करत असतं; पण काही क्षणांतच तो येतो आणि असा काही बहारदार येतो की अवघं चराचर तृप्त होऊन जातं. कधी तो मुसळधार बरसतो, कधी संथ धार होऊन मनाला शांत करतो, कधी नाजूक रिमझिम बनून सुखद शहारे आणतो, तर कधी अचानक सुरू झालेली जोरदार वृष्टी मनाला एका अनामिक मुक्तीचा आनंद देऊन जाते. मग ती भेट गाठीतली असो वा अंतर्मनातली, मन मुराद आनंद घेत सृष्टी त्याच्या या आगमनाचा सोहळा साजरा करते.
“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे!”
 
या पहिल्या सरींच्या आगमनाने तिचा सर्वांग फुलतो आणि उमलून येतो. तिच्या हृदयातील मारवा राग अधिकच आर्त होतो. ती सकाळ, ती रात्र, ती संध्याकाळ सदैव धुंद होऊन त्याच्याच या अलौकिक मिलनाची प्रतीक्षा करत असते. ती अतिशय उत्कटतेने, संपूर्ण याचना आणि समर्पणाने त्याला भेटते. म्हणूनच तर म्हणतात की, पहिल्या भेटीची ही उत्कटता अतिशय अनोखी, अनुपमेय आणि अवर्णनीय असते; कारण ही वसुंधरासुद्धा पहिल्या सरीच्या पावसाने जो अभूतपूर्व, सुवासिक मातीचा गंध देते, तो गंध ती दुसऱ्यांदा कधीच देत नाही. म्हणूनच त्याच्या या अद्भूत आणि अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना बालकवींसारखे थोर कवी मनाच्या आकाशात लिहून जातात. कधी क्षणभरात कोसळणाऱ्या सरी, तर कधी सुवर्णकणांसारखे चमकरणारे ऊन! असा हा पाऊस म्हणजे केवळ पाण्याचा वर्षाव नसून तो एक सखा आहे, मितवा आहे, जिवलग मित्र आहे आणि विरही मनाचा प्रियकर आहे.
पावसाच्या या अशा बेधुंद येण्याने, नेहमी अगदी चोख आणि पद्धतशीर जीवनशैली जगणाऱ्या, वेळेचे काटेकोर गणित मांडणाऱ्या सुशिक्षित माणसांचीसुद्धा मोठी तारांबळ उडते. वेळेवर रेनकोट न आणल्याचा किंवा छत्री विसरल्याचा पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागतो. परंतु, ज्यांच्याकडे भौतिक सुखाचे साधन म्हणून काहीही नाही, अशी मनाची श्रीमंत असणारी साधी माणसे आणि निसर्गातले निष्पाप प्राणीसुद्धा पहिल्या पावसाच्या धुंदीत आपले सर्वस्व विसरून भिजायला धावून येतात. त्यावेळी फक्त मानवी शरीरच नव्हे, तर मनाच्या कोनाकोपऱ्यात दडलेल्या सुप्त भावनांपर्यंत, सुकलेल्या आठवणींपर्यंत हा पाऊस जाऊन पोहोचतो आणि मनाला पुन्हा एकदा हिरवेगार करतो. म्हणूनच कवींच्या मनात जेव्हा भावनांचा पाऊस दाटून येतो, तेव्हा गझलकार इलाही जमादार यांच्यासारखे संवेदनशील मनाचे कवी माणसाच्या स्वभावावर भाष्य करताना सहज लिहून जातात—
“केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा,
अंदाज आरशाचा वाटे हवा हवासा..
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा!”
मनुष्य स्वभावाचे हे गूढ इलाही जमादार अत्यंत तरलतेने सांगून जातात. जगभरातील सर्वच माणसे या पावसाची वेडी असतात. साहित्यात तर स्त्री ही पावसाच्या प्रेमात पडलेली, त्याची वेडी झालेली प्रकर्षाने दिसते. जगाला आपल्या सौंदर्याने आणि अदांनी भल्याभल्यांना वेड लावणारी ती स्त्री, त्या पावसाची वाट पाहण्यातच स्वतःला विसरून धुंद होते. त्याच्या नुसत्या कल्पनेत, त्याच्या विरहाच्या वेदनेतही ती एक आगळावेगळा आनंद उपभोगत असते. खरंच, कधी कधी दुःखाचाही एक वेगळाच, गोड आनंद असतो आणि आनंदाच्या भरात तर तो सोहळा अधिकच गडद होतो. या दोन्ही प्रकारच्या आनंदाच्या अवस्थांमध्ये स्वतःला संपूर्ण निसर्गासहित सामावून घेत मानवजात या पावसाच्या अथांग माध्यमातून स्वतःचे अस्तित्व समजून घेण्याचा प्रयत्न करते.
जगाला हसवणारा महान मूकपट अभिनेता चार्ली चॅप्लिन किती सुंदर आणि मनाला स्पर्शून जाईल असं म्हणून गेला आहे की, *”मला पावसात भिजायला आवडतं, पावसात एकटं चालायला आवडतं; कारण त्या वेळी मी जरी रडत असलो, तरी माझ्या डोळ्यांतील अश्रू कोणालाही दिसत नाहीत.”* चार्ली चॅप्लिनसारखा महान विनोदी अभिनेता पावसाचे इतके सुंदर, कारुण्यमय आणि हळवे रूप आपल्यासमोर मांडतो, तेव्हा पावसाची खोली अधिकच जाणवते. पाऊस हा असा आहे, जो संत कबीरांच्या त्या मोडक्या-तोडक्या, गळक्या चंद्रमौली झोपडीतूनही तसाच दिसतो आणि श्रीमंतांच्या उत्तुंग, ऐश्वर्यसंपन्न महालांतूनही तसाच बरसतो! पाऊस कधीच कोणामध्ये भेदभाव करत नाही. तो राजा आणि रंक, श्रीमंत आणि गरीब सर्वांना सारखाच तृप्त करतो. निसर्गातील पक्षीही कधी भेदभाव करत नाहीत, विशाल वृक्षही कधी कोणामध्ये अंतर ठेवत नाहीत. म्हणूनच तर एका सुंदर दोह्यामध्ये म्हटले आहे की—
वृक्ष न खाए कभी अपना फल, नदी न पीए कभी अपना जल ।
अपने तन का, मन का, धन का, जो दूसरों को दे दे दान,
रे वो सच्चा इंसान है, इस धरती का भगवान है ।
 
त्या निराकार, निर्गुण आणि परम पावन स्वरूपाला देखील धरणीवर येऊन नाचण्यासाठी अगदी बाध्य करतो, तो हा पाऊस! यासाठी विश्वातील अनेक भाषांमध्ये कितीतरी रूपके, कितीतरी अजरामर गीते आणि कितीतरी शुद्ध, सुंदर शब्दकळा कवींनी आणि लेखकांनी योजिल्या आहेत. याच भावनेला जिवंत करणारे 'लगान' चित्रपटातले ते सुप्रसिद्ध गीतl आठवते, जे ऐकताना मनातील पाऊस जिवंत होतो—
‘घन नन घन नन घिर आये बदरा, घन घन घोर कारी छाये… बदरा रे, देखो बिजुरिया चमके, मन चमके…’
हा पाऊस माणसाला केवळ बाह्यतः भिजवत नाही, तर अंतर्मनाचा मोर नाचवायला लावतो. जेव्हा जग विन्मुख होते, तेव्हा हा पाऊस माझी साथ देतो, माझ्या एकाकीपणाचा जिवलग सांगाती बनतो. म्हणूनच, पाऊस हा केवळ पाण्याचा वर्षाव नसून, तो सृष्टीचा श्वास आहे, माणसाच्या भावनांचा आरसा आहे आणि विधात्याची सृजनात्मक सुंदर कलाकृती आहे
प्रशांत चित्रा जानराव बठ्ठे 
01.07.2026
#सुरपाखरू#30दिवसात 30#
#प्रयोग#जुलै 2026

लेखक

  • प्रशांत बठ्ठे
    प्रशांत बठ्ठे

Post navigation

Previous: गोष्ट एका बी.एल.ओ. ची..
Next: श्रीमदभागवत चिंतन – १ फ़लशृती आणि Outcomes Based Education
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.